पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असलेल्या आयएनएसे विक्रांतचे लोकार्पण करण्यात आले. ही संरक्षण क्षेत्रात भारताने केलेली मोठी कामगिरी असून यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. याचवेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
नौदलाच्या ध्वजावरुन देखील भारताने आता ब्रिटीश राज हटवले असून हा भारताच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे, भारताने आज गुलामगिरीची निशाणी उतरवली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले. तसेच नौदलाचा हा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे.
(हेही वाचाः INS Vikrant: पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील, अशी आहेत वैशिष्ट्ये)
छत्रपती शिवाजी महाराज हे नौसेनेचे जनक
भारतीय नौदलाचा हा नवा ध्वज आपण नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं, त्यांनी नौदलाचा ख-या अर्थाने विकास केला म्हणून हा ध्वज आपण त्यांना अर्पण करत आहोत. हा नवा ध्वज भारतीय नौसेनेचे आत्मबल आणि आत्मविश्वास वाढवेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कसा आहे नवा ध्वज?
भारतीय नौदलाच्या झेंड्यावर यापूर्वी असलेले सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह हटवण्यात आले असून त्याऐवजी आता जहाजाचे नांगर(अँकर) असणारं चिन्ह भारतीय नौदलाच्या ध्वजावर समाविष्ट करण्यात आले आहे. या ध्वजावर सत्यमेव जयते आणि श नो वरुणः हे ब्रीदवाक्य लिहिले आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हाला आशीर्वाद देवो’, असा आहे. या ध्वजाच्या डाव्या कोप-यात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा देखील आहे.
Join Our WhatsApp Community