भारतीय मालवाहू जहाजावर झालेला ड्रोन हल्ला सरकारने गांभीर्याने घेतला आहे. हा हल्ला करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी दिला. स्वदेशी युद्धनौका इम्फाल मंगळवारी भारतीय नौदलात सहभागी झाली. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात राजनाथ बोलत होते.
मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्ड येथे आयोजित या कार्यक्रमाला नौदल प्रमुख आर हरी कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजनाथ म्हणाले की, आजकाल समुद्रात खळबळ खूप वाढली आहे. भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याने काही शक्ती ईर्ष्या आणि द्वेषाने भरल्या आहेत. अलीकडेच अरबी समुद्रात ‘एमव्ही केम प्लुटो’वर केलेला ड्रोन हल्ला आणि त्यापूर्वी तांबड्या समुद्रात ‘एमव्ही साईबाबा’वर झालेला हल्ला भारताने गांभीर्याने घेतला आहे.
भारतीय नौदल समुद्रावर पाळत ठेवून आहेत. हा हल्ला कोणी केला असेल, तो समुद्रकिनारी असला तरी आम्ही त्यांना शोधून काढू. या हल्ल्यामागे असलेल्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राजनाथ यांनी दिली.आयएनएस इम्फालच्या कार्यान्वित झाल्यामुळे भारताची नौदल शक्ती आणखी बळकट होईल, असा माझा विश्वास आहे. ईशान्येचे वैभव दर्शविणाऱ्या इम्फालच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले आहे. उत्तर भारतात असलेल्या दिल्लीत याला मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची धुडगूस; मध्यरात्री २० ते २५ वाहनांची तोडफोड)
अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्गात नौदलाच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दूरदृष्टीने नौदलाचे महत्त्व अधोरेखित झाले आणि आज भारताच्या उर्वरित सशस्त्र दलांप्रमाणे नौदलाकडेही तितकेच लक्ष दिले जात असल्याचे राजनाथ म्हणाले. आयएनएस इम्फाल भारताची वाढती सागरी शक्ती प्रतिबिंबित करते तसेच ही युद्धनौका इंडो-पॅसिफिक प्रदेशात ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ या तत्त्वाला अधिक बळकट करेल, ज्याचा अर्थ आहे, “जो समुद्रांवर राज्य करतो तो सर्वशक्तिमान आहे”, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
हेही पहा –