पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांग्लादेश हा पाकिस्तानच्या जाचातून मुक्त करण्यासाठी बांग्ला मुक्तिवाहिनीचा पाकिस्तनच्या लष्कराशी संघर्ष सुरु होता. भारतीय लष्कर सुरुवातीला या यु्द्धाचा भाग नव्हते. परंतु पाकिस्तानच्या सैन्याने भारताविरोधात ऑपरेशन चंगेज खान सुरु केले आणि भारताच्या पश्चिम सीमेवर हल्ला केला. त्यावेळी भारताने या युद्धात फक्त भागच घेतला नाहीतर केवळ 14 दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य केले. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971. या दिवसाला भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुरुवातीपासूनच बांगलादेशमधील जनतेला दु्य्यम वागणूक दिली जात असल्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचंड रोष होता. त्यामुळे शेख मुजीबुर रेहमान यांच्या नेतृत्त्वाखील पूर्व पाकिस्तानने अधिक स्वायत्ततेची मागणी लावून धरली होती. मात्र, ती मान्य होत नसल्याचे दिसू लागल्यानंतर स्थानिक पातळीवर आंदोलने आणि विरोध होऊ लागला. पाकिस्तानी लष्कराकडून हा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. त्यामुळे अखेर भारताने बांगलादेशच्या वादात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.
नोव्हेंबरपर्यंत घडामोडींना वेग आला आणि युद्धाची शक्यता अटळ झाली. भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य तैनात केले. पावसनंतरच्या काळात जमीन ब-यापैकी कोरडी होती. हिमालयात थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली. 23 नोव्हेंबर 1971 रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार राहण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवारी डिसेंबर 3 रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याचे पाकिस्तानी तंत्र होते. पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा फारसा फायदा झाला नाही, उलट भारताला आक्रमण करण्यासाठी सबळ कारण मिळाले आणि दुस-या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैनिकांना युद्धाचे आदेश दिले आणि युद्धाला सुरुवात झाली.
( हेही वाचा: चौथी विनाशिका नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल )
93 हजार पाकिस्तानी सैनिकांची शरणागती
पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सेनेपुढे त्यांचे काही एक चालले नाही. 16 डिसेंबर 1971 चा तो दिवस होता. जनरल जेकब यांना दिल्लीहून जनरल माणेकशाॅ यांचा संदेश मिळाला. शरणागतीची तयारी करण्यासाठी ढाका येथे जाण्याचा हा संदेश होता. 16 च्या दुपारपर्यंत मेजर जनरल जेकब आत्मसमर्पण कराराचा मसुदा घेऊन ढाकाला पोहोचले. जेकब तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे जनरल नियाझींसमोर आत्मसमर्पण कराराचे वाचन केले.
हे ऐकून जनरल नियाझी म्हणाले की, ‘मी शरणागती पत्करत आहे, असे कोण म्हणाले? तुम्ही फक्त युद्धविराम आणि सैन्य माघारीच्या अटींबदद्ल बोलण्यासाठी इथे आला आहात’
यानंतर जनरल जेकब नियझींना बाजूला घेऊन गेले आणि समजावले की, तुम्ही आत्मसमर्पण केले नाही, तर तुमच्या कुटुंबीयांच्या रक्षणाची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. फक्त शस्त्र टाकल्यानंतरच मी खात्री देऊ शकतो की त्यांना कसेलही नुकसान होणार नाही. मी 30 मिनिटांचा वेळ देत आहे. जर तुम्ही सहमत नसाल तर मी ढाक्यावर बाॅम्बहल्ल्याचा आदेश देईन. त्यानंतर अर्धा तास वेळ घालवल्यानंतर नियाझी पुन्हा जेकब यांच्याकडे परतले. जेकब यांनी नियाझींना हे स्वीकारता का? असे सलग तीन वेळा विचारले. त्यानंतर जेकब यांनी कागद हवेत फिरवला आणि म्हणाले की, तुमचे मौन म्हणजेच तुमचा याला होकार असल्याचे मी गृहित धरत आहे. यानंतर नियाझींच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यानंतर पाकिस्तनाच्या 93 हजार सैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली आणि आत्मसमर्पण केले.
Join Our WhatsApp Community