अंतराळ विभाग आणि इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, खासगी क्षेत्रासाठी खुली केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिशः लक्ष घातल्यामुळे केवळ दोन वर्षांत अंतराळ विभागाच्या इस्रोकडे 55 पेक्षा अधिक स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली आहे. त्याखेरीज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त यावर्षी 75 विद्यार्थी-उपग्रहदेखील प्रक्षेपणाच्या वाटेवर आहेत.केंद्रीय राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. ते सर्व विज्ञानविषयक मंत्रालये आणि विभागांच्या चौथ्या संयुक्त बैठकीच्या वेळी बोलत होते.
2022-23 अखेरपर्यंत स्टार्टअपचे 9 प्रस्ताव पूर्ण होणार
55 प्रस्तावांपैकी 29 प्रस्ताव उपग्रहांशी संबंधित आहेत, 10 प्रस्ताव अंतराळविषयक उपयोजना आणि उत्पादनांविषयी आहेत, 8 प्रस्ताव प्रक्षेपकासंदर्भात आहेत, आणि 8 प्रस्ताव भूमीवरील प्रणाली आणि संशोधन याविषयी आहेत, असे त्यांनी सांगितले. 2022-23 अखेरपर्यंत स्टार्टअप उद्योगांचे 9 प्रस्ताव पूर्ण होण्याची अपेक्षाही सिंह यांनी व्यक्त केली.अंतराळ विभागाचे सचिव एस.सोमनाथ यांनी 75 विद्यार्थी-उपग्रहांची तसेच आझादीसॅटची तपशीलवार माहिती दिली.
(हेही वाचा – स्वदेशी बनावटीच्या जहाजरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी )
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हे उपग्रह यावर्षी प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे. डॉ.जितेंद्र सिंह यांनी विज्ञान माध्यम केंद्राचा प्रस्ताव ठेवला. सर्व विज्ञान तंत्रज्ञान विभागांसाठी हे केंद्र एकात्मिक आंतरमंत्रालयीन माध्यम केंद्र म्हणून काम करेल आणि विज्ञान प्रसार केंद्र त्यातच विलीन होईल, असेही त्यांनी सांगितले. विविध विभागांच्या तसेच स्टार्टअप उद्योगांच्या यशोगाथा सादर करून शक्य तेथे त्या गोष्टी पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विभागांना व अधिकाऱ्यांना केले. या यशोगाथांवर आधारित कार्यशाळाही नित्यनेमाने घेता येतील, असेही ते म्हणाले.