पाकिस्‍तान फुटीच्या उंबरठ्यावर! 

अमेरिकेच्‍या नेत्‍या हिलरी क्‍लिंटन यांनी वर्ष २०११ मध्‍ये केलेले एक अत्‍यंत प्रसिद्ध वक्‍तव्‍य जगभर गाजले. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या, ‘तुम्‍ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्‍हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’ हे वक्‍तव्‍य त्‍यांनी पाकिस्‍तानसंबंधी केले होते. आज पाकिस्‍तानला याची प्रचीती येतांना दिसत आहे. पाकिस्‍तानने आतंकवादाच्‍या रूपाने जी विषवल्ली पोसली होती, तीच आता त्‍यांना डंख मारू लागली आहे. ज्‍या पाकने एक हत्‍यार म्‍हणून आतंकवादाचा वापर केला, आतंकवादाला निर्यात करणारा कारखाना (फॅक्‍टरी) म्‍हणून जो जगभरात कुप्रसिद्ध आहे, तोच आज आतंकवादाचा पीडित आहे. पाकने केलेल्‍या कर्माची ही फलनिष्‍पत्ती आहे. आज पाकच्‍या मानगुटीवर आतंकवादाचे भूत अत्‍यंत घट्ट पकड घेऊन बसले आहे. परिणामी जगभरातील अभ्‍यासक आता असे म्‍हणत आहेत, ‘वर्ष १९७१ मध्‍ये ज्‍याप्रमाणे पूर्व बंगाल फुटून पाकमधून बाहेर पडला आणि स्‍वतंत्र बांगलादेश म्‍हणून उदयाला आला. तशाच प्रकारे पश्‍चिम पाकिस्‍तान आता फुटण्‍याच्‍या मार्गावर आहे.’ थोडक्‍यात पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याची वेळ आता आली आहे. आधीच दिवाळखोरीमुळे भिकेकंगाल झालेल्‍या पाकिस्‍तानसाठी हा दुष्‍काळात तेरावा महिना आहे. विशेष म्‍हणजे अत्‍यंत बिकट बनलेल्‍या या अवस्‍थेतून मार्ग काढण्‍यासाठी पाकच्‍या साहाय्‍याला अमेरिकाही जवळ नाही; कारण अमेरिकेने अफगाणिस्‍तानातून माघार घेतलेली आहे. दुसरीकडे चीनही अलीकडील काळात पाकविषयी सावध पावले उचलू लागला आहे. त्‍यामुळे पाकिस्‍तान आता पूर्णपणे एकाकी पडला आहे. परिणामी त्‍याचे विभाजन अटळ असल्‍याचे मानले जात आहे.

पाकिस्तानात दोन सरकारे 

‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्‍तान’ ही आतंकवादी संघटना पाकमध्‍ये पुन्‍हा एकदा सक्रीय झालेली आहे. या संघटनेने पाकमध्‍ये मोठ्या प्रमाणावर आतंकवादी आक्रमणे चालू केली आहेत. नोव्‍हेंबरमध्ये या संघटनेने १०० हून अधिक, तर डिसेंबर महिन्यात ६० हून अधिक आतंकवादी आक्रमणे घडवून आणली आहेत. वर्ष २०२२ मध्‍ये या आतंकवादी संघटनेने केलेल्‍या विविध आक्रमणांमध्‍ये पाकचे जवळपास २ हजार सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. या संघटनेची शक्‍ती आता इतकी वाढली आहे की, तिने पाकच्‍या अंतर्गत असणाऱ्या काही क्षेत्रांवर स्‍वतःचा दावा सांगितला आहे. केवळ यावर न थांबता तिथे त्‍यांनी स्‍वतंत्र सरकार स्‍थापन केले आहे. त्‍यामुळे एकीकडे शाहबाज शरीफ यांचे, तर दुसरीकडे तेहरिक-ए-तालिबान पाकिस्‍तानचे सरकार अशी दोन सरकारे पाकिस्‍तानात आजघडीला दिसत आहेत. पाकिस्‍तानच्‍या आजवरच्‍या ७५ वर्षांच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे.

