आता कॅन्टोन्मेंट बोर्डाची कोरोनाविरोधात नागरी प्रशासनाला मदत!

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. अशावेळी नौदलाच्या पश्चिमी विभागाच्या तिन्ही रुग्णालयांचा नागरी क्षेत्रासाठी कोरोना उपचाराकरता वापर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता देशातील अनेक भागांतील कॅन्टोन्मेंट बोर्डांनी नागरी प्रशासनाला / राज्य सरकारांना सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. केवळ आपल्या परिसरातील निवासी नागरिकांना मदत करण्यापलीकडे जाऊन, वैद्यकीय मदतीची गरज असणाऱ्या सर्वांना येथे साहाय्य देण्यात येत आहे.

 

39 कॅन्टोन्मेंट बोर्डांचा पुढाकार!   

सध्या 39 कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये म्हणजेच छावणी मंडळांमध्ये (CB) 40 सर्वसामान्य रुग्णालये असून त्यात 1,240 खाटांची व्यवस्था आहे. पुणे, खडकी आणि देवळाली येथील 304 खाटांच्या CB रुग्णालयांना आता ‘कोविड समर्पित रुग्णालये’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. खडकी, देवळाली, देहूरोड, झाशी आणि अहमदनगर येथील 418 खाटांच्या छावणी सामान्य रुग्णालयांना (CGH) ‘कोविड काळजी केंद्र’ म्हणून दर्जा देण्यात आला आहे. देहूरोड येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्र पूर्णपणे सुसज्ज असून ते लवकरच सुरु केले जाणार आहे. तर खडकी येथील CGH मध्ये सहा खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात येत आहे. 37 छावणी मंडळांमध्ये प्राणवायू सहाय्यक सुविधा उपलब्ध आहे आणि सध्या त्यांच्याकडे 658 सिलेंडरचा साठा आहे.

(हेही वाचा : १ मेपासून १८ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण सुरु होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा )

रॅपिड अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्याची सुविधा!   

सर्व 39 CGH मध्ये फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आली आहेत. कोविड -19 ची लक्षणे दिसत असणाऱ्या रुग्णांना येथून कोविड उपचार सुविधा केंद्रांमध्ये पाठविले जाते. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून रॅपिड अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्या  नियमितपणे केल्या जात आहेत तसेच बहुतांश छावण्यांमध्ये लसीकरण केंद्रेही सुरु करण्यात आली आहेत. छावणी भागात सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जात आहे. इ-छावणी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा वापरण्यासाठी निवासी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. देशभरातील छावणी मंडळे म्हणजे संरक्षण मंत्रालयान्तर्गत काम करणाऱ्या नागरी संस्था होत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here