अवकाश क्षेत्रातील भारताच्या हितसंबंधांचे होणार रक्षण!

215

अवकाश विभागाच्या माध्यमातून, अवकाश क्षेत्रातील भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार सक्रियपणे प्रयत्न करत असते. त्यासाठी अवकाश वहन, पायाभूत सुविधा आणि त्याचा वापर अशा क्षेत्रात आपल्या सर्वांगीण क्षमता वाढवण्याचे काम सातत्याने केले जाते. त्याशिवाय, भारतीय उपग्रहांचे तसेच कक्षेतील इतर साधनांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, इस्रो, अवकाशातील वाढता कचरा कमी करण्याच्या सर्व आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये सहभाग घेत असते, जेणेकरुन, बाह्य अवकाश दीर्घकाळ, शाश्वत स्वरूपात वापरता येऊ शकेल. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

अवकाशातील कचऱ्याचा अभ्यास आणि अवकाशाच्या स्थितीबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या आंतर-संस्था अवकाश कचरा समन्वय समिती (IDAC) सह, आयएएफ अवकाश कचरा कृती गट, आयएए अवकाश वाहतूक व्यवस्थापन कृती गट, आयएसओ अवकाश कचरा कृती गट आणि UNCOPUOS दीर्घकालीन कृती दल अशा सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांचा इस्रो सक्रिय सदस्य आहे.

गगनयान अभियानाची सद्यस्थिती

बंगळुरु इथे अंतराळवीर प्रशिक्षण सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे. या नव्या प्रशिक्षण केंद्रात, प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही सुरु करण्यात आला आहे. गगनयानातील सर्व व्यवस्था आणि उपव्यवस्थांची संरचना पूर्ण करण्यात आली आहे. आता हे रेखाटन प्रत्यक्ष स्वरुपात विकसित करण्याचे काम विविध पातळ्यांवर सुरु आहे. ह्युमन रेटेड क्रायोजेनिक इंजिन म्हणजेच अवकाश यानाची दीर्घकाळ अंतराळवीराला नेण्याच्या व्यवस्थेची क्षमता चाचणी तसेच विकास इंजिनाची पहिल्या टप्प्यातील ह्युमन रेटेड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. गगनयान सेवा मोडयूल चलनशक्ति व्यवस्थेच्या प्रात्यक्षिक चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

(हेही वाचा – इलेक्ट्रिक वाहन घ्यायचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार, कारण…)

सेवा पुरवठादारांसोबत ग्राउंड नेटवर्कसाठी संकल्पनेचे प्रात्यक्षिक देखील पूर्ण झाले आहे. ऑर्बीटल म्हणजेच कक्षीय मोड्यूलच्या एकात्मिक प्रणालीच्या उभारणीचे काम पूर्ण होत आले आहे. सामंजस्य करार, कंत्राट आणि अंमलबजावणी व्यवस्थेशी संबंधित सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामे नियोजित कार्यक्रमानुसार सुरु आहेत. अनेक मानवकेंद्री उत्पादनांची संरचना पूर्ण झाली असून त्याचे अनेक नमुने प्रत्यक्ष तयार करण्याचे काम सुरु आहे.

खाजगी क्षेत्रे, स्टार्ट अप्सना सरकारचं प्रोत्साहन

मेसर्स ग्लॅव्हकोमोस (रशिया) आणि सीएनईएस (फ्रांस) या कंपन्यांना दिलेल्या कंत्राटांनुसार गगनयानसाठी साहित्य आणि उपकरणे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या तंत्रज्ञांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचे कार्यान्वयन आणि सरावाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. प्रत्यक्ष अभियानाच्या वेळी, आवश्यक त्या सर्व किरकोळ कामांसाठीची व्यवस्था सविस्तरपणे करण्यात आली आहे. सूक्ष्मगुरुत्वाकर्षण विकसनाशी संबंधित प्रयोगांच्या सगळ्या व्यवस्था सुरु करण्यात आल्या आहेत. या प्रयोगांसाठीची संकल्पनात्मक रेखाचित्रांची समीक्षा सुरु आहे. गगनयान अभियानाशी संबंधित कामे जसे की हार्डवेअर, विविध उपकरणांचा पुरवठा, आरोग्य नियंत्रण उपकरणे, व्हर्च्युअल रिएलिटी सिम्युलेटर इत्यादींसाठी खाजगी क्षेत्रे आणि स्टार्ट अप्सना सरकार प्रोत्साहन देत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.