पर्मनंट कमीशन स्विकारल्यानंतर महिला अधिकारी लवकरच लष्करातील तुकड्या आणि बटालियनचे नेतृत्व करणार आहेत, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. सुरक्षा आणि राष्ट्रनिर्मितीच्या सर्व क्षेत्रात महिलांचं योगदान मोलाचं आहे. या यादीत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या योगदानाचाही समावेश आहे.
महिलांना मोठी संधी
पोलिस, केंद्रीय पोलिस यंत्रणा, निमलष्करी आणि सशस्त्र दलांमध्ये महिलांचा समावेश करण्याचा आमचा दृष्टिकोन पुरोगामी आहे. आम्ही लढाईचं समर्थन आणि त्यानंतर सशस्त्र दलांमध्ये शस्त्रांचा सामना करण्यासाठी उत्क्रांतीचा मार्ग स्वीकारला आहे, असे सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या भूमिकेविषयी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन(एससीओ)च्या वेबिनारला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लष्कराने महिलांना परवानगी देण्यास सुरुवात केल्यावर बटालियन कमांड करण्याची संधी महिला अधिकाऱ्यांच्या करिअरच्या प्रगतीचा भाग बनली आहे.
(हेही वाचाः )
सैन्य दलाची तयारी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालानंतर सशस्त्र दल महिलांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये(एनडीए) घेण्याची तयारी करत आहे. या क्षेत्रात आतापर्यंत फक्त पुरुषांचं वर्चस्व होतं. महिला पुढील वर्षीपासून भारताच्या प्री-प्रीमियर ट्राय-सर्व्हिस प्री-कमिशनिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एनडीएमध्ये सामील होऊ शकणार असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. लष्करातील महिलांसाठी एक महत्त्वाचा टप्पा 2015 मध्ये आला जेव्हा भारतीय हवाई दलाने त्यांना एअर फोर्समध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय नौदलाने जवळपास 25 वर्षांच्या अंतरानंतर युद्धनौकांवर चार महिला अधिकारी तैनात केल्या. पण आर्मीमधील टँक्स आणि लढाऊ अजूनही महिलांसाठी नो-गो झोन्स आहेत.
भारतीय महिलांचे मोठे योगदान
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे आणि त्यांना देण्यात आलेल्या कर्तव्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महिलांच्या प्रगतीमधील अनेक अडथळे मोडले गेले आहेत आणि येत्या काही वर्षांमध्ये आणखी अनेक अडथळे मोडले गेले पाहिजेत. इतिहासात स्त्रियांनी आपल्या देशाचे आणि लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलल्याची अनेक उदाहरणे आहेत. राणी लक्ष्मीबाई हे यातील सर्वोत्तम उदाहरण आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ अनेक वर्षे देशाचे नेतृत्व केले नाही तर युद्धाच्या काळातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच अलीकडेच, प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपती आणि भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर होत्या, असे सिंह म्हणाले.
गेल्या सहा वर्षांमध्ये लष्करातील महिलांची संख्या जवळपास तीन पटीने वाढली आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत सैन्य, नौदल आणि हवाई दलात 9 हजार 118 महिला सेवा देत होत्या.
Join Our WhatsApp Community