भारतीय नौदलासाठीचे राष्ट्रपती सन्मान तसेच राष्ट्रपती ध्वज आणि भारतीय नौदलाचे बोधचिन्ह यांच्या नव्या रचनेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली आहे. विशाखापट्टणम येथे या नव्या रचनांचे अनावरण भारतीय नौदल दिनानिमित्त करण्यात आले असून या दिवसापासूनच भारतीय नौदलाचे सुधारित बोधचिन्ह वापरात लागू झाले आहे.
असं आहे नवं बोधचिन्ह
नौदलाच्या नव्या बोधचिन्हात राष्ट्रीय चिन्हाखालील पारंपरिक नाविक नांगराच्या खाली ‘शं नो वरुणा:’ हे बोधवाक्य कोरण्यात आले आहे. वेदांतील या वाक्याचा अर्थ ‘समुद्र देवता आमच्यावर पवित्र आशीर्वादाचा वर्षाव करो’ असा होतो. भारतीय नौदलाच्या बोधचिन्हासह भारतीय नौदल कमांडच्या मुख्यालयाच्या बोधचिन्हात करण्यात आलेल्या किरकोळ सुधारणांना देखील राष्ट्रपती मुर्मू यांनी मंजुरी दिली.
भारतीय नौदलाची अष्टपैलू कामगिरी लक्षात घेऊन चार मुख्य आणि चार उपदिशांचे प्रतिक म्हणून हा अष्टकोनी आकार निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रपती ध्वजाचे नवे रचनाचित्र भारताच्या वैभवशाली सागरी वारशाला अधोरेखित करते तसेच सामर्थ्यवान, धाडसी, आत्मविश्वासाने परिपूर्ण तसेच अभिमानास्पद भारतीय नौदलाचे देखील प्रतिनिधित्व करते.
वसाहतवादाच्या प्रभावाखालील भूतकाळातून बाहेर पडण्याच्या उद्देशाने सध्याच्या राष्ट्रीय अस्मिता जागृतीच्या काळाला अनुसरून नौदलाने आपल्या इतिहासापासून प्रेरणा घेत पूर्वीच्या राष्ट्रपती ध्वजाच्या रचनाचित्रात सुधारणा करून नव्या रचनेचा स्वीकार केला आहे. पूर्वीच्या चिन्हातील सफेद चिन्हावरील लाल उभ्या-आडव्या रेषांच्या जागी दुहेरी सोनेरी काठांनी बांधलेल्या निळ्या अष्टकोनाच्या आतल्या भागात सर्वात वरती राष्ट्रीय चिन्हाच्या पायाशी नांगराची ठळक आकृती आहे. नांगराच्या वरच्या आडव्या मुख्य पट्टीवर ‘सत्यमेव जयते’ हे आपले देवनागरी लिपीतील राष्ट्रीय घोषवाक्य कोरलेले आहे. तसेच या ध्वजाच्या सर्वात वरच्या डाव्या कोपऱ्यात भारतीय राष्ट्रध्वज तसाच ठेवण्यात आला आहे.
भारतीय नौदलासाठीचे राष्ट्रपती सन्मान आणि ध्वजाचे पूर्वीचे रचनाचित्र 6 सप्टेंबर 2017 रोजी निश्चित करण्यात आले होते. भारतीय नौदलाने 2 सप्टेंबर 2022 रोजी नौदलाचे नवे बोधचिन्ह तसेच राष्ट्रपती सन्मान आणि ध्वजाचा स्वीकार केला. राष्ट्रपती ध्वजाच्या नव्या रचनेत तीन मुख्य घटकांचा समावेश आहे – सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात भारतीय राष्ट्रध्वज, त्याच्या रांगेत उजवीकडे झळकणाऱ्या भागात, सोनेरी रंगात ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य कोरलेले राष्ट्रीय चिन्ह आणि त्याच्या खाली नेव्ही ब्लू रंगातील नौदलाचे नवे अष्टकोनी बोधचिन्ह. सोनेरी राष्ट्रीय चिन्ह म्हणजे, सामर्थ्य, धैर्य, विश्वास आणि अभिमान यांचे प्रतिक आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन नेव्ही ब्लू रंगातील नौदलाचे नवे अष्टकोनी बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.