युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचे आदेश रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिले. त्यानंतर गुरुवारी सकाळी डोनेस्तकमध्ये ५ स्फोट झाले. या स्फोटांनी युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाची पहिली ठिणगी पडली आहे. युक्रेनची राजधानी कीवसह विविध ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू आले. कीवच्या क्रूज आणि बॅलेस्टिकवर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या पूर्व युक्रेनमधील डोनेस्तकला रशियाने स्वतंत्र देशासाठी मान्यता दिली होती. दरम्यान, युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी या हल्ल्यात होणारी जीवितहानी आणि नुकसानीसाठी केवळ रशिया एकटी जबाबदार आहे. अमेरिका आणि सहकारी देश याला प्रत्युत्तर देणार आहेत. मी राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी संपर्कात आहे. तसेच नाटोसोबत समन्वय सुरू आहे. त्यामुळे आता अमेरिकादेखील या युद्धात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
(हेही वाचा – मलिकांचा हात वेश्या व्यवसायातही! भाजपचा सनसनाटी आरोप)
काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणून घोषित
रशियन संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी ७ वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केली होती. अधिकाऱ्यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली होती. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्राने पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले होते.
युक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही
पुतीन यांनी म्हटले आहे की, आमचा युक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही. युक्रेनच्या सैन्यांनी शस्त्र खाली टाकावीत आणि शरण यावे. त्याचसोबत जो कुणी आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अथवा आमच्या सैन्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी लक्षात ठेवावं की, रशिया त्याचं तातडीनं चोख उत्तर देईल. तुम्ही तुमच्या इतिहासात कधी अनुभवलं नसेल असे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच पुतीन यांनी दिला आहे.
प्रत्यक्षदर्शींची माहिती
दोन रशियन लष्करी ताफे बुधवारी पूर्व युक्रेनच्या अशांत डोनेस्तककडे जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला. याशिवाय प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आधुनिक लष्करी सामग्रीसह सज्ज असलेले दोन ताफे डोनेस्तकच्या दिशेने गेले. मात्र, या ताफ्यांमधील लष्करी वाहनांवर कोणत्याही देशाचे चिन्ह नसल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तीन दिवसांत दुसऱ्यांदा युएनची बैठक
दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीन दिवसांत दुसऱ्यांदा आपत्कालीन सत्र बोलावली. यात युक्रेन संकटावर चर्चा झाली. सीमेवर रशियन सैन्याची तैनाती सुरू आहे. कीवच्या विनंतीवरून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मानवी नरसंहार बंद करायचाय- रशिया
या बैठकीत रशियाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ते म्हणाले की, पुतीन यांनी ज्या स्पेशल ऑपरेशनची घोषणा केली आहे. ती युक्रेनच्या वर्षोनुवर्षे जे लोक अडचणीत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी केली आहे. युक्रेनमधील मानवी नरसंहार बंद करायचा आहे. जो काही निर्णय घेतला आहे, तो युएन चार्टरच्या कलम ५१ च्या प्रमाणे घेतला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तर युएनच्या या बैठकीत यूक्रेनचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
युद्ध रोखण्याची जबाबदारी युएनची
युएन प्रतिनिधी बैठकीत म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी ऑन रेकॉर्ड युद्धाची घोषणा केली आहे. आता हे युद्ध रोखण्याची जबाबदारी युएनची आहे. आम्ही सर्वांत आधी युद्ध रोखण्याचे आवाहन करतो.