दहशतवादी कारस्थाने व उपाय

देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षा दले, पोलिस ह्यांनी केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळणाऱ्या गुप्त माहितीवर अवलंबून न राहता, जमिनीवर प्रत्यक्ष काय चालू आहे हे कळण्यासाठी मानवी गुप्तहेरांचीही मदत घेणे गरजेचे आहे, अशी सूचना माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी 'हिंदुस्थान पोस्ट'मध्ये लिहिलेल्या लेखाद्वारे केली.

136

१४ सप्टेंबर २०२१ रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने विविध ठिकाणांहून ६ दहशतवाद्यांना अटक केली. जान मोहम्मद अली शेख ऊर्फ समीर (वय ४७), उस्मान (वय २२), मूलचंद (वय ४७), झिशान कामर (वय २८), मोहम्मद अबू बकर (वय २३) आणि मोहम्मद आमिर जावेद (वय ३१) ह्या सहा जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी जान मोहम्मद अली शेख हा मुंबईतील सायन येथे राहणारा तरुण मुंबई सेंट्रलवरून दिल्लीसाठी ट्रेनमधून रवाना झाला असता त्याला कोटा येथून अटक करण्यात आली. विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत दीड किलो `RDX’  ह्या दहशतवाद्यांकडून हस्तगत केले. चौकशीत उघडकीस आले की, सण-उत्सवाच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याचा ह्या सर्वांचा डाव होता. `ISIS’ पासून `अल् कायदा’ पर्यंत सर्वच दहशतवादी संघटना एकत्रितरित्या हल्ले करणार होत्या. १९९३ प्रमाणे मुंबईत साखळी स्फोट करणे, मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये स्फोट करणे व त्यासाठी रेकी करणे, असा त्यांचा विचार होता.

दशतवाद्यांनी अशी केली तयारी!

जान महम्मद याचे वडील ओसामा दुबई येथे मदरसा चालवतात. ते व त्यांचा भाऊ ह्यांच्या सांगण्यावरून हे कारस्थान रचण्यात आले. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस ह्याने हवालामार्फत आवश्यक पैसे त्याला उपलब्ध करुन दिले. जान मोहम्मद आणि उस्मान हे जानेवारी महिन्यात मस्कत येथे गेले. तेथे त्यांच्या पासपोर्टवर स्थलांतर अशी मोहोर न उमटवताच हे दोघे बोटीने पाकिस्तानातील थट्टा येथील दहशतवादी कँपमध्ये अन्य चौदा बंगाली बोलणाऱ्या व्यक्तींसह रवाना झाले. ह्याच दहशतवादी कँपमध्ये २००८ साली मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला प्रशिक्षण देण्यात आले होते. ह्या दहशवाद्यांकडे सापडलेली स्फोटके ऑगस्टच्या सुरुवातीस अमृतसर जवळील सीमा भागात ‘ड्रोन’ने पोहोचवण्यात आली होती. तेथून ती अन्यत्र नेण्याचे काम ह्या दहशतवाद्यांना देण्यात आले होते. ह्या दहशतवाद्यांना वेळच्या वेळीच पकडल्यामुळे मोठ्या घातपाताचा कट उघडकीस येऊ शकला.

(हेही वाचा : मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर, एटीएस मात्र रिक्त!)

पाकिस्तानी सैन्याने पुरवले ‘RDX’!  

या माहितीवरून हे स्पष्ट आहे की, हा दहशतवादाचा कट पाकिस्तानच्या ‘ISI’  ह्या गुप्तचर संस्थेने आखला होता व हवालामार्फत आवश्यक तो निधी गोळा करण्यात आला होता. यासाठी स्मगलिंग करणाऱ्या टोळ्यांमधील लोक व ठिकठिकाणच्या मुसलमान आणि अन्य व्यक्तींची मदत घेण्यात आली होती. ह्यामध्ये पाकिस्तानशिवाय, दुबई, मस्कत ह्याही ठिकाणांचा वापर करण्यात आला आहे. तसेच अत्याधुनिक अशा ड्रोन तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात आला आहे. ‘RDX’  ही स्फोटके केवळ लष्कराच्या ताब्यात असतात. परंतु पाकिस्तानी सैन्याने ती दहशतवाद्यांना पुरवलेली होती.

तालिबान आणि पाकिस्तानात काश्मीरवरून समझौता!

गेल्या महिन्यात पंजाबमध्ये ४ स्लीपर सेल ताब्यात घेण्यात आले. तर याच कालावधीत ड्रोनच्या मदतीने भारताच्या सीमाभागात शस्त्रास्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले आहे. गेले काही महिने मुंबई, नवी मुंबई परिसरात कोट्यावधींचे हशीश व अन्य अंमली पदार्थ वारंवार पकडण्यात आले आहेत. यावरून अंमली पदार्थ, अवैध शस्त्रास्त्रे, स्फोटके, हवाला आणि दहशतवाद ह्यांचा जवळचा संबंध आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमधून अमेरिकेने काढता पाय घेतल्याने पाकिस्तानी लष्कराने तालिबानी दहशतवादी नेत्यांचे सरकार बनविण्यात पुढाकार घेतला आणि तालिबानने काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करावी, अशी मागणी केली आहे. तालिबाननेही काश्मीरमधील मुसलमानांना मदत करणे हा आमचा हक्क आहे, असे जाहीर केले. अफगाणिस्तानात तालिबानने सरकार स्थापन केल्यानंतर भारतातील काही राजकीय निरीक्षकांनी आता तालिबानी नेते बदलले आहेत आणि त्यांच्यामुळे भारताला कुठलाही धोका नाही, असे विचार व्यक्त केले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र पाकिस्तान आणि तालिबानी एकत्र येऊन भारतामध्ये व काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणे आणि येथील लोकशाही प्रणाली संपुष्टात आणून तालिबानसारखे राज्य स्थापन करणे हाच उद्देश आहे. तालिबानच्या ‘आम्ही बदललो’ वगैरे म्हणण्यावर थोडाही विश्वास न ठेवता त्यांच्या प्रत्येक कृतीकडे अत्यंत सावधपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

(हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी घेतलेले महत्वाचे ५० निर्णय जाणून घ्या)

गुप्तहेरांचे जाळे मजबूत करावे!

भारतातील सशस्त्र दले, नौसेना, तटरक्षक दल, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस ह्यांनी आपल्या प्रशिक्षणामध्ये अमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. आत्मघातकी हल्ले करणे हे तालिबानचे वैशिष्ट्य आहे. त्या दृष्टीने रेल्वे स्थानके, बस स्थानके येथे संशयित व्यक्ती आणि सामान ह्यांची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. सरकारी तसेच खासगी वाहनांची अगदी रुग्णवाहिकेचीही तपासणी करणे जरुरीचे आहे. ड्रोन विरुद्ध तंत्रज्ञान लवकरात लवकर प्रभावी करणे आणि भारत – पाकिस्तान सीमेवर ड्रोनच्या वापरास पूर्णपणे बंदी घालणे आवश्यक आहे. देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षा दले, पोलिस ह्यांनी केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळणाऱ्या गुप्त माहितीवर अवलंबून न राहता, जमिनीवर प्रत्यक्ष काय चालू आहे हे कळण्यासाठी मानवी गुप्तहेरांचीही मदत घेणे गरजेचे आहे. समाजातील राष्ट्रप्रेमी अशा व्यक्तींना आवाहन करुन त्यांनी दिलेल्या मदतीचे स्वागत करुन सामान्य लोकांच्या मदतीने दहशतवाद्यांना मदत करणार्‍या व्यक्तींवर वेळच्या वेळी कठोर कारवाई अपेक्षित आहे. मूलतत्ववाद्यांच्या विरुद्ध मुसलमान लोकांचीही मदत घेऊन भरकटलेल्या तरुणांना आवरणे आवश्यक आहे. सोशल मीडिया व इंटरनेट ह्यांचा गैरवापर करुन दहशतवादी आपली कारस्थाने पार पाडत असतात. त्यामुळे संशयित व्यक्तींच्या फोन, ई-मेलवर लक्ष ठेऊन त्यांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे. ह्या विरुद्ध केवळ राजकीय फायद्यासाठी आक्रोश करुन सुरक्षा दले आणि पोलिस ह्यांचे मनोधैर्य खच्ची करणे हे राष्ट्रविघातक आहे. सर्वसाधारण लोकांनीही मोठ्या प्रमाणात पोलिसांचे मित्र बनून देशाची सुरक्षा बळकट करणे गरजेचे आहे.

– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य.

(वरील लेखाचे लेखक हे भारतीय पोलिस दलातील अनुभवी अधिकारी होते. ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचेही प्रमुख होते.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.