जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने कारवाया होत आहेत. काश्मीर खो-यातील लष्कराचे सैनिक आणि काही नागरिकांना या दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. अशीच एक घटना रविवारी घडली आहे.
पुलवामा येथील पिंगलाना परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका पथकाला लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाला असून सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून नाकाबंदी
या घटनेनंतर पुलवामा परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. पुलवामाच्या पिंगलाना येथे दहशतवाद्यांनी रविवारी सकाळी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलावर जोरदार गोळीबार केला. यामध्ये एका पोलिस कर्मचा-याला वीरमरण आले असून एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
(हेही वाचाः इम्रान खान यांना कधीही होऊ शकते अटक, कारण…)
शोपियानमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान
दरम्यान, रविवारी जम्मू-काश्मीर मधील शोपियान येथे सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला आहे. शोपियानच्या नौपोरा भागात राहणा-या या दहशतवाद्याचे नाव नसीर अहमद भट असे आहे. दक्षिण काश्मीरमधील बास्कुचन भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी घेराव घातला असतानाच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला चढवला. यावेळी सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात हा दहशतवादी ठार झाल्याची माहिती यंत्रणांकडून देण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community