इस्रायल-हमास युद्धबंदीचा (Israel-Hamas conflict) सोमवारी संपणारा कालावधी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आल्याची माहिती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमास एकमेकांच्या कैदेत असलेल्या ओलिसांच्या चौथ्या देवाणघेवाणीची तयारी करत आहेत.
इजिप्तसह कतारही इस्रायल-हमास संघर्षात प्रमुख मध्यस्थी आहे. हमासने रविवारी ४ दिवसांच्या युद्धबंदीअंतर्गत तिसऱ्या देवाणघेवाणीमध्ये आणखी १७ ओलीस, १४ इस्रायली आणि ३ थाई नागरिकांची सुटका केली. त्या बदल्यात इस्रायलने ३९ पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता केली. दक्षिण इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यात हमासने पकडलेल्या सुमारे २४० ओलिसांपैकी ६२ जणांची सुटका करण्यात आली आहे. इस्त्रायली सैन्याने एकाची सुटका केली आहे, तर दोघे गाझामध्ये मृत अवस्थेत सापडले आहेत.
(हेही वाचा –Vadgaon-Sheri Accident: वडगाव-शेरी चौकात उलटलेल्या टँकरची वायूगळती १८ तासांनी नियंत्रणात )
मुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक १० अतिरिक्त ओलिसांसाठी युद्धबंदी एक दिवस वाढवली जाईल, असे इस्रायलने म्हटले होते, तर अमेरिका, कतार आणि इजिप्तने मध्यस्थी केल्यानंतर युद्धबंदी वाढवण्याची आशा हमासने व्यक्त केली होती.
युद्धविराम संपल्यानंतर युद्धाला पुन्हा सुरुवात
युद्धबंदी करारामुळे गाझामध्ये इंधन आणि अन्य वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे, मात्र गाझामधील २.३ दशलक्ष पॅलेस्टिनी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे पुरेसे नाही, असे मदत गटाचे म्हणणे आहे. युद्ध सुरू झाल्यापासून १३ हजार ३०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारले गेले. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे, अशी माहिती हमास नियंत्रित आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. युद्धविराम संपल्यानंतर युद्धाला पुन्हा सुरुवात होईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी म्हटले आहे. इस्रायलमध्ये सुमारे १२०० नागरिक आणि ७७ सैनिक मारले गेले आहेत.
युद्धाबाबत युरोप, अरब देशांशी चर्चा
युरोपियन समुदायाचे सदस्य देश आणि मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकन देशांचे शिष्टमंडळ सोमवारी स्पेनमध्ये बर्सिलोना येथे गाझामधील स्थितीवर चर्चा करणार आहेत. ‘युनियन फॉर द मेडिटेरेनियन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ४२ शिष्टमंडळे एकत्र येणार असून, यातील बहुतेक देशांचे प्रतिनिधीत्व त्यांचे परराष्ट्रमंत्री करत आहेत. युरोपियन समुदायाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल आणि जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री आयमन सफादी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.