मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांचा हैदोस सुरूच आहे. या अतिरेक्यांनी रविवारी, 14 जुलै रोजी जिरीबाममध्ये सीआरपीएफ (CRPF) आणि पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचा जवान अजय कुमार झा हे हुतात्मा झाले. यात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला. कुकी अतिरेक्यांनी मोंगबुंगमधील डोंगराळ भागातून हा गोळीबार केला. सीआरपीएफ जवान यांच्या डोक्याला गोळी लागली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोंगबुंगमध्ये शनिवारी रात्री उशिरा गोळीबार सुरू झाला होता. त्यावेळी सीआरपीएफ आणि पोलिसांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या वर्षी मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ल्याच्या आणखी 3 घटना घडल्या. 26 एप्रिल रोजी मणिपूरमध्ये सीआरपीएफ (CRPF)चे 2 जवान हुतात्मा झाले. कुकी अतिरेक्यांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकला होता. तर 26 एप्रिल रोजी कुकी अतिरेक्यांनी मणिपूरमधील केंद्रीय दलाच्या चौकीवर बॉम्ब फेकले होते. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले असून अन्य दोन जवान जखमी झाले. मणिपूरमध्ये लोकसभेच्या मतदानानंतर अवघ्या 6 तासांनी विष्णुपूर जिल्ह्यात हा हल्ला झाला.15 फेब्रुवारी रोजी जमावाने एसपी कार्यालयावर हल्ला केला, त्यात 2 नागरिक ठार झाले.
(हेही वाचा Digital भिकाऱ्यांच्या सापळा; सायबर क्राईममधील नवीन फ्रॉड)
मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात 15 फेब्रुवारीला हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये दोन जण ठार झाले होते. एका पोलिस हवालदाराच्या निलंबनाच्या निषेधार्थ 300-400 लोकांच्या जमावाने रात्री उशिरा एसपी आणि डीसी कार्यालयांवर हल्ला केला. जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केला. या घटनेत 40 हून अधिक जण जखमी झाले. चुरचंदपूर हा कुकीबहुल परिसर आहे.
17 जानेवारी रोजी मणिपूरमधील मोरेह भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान (CRPF) हुतात्मा झाले. याशिवाय कुकी समाजातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. हल्लेखोर कुकी समाजातील असल्याचे सांगण्यात आले. मोरे एसबीआयजवळील सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला.
मणिपूरमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक मृत्यू
मणिपूरमध्ये आरक्षणावरून गेल्या वर्षी 3 मेपासून कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. राज्यातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 65 हजारांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत.
Join Our WhatsApp Community