माझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे बांधण्यात आलेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आयएनएस मोरमुगाओ (मुरगाव) ही दुसरी युद्धनौका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबई येथील नौदलाच्या तळावर युद्धनौकेवर भारतीय नौदलाचा झेंडा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते फडकवण्यात आला.
( हेही वाचा : महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना जशासतसे उत्तर देऊ; फडणवीसांचा ‘मविआ’ला इशारा)
आयएनएस मोरमुगाओची वैशिष्ट्य
- आयएनएस मोरमुगाओ ही ब्राह्मोस, बराक क्षेपणास्त्र (मिसाईल), दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एमएफस्टार रडार, हायटेक इलेक्ट्रिकल युद्धप्रणाली (वॉरफेअर सिस्टिम) स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी देखरेख रडारने सुसज्ज आहे. त्याशिवाय, आकाशात मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा या युद्धनौकेवरून करता येऊ शकतो.
- हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणादेखील या युद्धनौकेवर आहे. या नौकेतील ७६ टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे. ‘शौर्य, पराक्रम आणि विजयी भव’ ही आयएनएस मोरमुगाओची युद्धघोषणा आहे. ‘प्रोत्साहित आणि मोहिम सज्ज’ असे आयएनएस मोरमुगाओचे ब्रीदवाक्य आहे.
- भारतीय नौदलाच्या युद्ध नौका डिझाईन ब्युरोने या युद्ध नौकेचे डिझाईन तयार केले आहे, P15B श्रेणीत कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणे, समुद्रात राहणे आणि हाताळणीत सहजता यावी म्हणून नवीन डिझाईन संकल्पना अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
- यात सर्व महत्वाची शस्त्रात्रे आणि सेन्सर्स हे एकतर भारतीय ओईएम्सने किंवा प्रथितयश जागतिक ओईएम्सशी रणनितिक सहकार्य आणि टीओटीच्या माध्यमातून विकसित केले आहे. या नौकेची बांधणी 17 सप्टेंबर 2016 ला सुरु झाली आणि 19 डिसेंबर 2021 रोजी गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी, या नौकेची समुद्र सफर सुरू झाली. 18 डिसेंबर 2022 रोजी नौदलात दाखल होणे याला विशेष महत्व आहे, ते म्हणजे 1961 मध्ये याच दिवशी पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजयची सुरुवात आली होती.
- गोव्यातील ऐतिहासिक मुरगाव या किनारी शहराच्या नावावरून, आयएनएस मोरमुगाओचे नाव ठेवण्यात आले आहे. या नौकेवर जवळपास 300 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची क्षमता आहे.
आयएनएस मोरमुगाओ मोलाची कामगिरी बजावेल – राजनाथ सिंह
आयएनएस मोरमुगाओ युद्धनौका ही आपली ताकद आहे. भारतीय नौदलात आयएनएस मोरमुगाओ मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा इतिहास आहे. अशा या राज्यात मोरमुगाओ सेवेत दाखल होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘मोरमुगाओ’ या नावामागे गोवा मुक्ती संघर्षाचा इतिहास आहे. नौदलाच्या माध्यमातून गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला दिलेली ही मानवंदना असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत फक्त भारतासाठी नाही, तर पुढे जगासाठी आपण युद्ध नौका बनवू असा विश्वास सिंह व्यक्त केला.