सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, काश्मिरी पंडितांची हत्या करणारा दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये काश्मिरी पंडित राहुल भटची हत्या करणा-या दहशतवाद्याचा देखील समावेश आहे.

तीन दहशतवादी ठार

बडगाम जिल्ह्यातील वॉटरहोल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी मोठी चकमक झाली. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले होते. अखेर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये लतीफ रादर या दहशतवाद्याचा देखील खात्मा करण्यात आला. रादरने काश्मिरी पंडित राहुल भट आणि अमरीन भट यांच्यासारख्या अनेक निष्पाप लोकांची हत्या केली होती.

मोठा कट उधळला

तसेच सुरक्षा दलांनी पुलवामामध्येही आयईडी(इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस)चा मोठा साठा जप्त करत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईदरम्यान गोलाकार मार्गावरील तहब क्रॉसिंगजवळ 25 ते 30 किलो आयईडी जप्त करण्याक आले. हे आयईडी निकामी करण्यात आले असून परिसरात शोध मोहीम जारी करण्यात आली आहे.

139 दहशतवाद्यांना कंठस्नान

सुरक्षा दलांनी काश्मीर खो-यात गेले काही महिने ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले असून, आतापर्यंत 139 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सरकारी आकडेवारीनुसार सांगण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 6 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये लष्कर-ए-तय्यबाचे 4 तर जैश-ए-मोहम्मदचे 2 दहशतवादी होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here