चीन-भारत सीमेलगतच्या ओस पडलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील(LAC)जवळपास 500 गावांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठीचा प्लॅन देखील मोदी सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.
अडीच हजार कोटींचे बजेट
चीनसोबत असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जवळपास 500 गावे ओस पडली होती. या सर्व गावांतील लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे याठिकाणी आता राहणारे लोक फार कमी आहेत. त्यामुळे या गावांचा पुनर्विकास करण्यासाठी मोदी सरकारने कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी अडीच हजार कोटींचे बजेटही निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिका-यांकडून देण्यात येत आहे.
मुलभूत गरजांची पूर्तता करणार
सीमावर्ती भागांत ओस पडलेल्या या 500 गावांना सेकंड लाईन ऑफ डिफेन्सच्या दृष्टीकोनातून तयार करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. तसेच पुनर्वसन केल्यानंतर या गावातील लोकांना आरोग्य, शिक्षण यांसारख्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्यासाठी येथे राहणा-या नागरिकांना आश्वासन देण्यात येत असून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी संपर्क करण्यात येत आहे.
असा आहे प्लॅन
या भागांत घरे बनवण्यासोबतच पर्यटनाच्या सुविधाही वाढवण्यावर सरकार भर देणार आहे. जेणेकरुन इथे राहणा-या नागरिकांना उपजीविकेसाठी साधन मिळेल. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देखील केंद्र सरकार या भागांत नोक-या उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. किमान एक प्राथमिक शाळा, शाळेच्याच आवारात शिक्षकांना वास्तव्यासाठी निवासस्थाने तयार करण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community