अजित डोभाल यांच्या मुंबई दौऱ्यामागील काय आहे कारण?

150
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. राज्याचे गृहमंत्री पद फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे अजित डोभाल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागे अनेक मतितार्थ काढले जात आहेत. डोभाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी असली तरी हे शहर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मुंबई कायम दहशतवाद्यांच्या डोळ्यांवर असते. या शहराच्या सुरक्षेसाठी ही भेट झाली असावी, अशी चर्चा आता सुरु आहे. त्यातच ५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी सुरक्षेचा आढावा घेणे हाही या दौऱ्यामागील उद्देश असावा असे जाणकारांचे म्हणणे आहे.

मुंबई दहशतवाद्यांचे बनले टार्गेट? 

आजवर अजित डोभाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यापासून कधीच मुंबई दौऱ्यावर आले नव्हते, त्यामुळे डोभाल यांचा मुंबई दौरा विशेष चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबईला दशतवादी संघटनांकडून धमक्या मिळत आहेत. नुकतेच हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याकडे एक बोट सापडली होती, त्यात एके-४७ रायफल आणि दारू गोळा होता. हे प्रकरण सध्या एनआयए तपासात आहे. त्यातच आता बिष्णोई गॅंगचेही काही दहशतवादी महाराष्ट्रात पकडण्यात आले होते. आता कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याची टोळी भारतात अधिक सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा व्यवस्थेला मिळाली आहे. मुंबईत दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून दिशानिर्देश दिले जात आहे. त्यामुळे मुंबईत तयार करण्यात आलेली स्लीपर सेलदेखील सक्रिय होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेने दाऊदचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच दाऊदचा साथीदार छोटा शकील याचाही ठावठिकाणा सांगणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अशा प्रकारे केंद्रीय सुरक्षा व्यवस्था आता देशातील विशेषतः मुंबईत दहशतवादी कारवाया रोखणे आणि अशा कारवाया करण्याचा मनसुबा आखणाऱ्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर डोभाल यांचा मुंबईत दौरा विशेष लक्ष केंद्रित करत आहे, असे जाणकारांचे मत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.