आज आपला देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून शाहत्तराव्या वर्षात वाटचाल करत आहे. ह्या २६ जानेवारी रोजी आपल्या गणतंत्राची देखील ७३ वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या सध्याच्या काळात भारताने एक स्वतंत्र आणि समर्थ राष्ट्राचे परराष्ट्र धोरण कसे असावे त्याचा एक वस्तुपाठच घालून दिलेला दिसतो! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ह्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. ह्यापूर्वी कॉँग्रेसी राजवटीत भारत हा कायम आपल्या बलाढ्य सहकारी देशांपुढे नमून वागताना आपण पहिले आहे. बहुतांश वेळी आपण सोव्हिएत रशियाचा मित्र देशांच्या यादीत अग्रक्रमाने होतो. त्याचप्रमाणे आपला पारंपरिक शत्रू पाकिस्तान हा सदैव अमेरिका आणि त्यांच्या युरोपीय मित्र देशांच्या फळीत उभा राहिलेला आपल्याला दिसेल. मात्र २०१४ साली मोदी सरकार राज्यावर आल्यानंतर ह्या परिस्थितीत फरक पडण्यास सुरुवात झाली.
( हेही वाचा : लँड जिहादविरुध्द हिंदू समाज आक्रमक! धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा)
परराष्ट्र धोरणात एक अतिशय मोलाचे तत्व असते की, राष्ट्रा राष्ट्रांच्या परस्पर संबंधाविषयी आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, कुठल्याही राष्ट्रासाठी त्याचे मित्र देश वा शत्रू देश हे कधीही कायमचे नसतात. कायम असा दोस्त किंवा शत्रू कधीच नसतो. कायम असतात ते राष्ट्रा राष्ट्रांसंबंधात त्या त्या राष्ट्रांचे हितसंबंध! त्यामुळे रशिया हा आपला मित्र असला तरीही अमेरिका हे आपले शत्रूराष्ट्र खचितच नाही. ह्या नीतीचे एक अतिशय सुस्पष्ट दर्शन नुकतेच आपल्या रशियाच्या बद्दलत्या परराष्ट्रनीतीत दिसून आले. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांबरोबर आपले संबंध उत्तम आहेत! परंतु ज्या वेळी अमेरिकेने रशियावर त्यांचे तेल आणि नैसर्गिक वायु विकण्यास बंदी घातली त्यावेळी मात्र मोदी सरकारने स्पष्टपणे सांगितले की, आम्हाला कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑईल अधिक प्रमाणात हवे आहे आणि असे तेल जर रशियाने आम्हाला स्वस्तात देऊ केले तर आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू, त्यासाठी युरोपियन देशांची किंवा अमेरिकेची परवानगी मागण्याची भारतासारख्या सार्वभौम राज्याला अजिबात गरज नाही! हा एक समर्थ आणि सार्वभौम राज्याचा उद्गार आहे ! त्यामुळे आपल्या परराष्ट्र नीतीची भावी वाटचाल कशा प्रकारे होईल ह्याची एक चुणूक सर्व जगाला मिळाली!
मोदी आणि जय शंकर ह्यांच्या परराष्ट्रनीतीचे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे, ते पूर्णपणे भारत केंद्रीत आहेत. भारतासाठी जे जे उपयुक्त ठरेल ते ते आम्ही करणार, मग भले त्यात आपले पारंपरिक सहकारी देश नाराज झाले तरी फिकीर नाही. ह्या एक सूत्राबरोबरच काही इतर महत्त्वाची नीती तत्वे देखील भारत पाळतो. त्यातील मुख्य म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम’! सर्व जग हे एका बंधनाने बांधले गेले आहे आणि ते बंधन म्हणजे मानवतेचे! ह्याची प्रचिती कोविड काळात सर्व जगाला अत्यंत महत्त्वाचे रोगप्रतिबंधक लसीचे साठे पुरवून भारताने आणून दिली होती! त्या वेळेपासून भारताचे एक देश म्हणून महत्त्वाचे स्थान अधोरेखित झाले. आता तर भारत जी -२० ह्या एक आंतरराष्ट्रीय गटाचा अध्यक्ष झाला आहे व ह्या पदावरून गरीब राष्ट्रांना सर्व तऱ्हेची मदत करण्यास जी-२० संघटना दमदार पाऊले उचलील, असा विश्वास मोदी ह्यांनी व्यक्त केला आहे. भारत देश हा ह्या सर्व गरीब राष्ट्रांचा आवाज बुलंद करण्यास मदत करील असे त्यांनी घोषित केले.
जगाला भेडसावणाऱ्या दोन मुख्य समस्या, म्हणजे पर्यावरणीय संकट आणि दहशतवाद ह्यांचा सामना एकत्रितपणे करण्यास भारत सर्वतोपरी मदत करील, एवढेच नव्हे तर हीच भारताच्या परराष्ट्रनीतीची मुख्य उद्दिष्ट असतील असे भारताने सर्व जगासमोर जाहीर केले आहे. त्याची प्रचीती, नुकतेच भारताच्या प्रयत्नांमुळेच मक्की ह्या एक कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला, अांतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले गेले आहे. पर्यावरण स्नेही धोरणे आखून ती यशस्वीपणे राबवविणे हा भारताचा एक महत्त्वाचा अजेंडा पुढील काही दिवसांचा असेल. त्यासाठी भारत आपल्या जी-२० संघटनेच्या अध्यक्षपदाचा भरपूर वापर करील असा विश्वास वाटतो!