तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करणार? वाचा तज्ज्ञांचे मत

पाकिस्तानने कायमच तालिबानला आपल्या हातातले बाहुले बनवून भारताविरोधी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे आताही पाकिस्तानकडून तसे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर तेथे फार मोठ्या प्रमाणात अराजकता माजली आहे. अफगाणिस्तानमधील नागरिक आपले प्राण वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावत आहेत. कट्टर इस्लामी संघटना असलेल्या तालिबानला हाताशी धरुन पाकिस्तान भारतात दहशतवादाला चालना देऊ शकतो का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानने कायमच तालिबानला आपल्या हातातले बाहुले बनवून भारताविरोधी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे आताही पाकिस्तानकडून तसे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे, असे या तज्ज्ञांचे मत आहे.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक निळू दामले, आंतरराष्ट्रीय विषयांवरील जाणकार शैलेंद्र देवळणकर आणि ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांनी या चर्चेत सहभागह घेतला होता.

(हेही वाचाः अफगाणिस्तानचा खरा गुन्हेगार कोण? जो बायडेन कि अशरफ घनी?)

भारत विरोधी जिहाद सुरू करण्याचे प्रयत्न

आयएसआय तालिबान्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संदर्भात आता पाकचं महत्त्व वाढणार आहे. जैश-ए-मोहम्मद आणि तालिबान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे भारतात दहशतवाद वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तालिबानकडून ट्रेनिंग देऊन त्यांचं नैतिक धैर्य वाढवण्याचे प्रकार आयएसआयकडून होत आहेत. जागतिक पातळीवर इस्लामिक अजेंडा चालवण्यासाठी तुर्कस्तान आणि पाकिस्तानला तालिबानची आवश्यकता आहे. जगभरातील जिहादी चळवळींना समर्थन देण्यासाठी हा प्रकार आहे. असे या तज्ज्ञांचे मत आहे.

तालिबान बदललेलं नाही

2001 साली अफगाणिस्तानमधून तालिबानची सत्ता उलथून टाकल्यानंतर तालिबान शांत झाले आहे, अशी अफवा पसरवण्यात आली होती. पण तसे अजिबात नाही. काबुल शहराला लागून असलेल्या भागात गेली 20 वर्ष तालिबानची सत्ता होती. तिथला म्होरक्या लोकांकडून कर गोळा करत होता. तालिबानचे कायदे देखील तिथे लागू करण्यात आले होते. इतकंच नाही तर काबुल, कंधारसारख्या मोठ्या शहरांचे प्रमुख भाग सोडले तर इतर ठिकाणी तालिबानची सत्ता होतीच. त्यामुळे अफगाणिस्तानात तालिबानने आपली पाळेमुळे पूर्वीपासून रुजवली आहेत, ही संघटना कधीही बदललेली नव्हती, असे मत ज्येष्ठ विश्लेषक निळू दामले यांनी व्यक्त केले.

(हेही वाचाः अफगाणिस्तान का बनतोय महासत्तांसाठी स्मशानभूमी? जाणून घ्या… )

अफगाणिस्तान आता शत्रू राष्ट्र

पाकिस्तानच्या आयएसआयने तालिबानच्या दो-या आपल्या हातात धरण्याचा प्रयत्न गेल्या 15 वर्षांपासून केला आहे. त्यात चीनने तालिबानला पाठिंबा दिला आहे, कारण चीनला तिथे आर्थिक फायदा दिसत आहे. त्यामुळे भारतावर याचा भयानक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तान आणि भारत आधी मित्र राष्ट्र होती. पण ते चित्र गेल्या काही दिवसांत पूर्णपणे बदलले आहे. आता चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेले अफगाणिस्तान हे भारताचे शत्रू राष्ट्र असणार आहे, असे ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांनी सांगितले.

अमेरिकेची सगळ्यात मोठी चूक

तालिबानमधून लष्करी सैन्य हटवण्याचा अमेरिकेने घेतलेला निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतलेले अनेक निर्णय आजवर अमेरिकेच्या अंगलट आलेले आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य हटवण्याची चर्चा ओबामांच्या काळापासून सुरू होती.डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातही ही चर्चा जोर धरत असल्यामुळे, फेब्रुवारी 2020मध्ये तालिबानसोबत दोहा करार करण्यात आला. पण तरीही सैन्य हटवण्याचं धाडस अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी केले नाही. जर जर्मनी आणि जपानमध्ये अमेरिकेने आजही आपली फौज ठेवली आहे. मग अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांपासून असलेले सैन्य ठेवायला हरकत काय होती?, असा सवाल आंतरराष्ट्रीय विषयांवरील जाणकार शैलेंद्र देवळणकर यांनी उपस्थित केला. ही अमेरिकेची सगळ्यात मोठी चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः अफगाण मुस्लिम बनले शरणार्थी! भारतीय मुस्लिम होतायेत टीकेचे धनी!)

दोहा कराराचा भंग

फेब्रुवारी 2020 मध्ये तालिबान आणि अमेरिकेत करण्यात आलेल्या दोहा करारामुळे संपूर्ण प्रकरणाला एक अनपेक्षित वळण लाभले. या करारात तालिबानला काही अटी घालून देण्यात आल्या होत्या. या अटी तालिबानने पूर्ण करण्याचे तालिबानने आश्वासन दिले होते. त्यावेळी 14 महिन्यांत अमेरिका आपले सैन्य माघारी घेईल, असे करारात ठरवण्यात आले होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपिओ आणि तालिबानच्या नेत्यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या होत्या.

या आहेत करारातील अटी 

  • अमेरिकन सैन्य परतल्यानंतर तालिबान अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही.
  • नवीन सरकार स्थापन करण्यासाठी ते राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणीसोबत चर्चा करतील.
  • तेथील महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही.

पण या कराराचा भंग तालिबानकडून होताना दिसत आहे, असे मत शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केले. पुरुषांनी दाढी ठेवावी, महिलांनी घराबाहेर पडू नये असे नियम आता तालिबानकडून लादण्यात आले आहेत.

अमेरिकेने पोलिसगिरी करत फिरू नये

अमेरिकेला तालिबानमध्ये लोकशाही प्रस्थापित करता आली नाही. लादेनचा काटा काढण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात आपले सैन्य ठेवले आणि ती अमेरिकेची चूक होती. अफगाणिस्तानवर तालिबानचा प्रभाव आहे. कारण तालिबानची मूळं तिथे आहेत. एखाद्या देशात लोकशाही प्रस्थापनासाठी इतर देशांनी जाऊन तिथे कधीही लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. शिक्षण आणि विज्ञानाचा अभाव असलेल्या देशांत सामाजिक बदल झाल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे अमेरिकेने जगभर पोलिसगिरी करत फिरू नये, असे परखड मत निळू दामले यांनी व्यक्त केले.

(हेही वाचाः तालिबानची दहशत: अमेरिकन म्हणतायेत ‘कम बॅक डोनाल्ड ट्रम्प’!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here