काश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडले, मात्र पाकिस्तानी घुसखोरीमुळे लढाई सुरुच राहाणार

पाकिस्तानकडे दहशतवादी घुसवण्याची क्षमता अधिक असून त्यामुळेच काश्मीर खोऱ्यात ही लढाई सुरूच राहाणार आहे.

139

काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे जवळजवळ मोडून काढले आहे. लडाखमध्ये दहशतवाद नाही, जम्मू-उधमपूर येथेही दहशतवादी कृत्ये नसल्याचे दिसते. मात्र काश्मिरी खोऱ्यामध्ये आजही दोनशेच्या आसपास दहशतवादी असून, भारतीय लष्कर कारवाई करुन त्यांना मारत आहे. मात्र पाकिस्तानकडे दहशतवादी घुसवण्याची क्षमता अधिक असून त्यामुळेच काश्मीर खोऱ्यात ही लढाई सुरूच राहाणार आहे, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटर ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते.

काराकोरम युद्धाचे तीन भाग

हेमंत महाजन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रविवारी १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘गेल्या ७५ वर्षांत संरक्षण क्षेत्रातील बदल, आव्हाने व उपाय योजना’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापासून लढलेली युद्धे, त्यानंतर पाकिस्तानने बदललेले लढाईचे धोरण, जो एक नवीन प्रकारच्या युद्धाचा भाग आहे. त्याला त्यांनी ऑपरेशन काराकोरम असे नाव दिले आहे, असे त्यांनी सांगितले. या काराकोरममध्ये नेमके काय आहे, ते सांगताना महाजन म्हणाले की, काराकोरम युध्दाचे तीन भाग होते. काराकोरम एक म्हणजे खलिस्तान, काराकोरम दोन म्हणजे कश्मीरमध्ये छुपे युध्द किंवा दहशतवाद आणि काराकोरम तीन म्हणजे देशाच्या इतर भागात दहशतवाद सुरू करणे. ऑपरेशन काराकोरमची परिस्थिती काय आहे आणि आपण ते कसे लढतो, हे समजणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी त्याची तपशीलवार माहिती दिली.

(हेही वाचाः तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करणार? वाचा तज्ज्ञांचे मत)

भारतीय सैन्याला सदैव तयार राहावे लागेल

त्याचप्रमाणे अंतर्गत सुरक्षेची आव्हाने, बाह्य सुरक्षेची आव्हाने, सोशल मीडिया, हायब्रीड युद्ध, आर्थिक युद्ध वा व्यापार युद्ध आदींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. सध्याच्या अफगाणिस्तानातील स्थितीच्या संबंधात त्यांनी सांगितले की, अमेरिकी सैन्य परत जाऊ लागले आणि त्यामुळे अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात गृहयुध्द सुरू झाले आहे. तालिबान्यांना पाकिस्तान आणि चीन मदत करत आहे. येणाऱ्या काळात या गृहयुध्दाची व्याप्ती अधिक वाढेल. तालिबान सत्तेमध्ये आले तर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने भारतात दहशतवाद वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, म्हणून दहशतवादाच्या लढाईसाठी भारतीय सैन्याला सदैव तयार राहावे लागेल.

(हेही वाचाः आता चर्चा शरिया कायद्याची…नेटकऱ्यांना का आठवले हमीद अन्सारी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.