पाकिस्तानचा ‘ड्रोन’ दहशतवाद, भारतासमोर आव्हान! ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत

127

आपल्याकडील निरीक्षण रडार ही महत्त्वाच्या ठिकाणी लावलेली असतात, तीसुद्धा युद्धजन्य परिस्थितीत काम करत असतात. संपूर्ण साडेचार हजार पाकिस्तानी सीमेवरती किंवा ७ हजार ६०० किलोमीटर या समुद्री सीमेवर अशा प्रकारचे लक्ष ठेवणारी सिस्टिम आपल्याकडे नाही. कारण, ही सिस्टिम अतिशय महागडी असते. म्हणजेच पाकिस्तानने आपल्या विरुद्ध कमी पैसे लागणाऱ्या ड्रोन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने दहशतवाद सुरू केला आहे. ड्रोनचे तंत्रज्ञान आणि त्यांची निर्मितीही सोपी आहे. जर ड्रोनच्या मदतीने सीमावर्ती भागात शस्त्र किंवा स्फोटक पदार्थ किंवा अमलीपदार्थ पाठवत जात असतील, तर आपले रक्षण कसे करायचे? आपली रडार सातत्याने सुरू ठेवणे खर्चिक असते. म्हणजे काही ड्रोन्स सीमेवरून घुसल्याने आपण हजारो कोटी रुपये खर्च करून रडार कव्हरेज देण्याचा विचार करणे अव्यवहार्य आहे. म्हणून कमी किमतीने आपले रक्षण कसे करता येईल, यावर अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या रविवारी ४ जुलै २०२१ या दिवशी झालेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक असलेले ब्रिगेडियर महाजन यांनी यावेळी अलीकडेच झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत तपशीलवार माहिती दिली. तसेच गेल्या काही काळात झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याबाबतही माहिती देत त्यांना सॅल्यूट केले.

(हेही वाचा : खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नूः पाकिस्तानने पढवलेला ‘पोपट’)

काश्मीरमध्ये दोनशे- अडीचशे दहशतवादी!

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने ड्रोनच्या सहाय्याने एके-४७ रायफली, स्फोटके, अंमली पदार्थ आणि बनावट नोटाही भारतात पाठविल्या आहेत. पंजाबातील खलिस्तानी दहशतवाद्यांना ड्रोन्सद्वारे शस्त्रपुरवठाही केला जात आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या विकासकामांमधील वाढ, राजकीय चर्चा, पर्यटनामधील सकारात्मकता यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातूनच नाराज झालेल्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हिंसाचारालाही प्रोत्साहन दिले आहे, असे सांगत ड्रोन हल्ल्यांबाबत व ड्रोनच्या पाकिस्तानकडून वाढता वापर होत आहे. काश्मीरमध्ये भारतीय ऑल क्लीअर हे ऑपरेशन लष्कराने सुरू केले आहे. अजूनही तेथे दोनशे- अडीचशे दहशतवादी आहेत, त्यांना संपवण्यासाठी ही कारवाई सुरू केली गेली आहे. परदेशी दहशतवाद्यांच्या संख्येत घट झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वा बलुचिस्तानसारख्या भागात वा अन्य वझिरीस्तान आदी पाकिस्तानातील भागात राहाणारे  दहशतवादी बनण्यास तयार नाहीत. हाफिज सईद हा लष्कर-ए तोयबाचा प्रमुख आहे, त्याला पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रापुढे दिखावा करण्यासाठी स्थानबद्ध केले असले तरी त्याच्याकडून दहशतवादी कारवायाचे काम चालू आहे. मात्र ते पाकिस्तानच्या लष्कराला समाधानकारक वाटत नसल्याने आता त्याच्या घराच्या पुढेही स्फोट घडवण्यात आला आहे. त्यामागेही पाकिस्तानी लष्कर आहे ते नाखूश असल्यानेच त्यांनी सईदविरोधात ही इशाऱ्याची कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

