देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय नौदलात मुंबईतील नेव्हल डाॅकयार्ड येथे अत्याधुनिक स्टेल्थ गाईडेड मिसाईल डिस्ट्राॅयर मुरमुगाव दाखल करतील. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS मुरमुगाव रविवारी भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे. भारतीय नौदलच्या म्हणण्यानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार, जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.
प्राणघातक युद्धनौका म्हणून INS मुरमुगाव ची ओळख
नौदलाच्या प्रकल्प-15B अंतर्गत मुरमुगाव ही दुसरी युद्धनौका आहे. ज्याअंतर्गत 2025 पर्यंत आणखी दोन युद्धनौका देण्यात येणार आहेत. विशाखापट्टणम- क्लास डिस्ट्राॅयर्सची ही नौदलाची इन-हाऊस संस्था वाॅरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे. नौदलाने सांगितले की, या युद्धनौकेची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7 हजार 400 टन आहे. भारतात बांधलेल्या सर्वात प्राणघातक युद्धनौकांमध्ये याची गणना केली जाऊ शकते.
( हेही वाचा: महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे सीएसएमटीकडे जाणारा ‘हा’ मार्ग बंद; अशी असेल पर्यायी व्यवस्था )
मुरमुगाव नाव कसे पडले?
गोव्याच्या पश्चिम किना-यावर वसलेल्या या ऐतिहासिक बंदर शहरावरुन हे नाव पडले आहे. हे जहाज प्रथम 19 डिसेंबर 2021 रोजी समुद्रात उतरले. त्याचदिवशी गोव्याने पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीची 60 वर्षे पूर्ण केली. ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या स्वदेशी संस्थेने डिझाईन केले आहे.
Join Our WhatsApp Community