जम्मू-काश्मीर: शोपियानमधील चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील कांजिलूर भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर -ए-तोयबा या जिहादी दहशतवादी संघटनेचे 2 दहशतवादी मारले गेले. पोलिसांनी दावा केला की, या चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये इलाका-ए-देहाती बँकेचे व्यवस्थापक राजस्थानचे रहिवासी विजय कुमार यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा समावेश आहे.

चकमक झालेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू

जान मोहम्मद लोन असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव तुफैल गनई आहे. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात आणखी दहशतवादी असल्याच्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम सुरू आहे. या भागात आणखी दहशतवादी नसल्याची खात्री झाल्यानंतर, ऑपरेशन मागे घेण्यात येईल. या चकमकीनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दोन दहशतवादी ठार केल्याची माहिती दिलीय.

दोन दहशतवादी ठार, एक पोलीस कर्मचारी गंभीर

यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक विजयकुमार म्हणाले की, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शोपियान येथील जान मोहम्मद लोन असे आहे. अलीकडेच कुलगाम जिल्ह्यात 2 जून रोजी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येसह इतर दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. जिल्ह्याच्या बाहेरील बेमिना येथे सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत पाकिस्तानी कमांडर अब्दुल्ला गोजरी आणि लष्कर -ए-तोयबाचा स्थानिक कमांडर मुसैब यांच्यासह दोन दहशतवादी ठार झाले.

(हेही वाचा – 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासोबतच असाही होणार फायदा, कोणाला मिळणार लाभ?)

यादरम्यान एक पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाला. मारले गेलेले दोन्ही दहशतवादी श्री अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या लश्कर-ए-तोयबाच्या तीन सदस्यीय आत्मघातकी पथकाचा भाग होते. या पथकातील हंजला हा पाकिस्तानी दहशतवादी 6 जून रोजी सोपोरमधील जालुरा येथे चकमकीत ठार झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here