ड्रोनला एअर डिफेन्स सिस्टिम लावणे कठीण 

या परिस्थितीमुळे त्यांनी ड्रोन हल्ले हा पर्याय आता पाकिस्तानने निवडला आहे. याबाबत अधिक माहिती देताना महाजन यांनी सांगितले की, जम्मूतील हवाई दलाच्या तळावर २७ जून या दिवशी पहाटेच्या सुमारास दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला ड्रोनने करण्यात आला होता व हे ड्रोन पाकिस्तानातून आले होते. देशात पहिलांदाच ड्रोनद्वारे हल्ला झाला आहे. तपासाची सूत्रे एनआयएकडे देण्यात आली आहेत. जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल एरियाजवळ स्फोट झाल्यामुळे दोन हवाई दलाच्या जवानांना किरकोळ जखमी व्हावे लागले. पाच मिनिटांच्या फरकाने दोन स्फोट झाले. पहिला स्फोट कॅम्पस इमारतीच्या छतावर आणि दुसरा त्या खाली झाला. हा स्फोट क्षेत्रात उभ्या असलेल्या विमानांना बरबाद करण्याकरिता होता. स्फोटके ड्रोनमधून खाली टाकण्यात आली होती. लष्कर- ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५ ते ६ किलो स्फोटकेही जप्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे ‘गुपकार’ गँगशी चर्चा केली. मात्र ७२ तासाच्या आत जम्मू-काश्मीरात हिंसाचार व दहशतवादी हल्ले सुरू झाले आहे. असे सांगून ते म्हणाले की,  ड्रोन्स कमी उंचीवरून उडतात. ते कोणत्याही दिशेने येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एअर डिफेन्स सिस्टिम लावणे सोपे नाही. भारतामध्ये सहा लाखांपेक्षा जास्त वैमानिकविरहित विमाने (यूएव्ही) अनियमित आणि त्यांच्या योग्य नोंदी नाहीत, असेही ब्रिगेडियर महाजन म्हणाले.

(हेही वाचा : किसान युनियन आंदोलन बनले गुन्हेगारांचा अड्डा!)

ड्रोन १०० ते २०० किमी उडू शकतात!

ड्रोन्स म्हणजे काय यासंबंधात ते म्हणाले की, ड्रोन हे अनमॅन्ड एरियल व्हेहिकल्स(मानवरहित) म्हणजे एक छोटे विमान जे रिमोटच्या मदतीने उडवता येते. ड्रोनची रेंज त्याच्या आकारावर, त्यातील तंत्रज्ञानावर अवलंबून असते. सध्या जे ड्रोन आपल्याकडे आहेत ते चार ते पाच किलो वजनापासून ते २०-२५ किलो वजन घेऊन १०० ते २०० किलोमीटर दूरपर्यंत जाऊ शकतात. ड्रोन्सचे चालक जमिनीवरून नियंत्रण करुन ड्रोन्स उडवितात. नियंत्रण जमिनीवरून होत असल्यामुळे उडण्याचे क्षेत्र मर्यादित असते. ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने संगणकीय आज्ञावली व उपग्रहीय संदेश वापरून एका ठराविक पूर्वनियोजित मार्गावरून उडविता येऊ शकते, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, या पार्श्वभूमीवर प्रश्न असा पडतो की, हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने आले. त्यांना आपल्या रडारने पाहिले का नाही? व्याख्यानानंतर यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

येत्या रविवारी मणिपूरस्थित लेफ्टनंट जनरल एल.एन.सिंग (निवृत्त) यांच्याशी हेमंत महाजन संवाद साधणार आहे. सुभाषचंद्र बोस याची इंडियन नॅशनल आर्मी मणिपूरमध्ये पोहोचली होती. त्यांनी तेथे काम केले, त्याबाबत सिंग बोलणार आहेत. तसेच लेफ्टनंट जनरल गौतम मूर्ती (निवृत्त) हे ऑर्डनन्स फॅक्टरीशी निगडित होते. त्यांच्याशीही ऑर्डनन्स विकासकार्याबाबत बातचित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे दिल्लीस्थित लेफ्टनंट जनरल  संजय कुलकर्णी (निवृत्त) यांच्याशी लडाखमधील स्थितीबाबत केल्या जाणाऱ्या नियोजित कामांबाबत चर्चा केली जाणार आहे, अशीही नियोजित ऑनलाइन कार्यक्रमांबाबत हेमंत महाजन यांनी माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.