कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव

195

भारताने आजवर पाकिस्तानसोबत ३ लढाया केल्या आणि त्या जिंकल्याही. प्रत्येक युद्ध भारतीय सैनिकांनी त्यांच्यातील जाज्ज्वल्य देशाभिमान आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जिंकले आहे. यातीलच एक १९९९सालचे कारगिल युद्ध होते. उणे २० सेल्सियस तापमानात कारगिलमधील टेकड्यांवर विशेषतः टायगर हिलवर हजारो फूट उंचीवर घुसखोरी करून लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याचा खात्मा करणे हे भारतीय सैनिकांसमोर मोठे आव्हान होते. तरीही भारतीय सैनिकांनी प्राणाची बाजी लावून हे युद्ध जिंकले. या युद्धात विजय प्राप्तीपर्यंत आपल्या प्राणाची बाजी लावून लढणारे परमवीरचक्र सन्मानित कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव यांचे अनुभव ऐकण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळाली. त्यांचे युद्धातील थरारक अनुभव ऐकताना उपस्थितांचा राष्ट्राभिमान जागृत झाला.

tiger hill

श्री गुरुदत्त को. ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने असीम फाउंडेशनच्या वतीने रविवार, ८ जानेवारी रोजी ‘कारगिल विजयगाथा टायगर हिलची लढाई’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत परमवीरचक्र सन्मानित कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव यांची मुलाखत असीम फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी यांनी घेतली. यावेळी कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी टायगर हिलची लढाई कशी जिंकली आणि त्यावेळी त्यांनी कसा युद्धात सहभाग घेतला, त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्याला ठार करताना भारतीय सैनिकांनी कसे शौर्य दाखवले याचे जिवंत वर्णन केले. त्यांचे अनुभव ऐकून उपस्थितांमध्ये देशाभिमान जागृत झाला. उपस्थित श्रोत्यांनी उत्फुर्तपणे ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.

(हेही वाचा # Exclusive शिवसेना कुणाची? निवडणूक आयोग घेणार आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची ओळख परेड )

उन्हे २० डिग्री सेल्सियस तापमानात सामग्री पोहचवण्याची जबाबदारी 

ही लढाई २२ दिवस चालू होती. त्यामध्ये केवळ ३ जवान पाणी आणि अन्नाशिवाय राहू शकले. त्यातील मी एक होतो, असे सांगत परमवीरचक्र सन्मानित कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या युद्धातील शौर्यगाथा सांगण्यास प्रारंभ केला. युद्ध सुरु झाले तेव्हा सुरुवातीला आपल्याला उणे २० डिग्री सेल्सियस तापमानात दररोज दारुगोळा आणि अन्न सामग्री टेकडीवर चढून सैनिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली. त्यावेळी टेकडीवरून पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार सुरु असायचा. तेव्हा प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या भारतीय सैनिकांपर्यंत सामग्री पोहचवणे या एकाच उद्देशाने आपण अंधार झाल्यावर टेकडी चढायला सुरुवात करायचो आणि रात्रीच्या अंधारात जीवघेण्या थंडीच्या वातावरणात सैन्यांपर्यंत पोहचायचो. असा दिनक्रम असायचा, असे परमवीरचक्र कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव म्हणाले.

टायगर हिल काबीज करण्याची जबाबदारी  

जेव्हा ऑपरेशन संपवण्यात येणार असा संदेश मिळाला तेव्हा ३/४ जुलै १९९९च्या रात्री ‘घातक पलटणी’वर टायगर हिल काबीज करण्याची जबाबदारी सोपवली होती. टायगर हिलवरील पाकड्यांचा कसा नायनाट करायचा, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी आम्ही अवघे ७ जवान उरलो होतो. आम्ही रणनीती ठरवली आणि त्या रणनीतीनुसार टेकडीवर कूच करण्याचा निर्णय घेतला. या टेकडीवर जाण्याचा रस्ता उभ्या कड्यांचा, खडकाळ व बर्फाच्छादित होता. अशा रस्त्यावर जाण्यासाठी त्यामध्ये असणाऱ्या धोक्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपण स्वतः पुढाकार घेतला आणि आपल्या तुकडीतील सैनिकांना वर चढण्यासाठी दोरखंड लावले. वर चढणाऱ्या सैनिकांना पाहून शत्रूने स्वयंचलित तोफांमधून भडीमार सुरु केला. त्यामुळे आमचे दोन सहकारी आणि कमांडर मारले गेले. पलटणीचे काम खोळंबले, असेही कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव म्हणाले.

(हेही वाचा २३ जानेवारीला उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे एका मंचावर?; शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच येणार एकत्र)

गंभीर जखमी अवस्थेत हल्ला सुरु ठेवला  

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण शत्रूच्या ठिकाणापर्यंत रांगत पोहचलो. पाकिस्तानी सैनिकांच्या तोफांचा आवाज बंद करायचा प्रयत्न केला. पाकिस्तानी सैन्यांनी आपल्यावरही गोळीबार केला. आपल्या जखमांकडे व शत्रूच्या माऱ्याकडे दुर्लक्ष करून, आपण शत्रूच्या ठिकाणांकडे चढतच राहिलो आणि शत्रूवर हातगोळे भिरकावत राहिलो. आपल्या बंदुकीतून शत्रूवर सतत गोळीबार करत राहिलो. जवळच्या झटापटीत पाकिस्तानच्या चार सैनिकांना कंठस्नान घातले. त्यांच्या स्वयंचलित तोफा निकामी केल्या. बंदुकीच्या गोळ्यांनी आपण गंभीर जखमी झालो त्या अवस्थेतही रेंगत टेकडीवरून खाली आलो. खाली असलेल्या भारतीय सैन्यांच्या तळापर्यंत आलो तेव्हा प्रचंड जखमांनी आणि रक्ताने शरीर माखले होते. अशाही परिस्थितीत आपल्याला केवळ टेकडीवर असलेल्या आपल्या साथीदारांची चिंता भेडसावत होती. त्या तळमळीने आपण अधिकाऱ्यांना टेकडीवरील परिस्थिती ज्ञात करून दिली. त्यानुसार तातडीने नवीन तुकडी टायगर हिलवर मदतीसाठी पाठवून दिली. आपल्या धीरोदात्त कामगिरीने प्रोत्साहित होऊन सैनिकांनी जोरदार हल्ला चढवला आणि अखेर टायगर हिल काबीज केले, असे कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.