भारतीय सैन्य दलात अग्निवीरांची भरती केली जाणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. आता याबाबत भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी वायुसेना दिनाचे औचित्य साधत दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यानुसार भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेतून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. तसेच, हवाई दलात एक नवीन शाखा सुरु केली जाणार आहे.
भारतीय हवाई दलात करिअर करण्यासाठी प्रत्येक अग्निवीराकडे योग्य कौशल्य आणि ज्ञान असावे यासाठी आम्ही आमच्या ऑपरेशनल प्रशिक्षण पद्धतीत बदल केला आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये आम्ही 3 हजार प्राथमिक प्रशिक्षणासाठी हवाई दलात समाविष्ट करणार आहोत. पुरेसा कर्मचारी वर्ग असावा यासाठी येत्या काही वर्षांत ही संख्या वाढवण्यात येईल. पुढच्या वर्षीपासून महिला अग्निवीरांना सहभागी करुन घेण्याचाही आमचा विचार आहे. या संदर्भातल्या पायाभूत सुविधांचे काम प्रगतिपथावर आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा: अभियंत्यांच्या मागणीवर पुन्हा आयुक्तांचे दुर्लक्ष; मुख्यमंत्र्यांना दिलेल्या शब्दांचा पडला विसर )
Join Our WhatsApp Community