पोखरणमधील ‘त्या’ शक्तीशाली स्फोटानंतर भारतात ‘हसला बुद्ध’!

95
स्वातंत्र्यानंतर भारतावर तीन युद्धे लादली गेली, त्यातील १९६२च्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला. मात्र १९७१च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने बंगालच्या उपसागरात विमानवाहू नौका पाठवल्या, त्याचवेळी रशियानेही अमेरिका भारतावर आण्विक हल्ला करील म्हणून भारताच्या मदतीसाठी युद्धनौका पाठवल्या होत्या. तेव्हा भारताला प्रथमच युद्धसज्जतेत ज्या उणिवा जाणवल्या, त्या भारताच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा होत्या. म्हणून त्यानंतर भारताला पहिल्याप्रथम शस्त्र सज्जतेची प्रखर जाणीव झाली आहे आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताला आण्विक शस्त्राने सज्ज करण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या जगाला अंधारात ठेवून धरणीकंप सारखा स्फोट घडवून आणणे मोठे आव्हान होते, मात्र भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’ हिच्या मदतीने भारतीय शास्त्रज्ञांनी ही किमया १८ मे १९७४ या दिवशी सध्या केली. या मोहिमेच्या यशानंतर त्याचा सांकेतिक संदेश म्हणून ‘…आणि बुद्ध हसला’! असे ठेवण्यात आले होते. त्याला कारणही होते, कारण ज्या दिवशी अणु चाचणी घडवून आणण्यात आली, त्या दिवशी बुद्धपौर्णिमा होती.
१८ मे १९७४ रोजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी राजस्थानमधील पोखरणच्या फील्ड फायरिंग रेंजवर मोठा स्फोट झाला. जमीन कापायला लागली.घरांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या, आकाशात वाळूचा घेर निर्माण झाला होता. हा स्फोट होता भारताच्या पहिल्या अणुचाचणीचा. १९७४ च्या चाचण्यांसाठी ‘हसणारा बुद्ध’ असे सांकेतिक नाव दिले गेले होते, त्यानंतर १९९८ साली वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या अणु चाचण्यांना ‘बुद्ध हसला’ असे नाव दिले गेले होते. त्या यशाचे वर्णनही ‘आणि बुद्ध हसला’ असेच करण्यात आले होते.

संरक्षण मंत्रीही होते चाचणीविषयी अनभिज्ञ! 

भारताच्या पहिल्या अणुचाचणीची माहिती त्या काळी प्रचंड गोपनीय ठेवण्यात आली होती. लष्कराचे हेलिकॉप्टर, वाहन गावात यायचे. अधिकारी, वैज्ञानिक हे डॉक्टर बनून लोकांमध्ये मिसळून जायचे. परंतु ते नेमके कशासाठी आले याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. ही मोहीम इतकी गोपनीय होती की, तत्कालीन संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनासुद्धा याची कल्पना नव्हती. तत्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंह यांनासुद्धा चाचणीच्या ४८ तासच आधी याची माहिती देण्यात आली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मात्र या संपूर्ण प्रकल्पावर आधीपासूनच बारीक लक्ष होते. चाचणीसाठीच्या अणुबॉम्बला १९७ मीटर खोल वाळूत गाडून ठेवण्यात आले होते. यासाठी ७५ वैज्ञानिकांचा चमू कार्यरत होता.

म्हणून आण्विक शस्त्रांची गरज वाटली! 

१८ मे १९७४ ला इंदिरा गांधींना स्वत: डॉ. राजा रमण्णा यांनी पोखरणजवळील एका खेड्यातून फोनवरून ..आणि बुद्ध हसला’..अशी माहिती दिली आणि भारताच्या तत्कालिन पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य उमटले. ताबडतोब जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या पंतप्रधानांना फॅक्‍स पाठविण्यात आले. ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता..”भारताची पहिली अणुचाचणी यशस्वी !’ १९४० च्या दशकात डॉ. होमी भाभांनी पाहिलेले “शांततेसाठी अणुकार्यक्रम’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यातील एक महत्त्वाचा टप्पा या स्फोटाद्वारे पार पडला होता. भारत-पाकिस्तानच्या १९७१युद्धापर्यंत अण्विक शस्त्र कार्यक्रमास भारताने अग्रक्रम दिला नव्हता. डिसेंबर १९७१ मध्ये अमेरिकेच्या ३७वे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारतावर दबाव आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात विमानवाहू नौका पाठवली. रशियानेही भारताच्या मदतीसाठी दोन युद्धनौका पाठवल्या आणि एकप्रकारे अमेरिकेला भारताविरूद्ध अण्वस्त्रे वापरण्यापासून थांबवले. याप्रकारानंतर भारताला अण्वस्त्रे जवळ असणे महत्वाचे झाले. ७ सप्टेंबर १९७२ रोजी इंदिरा गांधींनी भाभा अणुसंशोधन केंद्रास अणूयंत्रे बनवण्यास आणि चाचण्या करण्यास मान्यता दिली. १८ मे १९७४ साली पहिली चाचणी घेण्यात आली, पण ती फारच सामान्य अवस्थेतील होती आणि त्यानंतरच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी अणू संशोधनात आजतागायत देदीप्यमान प्रगती केली आणि त्याचा प्रत्यय १३ मे १९९८ या बुद्ध पौर्णिमेला आला. या बॉंबचा आकार अमेरिकेच्या ’फॅटमॅन’ बॉंब सदृश होता आणि त्यासाठी ६ किलो प्लुटोनिअम लागले. अणुचाचणीसाठी वापरलेल्या बॉंबचा व्यास १.२५ मीटर तर वजन १४००किलो होते. स्फोटातून ८ किलोटन टीएनटी इतकी उर्जा निर्माण झाली. नागासाकीवरती टाकण्यात आलेल्या फॅटमॅनमधून २० किलोटन उर्जा निर्माण झाली होती, यावरून या स्फोटाची तीव्रता लक्षात येते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.