शोपियानमध्ये चकमक! सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सकाळपासून शोपियान जिल्ह्यातील कापरेन भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सुरक्षा दलांनी घातलेल्या घेरावात आणखी दहशतवादी अडकले असून अद्याप सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आणि सुरक्षा दलांनी दोघांना ठार केले.

(हेही वाचा – PUC नसेल तर विम्याच्या क्लेमला सुद्धा मुकावं लागेल! काय आहे नियम?)

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचं नाव कामरान भाई उर्फ ​​हनीस असं असून तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. कुलगाम-शोपियान भागात ते सक्रिय होते. तर एकाची ओळख पटलेली नाही.

सुरक्षा दलांना शोपियानच्या कापरीन भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी मिळून परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना त्यांच्या जवळ येत असल्याचे पाहून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. दरम्यान, 1 नोव्हेंबरला पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here