भारतीय सैन्यातील अग्निपथ योजनेंतर्गत आता वायू सेनेत अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. त्यासाठीची अधिसूचना भारतीय वायू सेनेने जारी केली आहे. जानेवारी 2023 च्या बॅचसाठी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती केली जाणार आहे.
कोण करु शकतात अर्ज?
17.5 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेतून हवाई दलात भरती होण्यास पात्र असणार आहेत. 7 नोव्हेंबरपासून इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 23 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख आहे. अग्निवीरांसाठी ऑनलाईन परीक्षा 18 ते 24 जानेवारी 2023 या काळात घेण्यात येणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत हवाई दलात भरती होणा-या अग्निवीरांना 4 वर्ष वायू दलात नोकरीची संधी मिळणार आहे.
(हेही वाचाः 10 वर्षे नोकरी केल्यानंतरही मिळते पेन्शन, फक्त ‘हे’ काम करा! काय सांगतो EPFO चा नियम)
काय आहेत पात्रता?
वायूसेनेतील भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना बारावीमध्ये गणित,भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांत किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्ष डिप्लोमा केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
कुठे कराल अर्ज?
अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलातील भरतीसाठी agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी या वेबसाईटवर उमेदवारांना आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर लॉगिन करुन उमेदवारांना अर्ज भरता येईल आणि अर्जाची 250 रुपये रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
Join Our WhatsApp Community