पाकने पोसलेला भस्‍मासूर पाकिस्तानवरच उलटला 

जून २०२२ मध्‍ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्‍तान (टीटीपी) या संघटनेशी पाकने युद्धबंदीचा एक करार केला होता. तो करार नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये संपुष्‍टात आला. त्‍यानंतर या संघटनेने पाकमध्‍ये मोठ्या संख्‍येने आतंकवादी आक्रमणे चालू केली. या पार्श्‍वभूमीवर ही युद्धबंदी का संपुष्‍टात आली? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्‍ये अफगाणिस्‍तानातील तालिबान सरकारने मध्‍यस्‍थी केलेली होती; परंतु पाकने याचा गैरफायदा घेण्‍याचा प्रयत्न केला. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्‍तानच्‍या अनेक नेत्‍यांना पाकिस्‍तानी सैन्‍याने यमसदनी धाडले. परिणामी या युद्धबंदीचा लाभ पाक सरकारलाच अधिक झाला. या मधल्‍या काळात या संघटनेची अफगाणिस्‍तानातील प्रशिक्षण स्‍थळे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यास प्रारंभ केला. त्‍यामुळे आता युद्धबंदी संपल्‍यानंतर ही संघटना कमालीची आक्रमक झालेली दिसत आहे. वझिरीस्‍तान आणि स्‍वात या दोन प्रांतात या संघटनेने स्‍वत:चे सरकार स्‍थापन केले आहे. त्‍यामुळे या भागात पाकमधील लोकशाही सरकार नसून शरीयतवर आधारित कट्टर इस्‍लामी शासन प्रस्‍थापित करण्‍यात आले आहे. इतकेच नव्‍हे, तर त्‍यांनी आता सर्व तालिबान्‍यांना आमंत्रित केले असून त्‍यांच्‍याकडे प्रचंड मोठा शस्‍त्रास्‍त्रसाठाही आहे. त्‍यामुळे पाकने पोसलेला भस्‍मासूर त्‍याच्‍यावरच उलटला आहे.

पाकिस्तानची तीन शकले होणार 

वस्‍तूत: वर्ष २०१० मध्‍ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्‍तान ही संघटना फुटून तिचे १० तुकडे झाले होते; पण आता ते सर्व तुकडे एकत्र झाले असून त्‍यांनी पाकिस्‍तानविरुद्ध एल्‍गार (युद्ध) पुकारला आहे. या संघटनेने बलुचिस्‍तानातील ‘बलुच लिबरेशन आर्मी’लाही समर्थन देण्‍यास प्रारंभ केला आहे. त्‍यामुळे ही आर्मी प्रबळ बनली असून तेथे पुन्‍हा एकदा स्‍वतंत्र बलुचिस्‍तानची मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी येणाऱ्या काळात एकीकडे बलुचिस्‍तान आणि दुसरीकडे पख्‍तुनिस्‍तान पाकिस्‍तानपासून वेगळे होऊ शकतात. अशा प्रकारची अत्‍यंत भीषण परिस्‍थिती पाकिस्‍तानात उद़्‍भवली आहे. या परिस्‍थितीतून बाहेर पडण्‍यासाठी पाकिस्‍तानला पुन्‍हा एकदा ‘टीटीपी’सह शस्‍त्रसंधी करावी लागेल. यासाठी पाकला त्‍यांच्‍यापुढे झुकावे लागेल; परंतु असे करण्‍याने त्‍याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाचक्‍की होईल. त्‍यामुळे शाहबाज शरीफ सरकार किंवा पाक सैन्‍य यासाठी सिद्ध होणार नाही. दुसरीकडे पाकला चीनचे साहाय्‍य मिळणे अवघड दिसत आहे. अमेरिका या प्रश्‍नापासून पूर्णत: अलिप्‍त रहाण्‍याच्‍या भूमिकेत आहे. त्‍यामुळे येत्‍या काळात ‘टीटीपी’ची आक्रमणे वाढण्‍याची शक्‍यता आहे. तसे झाल्‍यास पाकपुढील अडचणी कमालीच्‍या वाढतील. ‘टीटीपी’चा सामना करण्‍यासाठी आणि आतंकवादी आक्रमणे रोखण्‍यासाठी पाक सरकारला सैन्‍यावर अधिक खर्च करावा लागेल. त्‍यातून पाकचा आर्थिक पाय अधिक खोलवर रुतला जाईल. दुसरीकडे आतंकवादी आक्रमणांमुळे निर्माण झालेल्‍या अशांतता आणि असुरक्षितता यांमुळे पाकमधील गुंतवणूक न्‍यून होईल. या सर्वांचा परिणाम म्‍हणजे पाक हा दुभंगलेला व कंगाल झालेला देश बनेल.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर (लेखक परराष्‍ट्र धोरण विश्‍लेषक आहेत.)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here