जम्मू-काश्मिरातील श्रीनगरच्या हरवान भागात आज, रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लश्कर-ए-तैय्यबाच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत यांसदर्भात माहिती दिली.
पहाटे चकमक सुरू झाली
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने हरवान परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. ठार झालेला दहशतवादी परदेशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, त्याची संपूर्ण ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. एका माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी हरवान परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान पहाटे चकमक सुरू झाली आणि काही वेळातच सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
(हेही वाचा ‘हिंदुस्थान पोस्ट’ इम्पॅक्ट! अखेर ‘हुतात्मा स्मारक चौक’ नावाचे लागले नवे फलक)
सीआरपीएफच्या 188 बटालियनसह परिसराची नाकेबंदी
काही दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लश्कर-ए-तैय्यबाच्या 2 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन मॅगझिन, पिस्तुलच्या सात राऊंड, एक ग्रेनेड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे बुधवारी रात्री उशिरा कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. या आधारे तत्काळ कारवाई करत, एसओजीने लष्कराच्या एका राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या 188 बटालियनसह परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी सांगितलं की, कुज्जर फ्रिसाल येथील अमीर बशीर दार आणि सुरसानो हातीपोरा येथील आदिल युसूफ अशी या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, दोन्ही दहशतवादी सुरक्षा दलांवर हल्ले आणि स्थानिक लोकांवरील अत्याचारांसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते.
Join Our WhatsApp Community