भारतीय नौदलाची ताकद वाढणार; वाचा ‘आयएनएस वेला’ची वैशिष्ट्ये

भारतीय नौदलाची P75 प्रकल्पाची ‘वेला’ ही चौथी पाणबुडी, गुरुवारी नौदल प्रमुख करमबीर सिंग यांच्या हस्ते डॉकयार्ड येथे कार्यान्वित झाली आहे. यापूर्वी कलवरी, खांदेरी, कारंज या तीन पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. वेला या पाणबुडीची बांधणी मुंबईमधील माझगाव डॉक शीपबिल्डर्सने फ्रान्सच्या नॅवल ग्रुपच्या सहकार्याने केली आहे. मे २०१९ मध्ये लाँच झालेल्या, आयएनएस (INS)वेलाने कोविड निर्बंध असतानाही, सेन्सर व प्रमुख बंदरांच्या चाचण्यांसह, सर्व समुद्री चाचण्यादेखील पूर्ण केल्या आहेत.

वेला पाणबुडी

पाणबुडी एकावेळी आठ अधिकारी आणि ३५ जणांचे वहन करणार आहे. वेलाची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर आहे. पृष्ठभागाचा टॉप स्पीड ११ नॉट्सपर्यंत पोहोचू शकतो. पाणबुडीमध्ये MTU, 12V, 396, SE84 हे, चार डिझेल इंजिन आणि पॉवरसाठी ३६० बॅटरी सेल आहेत. तर, हुल, फिन आणि हायड्रोप्लेन या सुविधा किमान पाण्याखालील प्रतिकारासाठी डिझाइन केलेल्या आहेत. C303 अँटी टॉर्पेडो काउंटरमेजर सिस्टम, १८ टॉर्पेडो, एक्सोसेट अँटी-शिप अशी आधुनिक शस्त्रे वेलावर आहेत.

( हेही वाचा : ‘गांजा कंपनी’ अमेझॉनवर कारवाई करा! ट्विटर ट्रेंड सुरु )

सहा पाणबुड्यांचा करार

भारत आणि फ्रान्सने सहा स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या 2005 मध्ये, $ ३.७५ अब्जचा करार केला होता. यानुसार, पहिली पाणबुडी ‘आयएनएस कलवरी’ ऑक्टोबर २०१५ मध्ये लाँच करण्यात आली आणि वेळापत्रकापेक्षा पाच वर्षे उशीरा डिसेंबर २०१७ मध्ये कार्यान्वित झाली. दुसरी पाणबुडी ‘आयएनएस खांदेरी’ जानेवारी २०१७ मध्ये चाचणीसाठी लाँच करण्यात आली आणि सप्टेंबर २०१९ मध्ये ताफ्यात आली. तिसरी पाणबुडी ‘आयएनएस कारंज’ जानेवारी २०१८ मध्ये लॉंच करण्यात आली आणि २०२१ रोजी सुरू करण्यात आली. ‘आयएनएस वेला’ ही चौथी पाणबुडी आहे. पाचवी ‘आयएनएस वगीर’ नोव्हेंबर २०२० मध्ये लॉंच झाली आणि बंदर चाचण्या सुरू झाल्या आहेत. तर, सहावी पाणबुडी ‘आयएनएस वागशीर’ प्रगत टप्प्यात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here