राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन संपन्न!

119

प्राचीन काळापासून भारताला सागरी व्यापाराचा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. देशाचा ९० टक्क्यांहून अधिक व्यापार जलवाहतुकीच्या माध्यमातून होतो. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र शासनाने सागरी व्यापाराला विशेष महत्व दिले असून, विविध ठिकाणी जलमार्ग विकसित करण्यात येत आहेत. या क्षेत्रात रोजगार व पर्यटनाच्या असंख्य संधी निर्माण होत असून या क्षेत्राचा अपेक्षित विकास झाल्यास आगामी काळात सागरी व्यापार क्षेत्रात देशाला उज्ज्वल भवितव्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी केले.

मर्चंट नेव्ही सप्ताह

५८व्या राष्ट्रीय सागरी दिन आयोजन समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत बुधवारी ३१ मार्च रोजी राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नौवहन(शिपिंग) महासंचालक अमिताभ कुमार यांनी राज्यपालांच्या जॅकेटला मर्चंट नेव्हीच्या ध्वजाची छोटी प्रतिकृती लावली. मर्चंट नेव्ही सप्ताहाचे समापन होत असलेल्या ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो व त्यापूर्वीचा आठवडा मर्चंट नेव्ही सप्ताह म्हणून देशभर साजरा केला जातो.

कोराना काळात सागरी व्यापार क्षेत्र अविरत सुरू

सागरी व्यापार क्षेत्रात अमूलाग्र प्रगती साधण्यासाठी सरकारने मरिटाईम इंडिया व्हिजन २०३० धोरण तयार केले असून त्यातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्य सुरू आहे. राज्याने देखील सागरी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. भारतीय नौवाहक(सी फेअरर्स) जगातील अनेक देशांच्या जहाजांवर उल्लेखनीय कामगिरी करत असून त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. कोरोना संसर्गाच्या काळात देखील सागरी व्यापार क्षेत्राने आपले कार्य अविरत सुरू ठेवले व एकही व्यापारी जहाज या काळात नांगर टाकून थांबले नाही. अशी माहिती नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी दिली.

ई-गव्हर्नन्सचा अधिकाअधिक वापर

भारताच्या अतिशय समृद्ध अशा सागरी व्यापार व जहाज निर्माण क्षेत्राला ब्रिटीश सत्तेने अनेक वर्षे हेतुपुरस्सर प्रतिबंध केल्यानंतर दिनांक ५ एप्रिल १९१९ रोजी पहिले भारतीय जहाज एस. एस. लॉयल्टी मुंबई येथून लंडनला रवाना झाले. त्यामुळे त्या दिवसाला आधुनिक नौवहनाच्या पुनरुज्जीवनाचा आरंभ मानून राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो अशी माहिती त्यांनी दिली. सागरी व्यापाराचे क्षेत्र अधिक वेगाने प्रगती करत असून शिपिंग विभागाने कोरोना काळात ई-गव्हर्नन्सचा अधिकाधिक अंगीकार केला तसेच शिक्षण, प्रशिक्षण व परिषदा डिजिटल माध्यमातून सुरू ठेवल्या, अशी त्यांनी माहिती दिली.

यावेळी नौवहन महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक कुमार संजय बरियार, शिपिंग महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती हरजित कौर जोशी, उप महासंचालक डॉ पांडुरंग राउत, शिपिंग मास्टर मुकुल दत्ता, सागरी दिन आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, जहाज मालक, व्यवस्थापक व एजंट्सच्या संघटनेचे (मासा) अध्यक्ष कॅप्टन एम पी भसीन, सी फेअरर्स संघटनेचे अध्यक्ष अब्दुल गनी सेरंग, मरिटाईम संघटनेचे महासचिव अमर सिंग ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.