भारतीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर खऱ्या अर्थाने लोकशाही विचार मानणारे, त्याचा प्रचार करणारे होते. त्यांच्या भाषणात, लेखात विविध ठिकाणी अशा अर्थाचे उल्लेख येतात. ३१ ऑगस्ट १९३७ या दिवशी एका भाषणात ते म्हणतात, ‘हिंदुस्थानच्या संसदेत जात-धर्म निर्विशेष (भेद न करता) सर्वांना समानतेने पाहिले पाहिजे. प्रत्येकास एकच मत पाहिजे. मी चार हिंदूंसाठी पाच मते मागत नाही, मात्र आज चार मुसलमानांना सहज मतांचा अधिकार दिला जातो. ते मला मान्य नाही.’ सर्व धर्मांना सारखाच न्याय आणि समान नियम असावेत हे त्यांचे मत त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.
( हेही वाचा : हैदराबादमध्ये ‘मॉडेल कॉरिडोर’! सायकल ट्रॅक पादचारी मार्गासह, वीजनिर्मितीसाठी सौर छताची सुविधा )
स्वतंत्र हिंदुस्थानचा ध्वज कसा असावा, याविषयी स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीपासूनच अनेक विचारवंत, लेखक वेगवेगळी मते मांडत होते. अखिल हिंदु ध्वज हा वीर सावरकरांनी निर्मिलेला कुंडलिनी-कृपाण-स्वस्तिक भगवा ध्वज आहे. अभिनव भारताच्या वतीने जर्मन स्टटगार्टला १९०७ मध्ये मॅडम कामांनी आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट काँग्रेसमध्ये फडकावलेला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या वीर सावरकरनिर्मित ध्वज तिरंगी होता, ज्यावर लाल, केसरी, हिरवा असे पट्टे, वन्दे मातरम, चंद्र-सूर्य आणि त्याकाळी असलेले ८ प्रांत, त्यांचे प्रतीक म्हणून ८ कमळे होती.
आताचा आपला राष्ट्र ध्वज तिरंगीच आहे. त्यावर आधी काँग्रेसचा चरखा होता. (हे ध्वजाचे रंग विविध धर्मांचे नाहीत, तर केशरी रंग त्याग आणि शौर्याचा, पांढरा रंग शांतीसाठी आणि हिरवा समृद्धी, सुख आणि धर्मचक्र प्रगतीची प्रतिके आहेत.) वीर सावरकरांच्या सूचनेनंतर चरख्याऐवजी संविधानातील २४ आरे असलेले निळ्या रंगाचे गोल चक्र मधील पांढऱ्या पट्ट्यावर अंकित केले गेले. हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे. राष्ट्रभाषेविषयी सुद्धा वीर सावरकरांनी स्पष्ट सूचना (६ नोव्हेंबर १९४४ चे पत्रक) दिली होती. संस्कृतनिष्ठ हिंदी ही राष्ट्रभाषा आणि देवनागरी (संस्कृत, मराठी, हिंदी भाषांची लिपी) हीच राष्ट्रीय लिपी आहे.
ग्वाल्हेर संस्थानचे राजे श्री जिवाजीराव शिंदे यांनी स्वतःहून आपल्या प्रजेला राज्य कारभारात अधिक स्थान देण्याविषयी सुधारणा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावेळी प्रजासत्ताकाचे तत्व प्रिय असणाऱ्या वीर सावरकरांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले. त्यात ते म्हणतात, ‘आमची हिंदू संस्थाने प्रगतीपर असून सार्वजनिक हित साधण्याकडे त्यांचा कल असतो, असा हिंदू महासभेला विश्वास वाटतो, तो किती योग्य आहे त्याचे हे लहानसे उदाहरण आहे. दरबार आणि प्रजा यांनी ह्या सुधारणा योग्यप्रकारे राबवूया, आपली प्रगती जलद, व्यवहार्य आणि राष्ट्रहिताची होवो, हीच शुभेच्छा!’ समानतेचे तत्व सर्वार्थाने पाळले जावे, यास वीर सावरकर आग्रही होते. भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे तत्व समता हे आहे, हे आपण जाणतोच. ९ ऑक्टोबर १९३९ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात व्हॉईसरॉय यांना अनेक सूचना वीर सावरकरांनी केल्या, त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे – जात, धर्म, वर्ग, पक्ष या सर्वांहून निरपेक्ष एका मनुष्याला एक मत ही खरी लोकशाही पद्धत. त्यावर आधारित लोकप्रतिनिधी निवडले जावेत, मात्र विशिष्ट काळापर्यंत अस्पृश्य समाजाला अधिक प्रतिनिधी किंवा तत्सम काहीतरी विशेष संरक्षण मिळावे, ज्यायोगे बाकीच्या समाजाच्या बरोबरीने ज्ञान, कर्तव्य आणि सुविधा यांचा लाभ सर्व स्तरातील लोकांना सारखा मिळेल.
स्वातंत्र्यानंतर सशस्त्र क्रांतीच्या अभिनव भारत संघटनेची सांगता वीर सावरकरांनी केली. स्वकीयांच्या राज्यात, स्वराज्यात आपसात वैरभाव, शस्त्राचार असू नयेत, हे सांगताना ते म्हणाले, आता यापुढची लढाई ही मतपेटीचे लढाई आहे. आपल्या तत्वांचा प्रचार करण्याची अधिकृतपणे सोय आहे. प्रजेला हवे तसे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आणि राज्य उत्तम चालवू शकेल, असे सरकार (राज्य शासन) मिळवणे हा आपला अधिकार आहे, पण जाता जाता सावधगिरीची सूचना वीर सावरकर करतात, मात्र त्या मतपेटीचे बूड फुटले तर नाही ना, याची निश्चिती करून घ्या.
प्रजासत्ताकावर पूर्ण विश्वास व्यक्त करणाऱ्या वीर सावरकरांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम!