26/11 च्या अतिरेकी हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने २६/११च्या अतिरेकी हल्ल्यातील हौतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे जिहादी अतिरेक्यांच्या मुंबईवरील भ्याड हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या काही साहसी वीरांचे अनुभव कथन व कौतुक आणि हल्ल्याच्या निषेध असे स्वरूप होते. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री आणि कौशल्य, उद्योजगता, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर, कॅप्टन विक्रमादित्य सिंग, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचचे कार्यवाह विनायक काळे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते.
२६/११ सारखे हल्ले होऊ न देण्याची जबाबदारी केवळ सुरक्षारक्षकांची नव्हे तर सामान्यजनांचीही – मंगलप्रभात लोढा
मुंबईवर २६/११ चा जो हल्ला झाला, ते ८० तासांचे युद्धच होते. पुन्हा अशी घटना होऊ न देण्याची जबाबदारी केवळ सैनिक आणि सुरक्षारक्षकांचीच नाही तर ती सर्वसामान्यांचीही आहे. आपल्या आजूबाजूला काय अघटित, अवैध घडत असेल तर ते सामान्य नागरिकांनी सजगतेने पाहायला पाहिजे, हा बोध आपण या कार्यक्रमातून घेऊ, असे प्रतिपादन मुंबईचे पालकमंत्री आणि कौशल्य, उद्योजगता, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
भारतात आजही राष्ट्रभक्ती टिकून
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील हौतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले, हे अभिनंदनास्पद आहे. कारण हीच तरुण शक्ती पुढे देश चालवणार आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले. आज इस्रायलमध्ये चौकाचौकांमध्ये कुणा नेत्याचे पुतळे किंवा नावे नाहीत, तर तिथे हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकाचा पुतळा उभारला जातो किंवा नाव दिले जाते. त्या चौकातून जाणारे देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यापासून सर्वसामान्य जनता त्यांना अभिवादन करत असते. आज पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्ये अस्थिरता आहे, भारतात मात्र तशी स्थिती नाही; कारण भारतात आजही राष्ट्रभक्ती टिकून आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.
26/11सारखे हल्ले होऊ नये यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क रहावे – संजय गोविलकर
ज्यावेळी मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला तेव्हा मी गिरगाव चौपाटीवर नाकाबंदीला होतो. त्यावेळी कसाब आणि इस्माईल हे दोघे अतिरेकी स्कॉडा गाडीतून त्या ठिकाणी आले, तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इस्माईल ठार झाला होता, मात्र कसाब शरण येतोय असे दाखवत असतानाच अचानक त्याने गोळीबार सुरु केला, त्याला हवालदार तुकाराम ओंबळे यांनी जिवंत पकडले पण त्यांचे प्राण गेले. त्यानंतर कसाबला मारहाण सुरु झाली मात्र त्याला जिवंत ठेवण्याचा विचार आपल्या मनात आला, त्यामुळेच पुढे आपण हे सर्व अतिरेकी पाकिस्तानातून आले होते हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकलो. हे सगळे अतिरेकी फिदाईन होते, म्हणजे ते मरण्यासाठीच आले होते, अशा फिदाईनला जिवंत पकडणे मोठे काम असते, त्यामुळे जगाने आपले कौतुक केले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांनी कायम सतर्क राहायला हवे, संवेदनशील नागरिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच २६/११ सारखे हल्ले पुन्हा होणार नाहीत, असेही गोविलकर म्हणाले.
हिंदू-मुस्लिम यांच्या वृत्तीतील फरक नव्या पिढीला समजावण्याची गरज – मंजिरी मराठे
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळाले नाही तर ते हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानाने भारताने मिळवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सैन्यात ६५ टक्के मुस्लिम होते, तर ३५ टक्के हिंदू होते. वीर सावरकर यांनी हे प्रमाण बदलले आणि हे प्रमाण उलट झाले आणि सैन्यात ६५ टक्के हिंदू सैनिक झाले. त्यामुळे जेव्हा फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तान अधिक काही करू शकला नाही. कारण सैन्यात हिंदू सैनिक अधिक होते, अन्यथा आज भारत अस्तित्वात नसता, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे म्हणाल्या. हा हिंदू आणि मुस्लिम यांच्या वृत्तीतील फरक आहे. हिंदू संस्कृती ‘जेव्हा सत्कर्म कराल तर स्वर्ग मिळेल’, असे शिकवते, तर कुराण ‘काफिरांना माराल तर स्वर्ग मिळेल’, असे शिकवतो. त्यामुळे हिंदू-मुस्लिम वृत्तीतील फरक आजच्या पिढीला समजावण्याची आवश्यकता आहे. आपण हिंदू असल्याचा अभिमान बाळगायला पाहिजे, असेही मंजिरी मराठे म्हणाल्या.
देशाची सुरक्षा सर्वात महत्वाची – कॅप्टन विक्रमादित्य सिंग
७ ऑक्टोबर रोजी इस्त्राईलमध्ये हल्ला झाला, त्याला इस्त्राईलने युद्ध मानले. या हल्ल्यात २७० इस्त्राईल नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले. त्यांचा अजून थांगपत्ता नाही, त्यानंतर इस्त्राईल जे करत ते दुर्दैवी आहे, असे म्हटले जात आहे. उद्या जर भारताबाबत असे घडले आणि भारताने इस्राईलसारखे हल्ले केले, तरी भारताची कारवाई किती दुर्दैवी आहे, असे म्हटले जाईल, कारण सोशल मीडियातून तसे नेरेटिव्ह बनवले जातात. युद्धात सर्वसामान्यांचे प्राण जातातच. देशाची सुरक्षा सर्वात महत्वाची असते, यात कुठेही संभ्रम असू नये, असे कॅप्टन विक्रमादित्य सिंग म्हणाले.
अल्पवयीन दहशतवाद्यांना कायद्याचा लाभ देऊ नये – विनायक काळे
मुंबई हल्ल्याच्या वेळी काही त्रुटी आढळून आल्या, त्यानंतर आपण सुरक्षा व्यवस्थेत काही सुधारणा केल्या, पण अजूनही यात काही त्रुटी आहेतच. कसाबला जिवंत पकडल्यावर तो अल्पवयीन आहे म्हणून त्याला त्या कायद्यांतर्गत सवलत द्यावी, असा युक्तिवाद वकिलाने केला होता. त्यामुळे आता आपल्याला अल्पवयीन आरोपींसंबंधीच्या कायद्यात सुधारणा करायला हवी, जेणेकरून कसाबसारखे अल्पवयीन अतिरेकी पकडले गेले तर त्यांना या कायद्याचा लाभ देण्यात येऊ नये, असे राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचचे कार्यवाह विनायक काळे म्हणाले.
Join Our WhatsApp Community