मागील काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या ताफ्यातही अनेक पटींनी वाढ होणार आहे. त्यात आयएनएस विक्रांतसाठी फ्रान्सकडून २६ राफेल (समुद्री लढाऊ जेट) विमानांचा करार होऊ शकतो, ज्यावर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी होऊ शकते. मोदींच्या दौऱ्यापूर्वी संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या अब्जावधींच्या करारावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मोदींच्या दौऱ्यात तीन पाणबुड्याच्या निर्मितीबाबतही चर्चा होऊ शकते. तसेच, मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत त्यांना भारतात आणण्याबाबत चर्चा होऊ शकते. म्हणजेच त्या भारतातच तयार होऊ शकतात. मात्र, अद्याप यासंदर्भात शासनाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येत्या काही दिवसांत यावर चित्र स्पष्ट होऊ शकेल.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. १३ जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीत भारतीय नौदलासाठी २६ राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. त्यामुळे सर्वांच्या नजरा डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिलच्या (डीएसी) बैठकीकडे आहेत.
फ्रान्सची राफेल-एम लढाऊ विमाने समुद्रात पाळत ठेवण्यासाठी आणि लढण्यासाठी अत्यंत अचूक मानली गेली आहेत. अमेरिकन फायटर हॉर्नेटपेक्षा हे विमान चांगले आणि स्वस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही विमाने आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात करता येतील.
Join Our WhatsApp Community