Agnipath Scheme: अग्निपथ योजनेचा तरुण-तरुणींना होणार फायदा, कशी आहे योजना?

106

सैन्य भरतीसाठी भारत सरकारकडून अग्निपथ ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार 17.5 ते 23 या वयोगटातील तरुण तरुणींना चार वर्षांसाठी लष्करी शिक्षण घेता येणार असून, त्यासाठी त्यांना योग्य तो मोबदला देखील देण्यात येणार आहे. सैन्य दलात रुजू होण्यासाठी जास्तीत जास्त तरुण-तरुणींना प्रोत्साहन द्यावे हा यामागचा हेतू आहे.

यामुळे तब्बल 46 हजार तरुणांना सैन्य दलातील तिन्ही दलांमध्ये भरती होण्याची संधी मिळणार आहे. पण या योजनेला सध्या विरोध करण्यात येत आहे. या योजनेमुळे तरुणांचे नुकसान होणार असल्याच्या अफवा सध्या पसरवण्यात येत आहेत. त्यामुळेच भारत सरकारने या अफवांचे खंडन केले आहे. या योजनेतून भरती होणा-या अग्निवीरांना असंख्य लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताय? SEBI च्या या नियमाकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान )

काय आहेत अग्निवीरांना मिळणारे लाभ?

  1. पहिल्या वर्षी अग्निवीरांना 4.76 लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.(महिन्याकाठी साधारण 30 हजार रुपये)
  2. चौथ्या वर्षापर्यंत जवळपास 6.92 लाख रुपयांपर्यंतचे भत्ते देण्यात येणार आहेत. (महिन्याकाठी साधारण 40 हजार रुपये)
  3. तसेच 48 लाखांपर्यंतचे करमुक्त विमा संरक्षणही देण्यात येणार आहे.
  4. अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या अग्निवीरांना 4 वर्षांनंतर नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  5. चार वर्षांच्या सेवेनंतर, गुणवत्ता, इच्छा आणि वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधारावर 25% अग्निवीरांना सैन्यभरतीत कायम केले जाईल.
  6. इतर 75% अग्निवीरांना 11-12 लाख रुपयांचे एक्झिट किंवा “सेवा निधी” पॅकेज देण्यात येईल. तसेच त्यांच्या मासिक योगदानाद्वारे, कौशल्य प्रमाणपत्रे आणि त्यांच्या दुसर्‍या करिअरमध्ये मदतीसाठी बँक कर्जे याद्वारे अंशतः निधी दिला जाईल.
  7. त्यामुळे 24 वर्षांपर्यंत तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहणे शक्य होणार आहे.
  8. तसेच 10वी,12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही या योजनेंतर्गत सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.