युक्रेनविरोधात रशियाने युद्ध सुरु केल्यानंतर हे युद्ध आता आणखी पेटणार असल्याचे संकेत दिसत आहे. त्यातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठे पाऊल उचलले आहे. देशाच्या न्यूक्लियर डेटरेंट फोर्सला हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत पुतीन यांनी ‘नाटो’च्या प्रमुख सदस्य देशांकडून केलेली वक्तव्ये आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी पुतीन किंवा रशियावर लादलेले निर्बंध याकडेही लक्ष वेधले.
पुतीन यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आणि ‘मिलिटरी जनरल स्टाफ’च्या प्रमुखांना आदेश दिले आहेत. न्यूक्लियर डेटरेंट फोर्सना सतर्क आणि सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. कीव्ह आणि खार्किव्हमध्ये रशिया आणि युक्रेनचे सैन्य परस्परांना भिडले आहेत. युद्धाच्या चौथ्या दिवशी रशिया आणि युक्रेनकडून अनेक दावे केले जात आहेत. युक्रेनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी खार्किव्ह शहरात घुसण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत, तर युक्रेनचा एक मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे, तसेच लवकरच कीव्ह आपल्या ताब्यात घेऊ, असा दावा रशियाकडून केला जात आहे.
(हेही वाचा रशिया-युक्रेन युद्ध: तिसऱ्या महायुद्धाची नांदी?, वाचा ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत)
पुतिन यांनी जगाला दिली धमकी
जगाच्या इतिहासात कुठल्याच देशाने अशाप्रकारे उघडपणे अणु हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे. महत्वाची बाब म्हणजे यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी पुतिन यांनी आपल्या भाषणात जगातील सर्व देशांनाही धमकी दिली होती. जर कुणी दखल देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे हत्यार आहे. त्यामुळे रशियाचे मनसुबे स्पष्ट असून यूक्रेनसोबत सुरु असलेल्या त्यांचं युद्ध हे आण्विक युद्धात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर यात कुठलीही शंका नाही की ते दखल देतील आणि त्यांची हार होणार नाही. कोणताही देश आमच्यावर हल्ला करेल तर त्याला परिणान भोगावे लागतील, असा इशाराच पुतिन यांनी दिला होता. 1945 मधील दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत कोणत्याही देशाने अण्वस्त्रांचा उपयोग केलेला नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. त्याचे परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहे. त्या हल्ल्यात 2 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
Join Our WhatsApp Community