जशास तसे! भारतीय जवानांचे चीनला चोख प्रत्युत्तर

91

गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांनी तिरंगा फडकवल्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोत, गलवान नदीजवळ बर्फाने आच्छादलेल्या परिसरात उत्साही शैलीत विशाल तिरंगा फडकवून गलवान खोऱ्यातील वर्चस्वाचा स्पष्ट संदेश भारतीय सैनिकांनी दिला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला चिनी सैनिकांनी गलवान खो-यात झेंडा फडकावल्याच्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताचं चीनला प्रत्युत्तर

या फोटोच्या माध्यमातून भारताने स्पष्ट केले आहे की, गलवान खोऱ्याच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. भारतीय सैनिकांनी तिरंगा फडकावल्याचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. पीएलएने अधिकृत प्रचार चॅनेलद्वारे व्हिडिओमध्ये चीनचा ध्वज फडकावताना आपल्या सैनिकांचे छोटे फुटेज प्रसिद्ध केले होते. यामध्ये चिनी सैनिक आपल्या देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. या व्हिडिओमध्ये एक पोस्टरही लावण्यात आले आहे, ज्यावर एक इंचही जमीन न देण्याचा संदेश लिहिला आहे. चीनच्या या व्हिडिओवर चिंता व्यक्त करत राजकीय पक्षांच्या अनेक तज्ज्ञांनी केंद्र सरकारला परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले होते. चीनच्या प्रचारामुळे निर्माण झालेल्या गोंधळाला उत्तर देण्यासाठी गलवानमध्ये तिरंगा फडकावणाऱ्या भारतीय सैनिकांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

चीनचा दुटप्पीपणा

एलएसीवरील चीनची रणनीती आणि प्रचाराची रणनीती यावरून लक्षात येते की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, पूर्व लडाख आणि सिक्कीमच्या भागांसह सुमारे 10 सीमा चौक्यांवर पीएलएने भारतीय सैन्यासोबत मिठाईची देवाणघेवाण करून सद्भावना प्रदर्शन केले आणि दुसरीकडे यादरम्यान दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसिद्ध करून गलवन व्हॅलीच्या वर्चस्वाचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्करी सुरक्षा यंत्रणेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांचा हा व्हिडीओ गलवान खोऱ्यातील चीनच्या भागातील आहे आणि भारतीय सैनिकांची छायाचित्रेही गलवान खोऱ्यातील भारताचे वर्चस्व असलेल्या भागातील आहेत.

( हेही वाचा: पहा जगातील पहिली पारदर्शक कार…)

चीनच्या कुरापती

पीएलएच्या गलवानशी संबंधित दिशाभूल करणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर चिनी सैन्य पॅंगॉन्ग तलावावर पूल बांधत असल्याच्या बातम्या सीमेवर चीनच्या सततच्या आक्रमक भूमिकेचे संकेत देत आहेत. पँगॉन्ग लेकच्या उत्तर आणि दक्षिण टोकांदरम्यान आपल्या सैन्याची हालचाल सुलभ करण्यासाठी चीन फिंगर एटपासून सुमारे 20 किमी अंतरावर हा पूल बांधत असल्याचे मानले जातं आहे. पूल बांधल्यानंतर, या भागापासून रोटुगा लष्करी तळापर्यंतचे सुमारे 150 किमीचे सध्याचे अंतर सुमारे 50 किमीपेक्षा कमी असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.