>> डॉ. सुबोध नाईक
‘भारताचे सैनिकीकरण आणि परराष्ट्र संबंध’ (Abhinav Bharat Society) ह्यावर भर देऊन त्यात काम करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत क्रांतिकारी आणि निर्णायक भूमिका स्थापनेपासून ते अगदी १९४७ सालापर्यंत बजावणाऱ्या आणि त्यासाठी पृथ्वीतलावरील आशिया, आफ्रिका , युरोप आणि अमेरिका ह्या चारही खंडांमधून काम करणाऱ्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचे नाशिकमधील तिळभांडारेश्वर गल्लीतील स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या ७० व्या वर्षी कष्ट घेऊन उभारलेले स्मारक पुनर्विकासासाठी पाडण्यात आले अशी बातमी नुकतीच वाचनात आली. अतिशय दुर्दैवी, इतिहासाबद्दच्या पूर्ण अज्ञानातून उद्भवलेली ही घटना काहीही झाले तरी महाराष्ट्राच्या इतिहासात व्हायला नको हवी होती. भारतीयांनी ती टाळायला हवी होती. जगभर अनेक ऐतिहासिक वास्तू पूर्णपणे न पाडता विकसित केल्या गेल्या आहेत. भारतात सुद्धा गांधीजींचे जन्मस्थळ, आगाखान पॅलेस असेच जपले गेले आहेत. जपानमधील ज्या हॉटेलात रासबिहारी बोस आणि चीनचे सन्यत सेन अनेकदा जायचे ते सुद्धा तसेच्या तसे अजूनही जपण्यात आले आहे. त्याच धर्तीवर ही वास्तू सुद्धा अगदी तशीच्या तशी जपून तिचे सौंदर्यीकरण नक्कीच करता आले असते.
तिळभांडारेश्वर गल्लीतील हे घर सामान्य लोकांना परिचित आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचे १९०० सालापासूनचे घर म्हणून! त्याला सावरकरांचे घर म्हणून महत्व आहेच. सावरकर बंधूंच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात ह्याच घरात झाली. प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करणे, मृतांना कोणी हात लावायला सुद्धा तयार नसताना त्यांची प्रेते स्मशानात नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करणे अशा अनेक समाजोपयोगी गोष्टी सावरकर बंधूंनी केल्या त्या ह्याच घरात! ह्याच घरात मित्रमेळा वगैरे आदी संघटनांची स्थापना झाली. क्रांतीकारकांना सशस्त्र युद्धाचे शिक्षण द्यावे म्हणून सयाजीराव गायकवाड ह्यांनी पाठवलेले इब्राहिम मियाँ, वेदांचा अभ्यास असणारे आणि तात्यांच्या कार्याला युरोपमध्ये मदत करणारे इराणचे मिर्झा अब्बास आदी भारतप्रेमी मुस्लिम ह्याच ‘हिंदुत्ववादी सावरकरांच्या’ घरात प्रेमाने राहून गेले आहेत. ह्याच घरात ‘अभिनव भारताचा’ सुद्धा जन्म झाला ज्याचा पूर्ण भर तरुणांच्या व्यायाम उपासना आणि बौध्दीक शिक्षण ह्यावर आणि जेणेकरून त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी तयार करणे ह्यावर होता. ह्याच घरात एकेकाळी तमाशाच्या लावण्या लिहिणारे परंतु सावरकरांच्या संपर्कात आल्यावर ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ अशी स्फूर्तिदायी काव्ये लिहिणारे कवी गोविंद दरेकर राहत होते. लवकरच पुढे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रयत्नांना मूर्तरूप देण्यासाठी लोकमान्य टिळक ह्यांच्या इच्छेनुसार तात्या इंग्लंडला गेले ते ह्याच घरात झालेला शेवटचा सत्कार स्वीकारून!
तात्या इंग्लंडला गेले होते ते बॅरिस्टरी शिकण्यासाठी नाहीच. तिथे त्यांनी आणि त्यांच्या अभिनव भारत ह्या क्रांतिकारक संघटनेने भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने, हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या दृष्टीने आणि महायुद्धांच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी काय व कशी भक्कम पायाभरणी केली, ह्या भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या प्रयत्नांत त्यांनी जपान, फ्रांस, आयर्लंड, जर्मनी, रशिया, इराण, ब्राझील, तुर्कस्थान, कॅनडा अशा अनेक देशांना कसे समाविष्ट करून घेतले हा एक वेगळा आणि अतिशय विस्तृत असा इतिहासाचा विषय आहे. त्याबद्दल इथे बोलणे शक्य आणि इष्टही नाही. १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य खंडीत भारताच्या रूपात मिळाले असले तरी आपले आणि आपल्या ह्या संघटनेचे ‘भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे’ कार्य पूर्ण झाले आहे आणि आपण आता विरोधासाठी विरोध न करता भारताच्या सत्ताधाऱ्यांना मग ते कोणीही असोत भारताच्या प्रगतीसाठी मदत करायला हवी ह्या ‘न मे विद्यते कर्तव्यं किंचित’ ह्या निरिच्छ भावनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये पुण्याला अभिनव भारत ह्या संघटनेची सांगता केली.
परंतु ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतात आणि जगाच्या सगळ्या खंडांमध्ये जाऊन आणि राहून कार्य केलेल्या क्रांतिकारकांची, आपल्या ज्ञात अज्ञात क्रांतीसहकार्यांची ‘आणि’ भारताचा ब्रिटिशांविरुद्धचा सशस्त्र लढा हा १० मे १९०७ ह्या दिवशी ज्या संघटनेने सुरु केला आहे असे ब्रिटिशांनीच मान्य केले आहे ‘आणि’ भारतातील पंजाब, बंगाल इथल्या अनुशीलन समितीसारख्या क्रांतिकारी संघटना सुद्धा जिचे मार्गदर्शन घेत होत्या त्या अभिनव भारत ह्या आपण स्थापन केलेल्या क्रांतिकारी संघटनेची साधी तोंडओळख देखील भारतीय जनतेला नाही हे शल्य तात्यांना जाणवत आणि बोचत होते. म्हणूनच आपल्या ह्या घरात म्हणजे अभिनव भारत ह्या संघटनेच्या जन्मस्थळी ह्या संघटनेचे स्मारक उभारण्याचा निर्णय तात्यांनी १९५२ मध्ये घेतला.
१९१० मध्ये ब्रिटिशांनी जप्त केलेले आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा काँग्रेस सरकारने परत न केलेले आपले भगूरमधील वडिलोपार्जित घर तात्यांना १९५२ मध्ये अवघ्या पाच हजार रुपयांत परत विकत मिळत होते. पण ते न घेता आपल्या आयुष्याचा सारांश असणाऱ्या ‘अभिनव भारत’ ह्या आपल्या संघटनेचे जन्मस्थळच विकत घ्यायचे तात्यांनी ठरवले. त्यासाठी एकूण खर्च आला ३७,००० रुपये, त्यातले १५००० रुपये तात्यांनी एकट्याने जमवले होते. वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रकृती साथ देत नसताना तात्या अनेक ठिकाणी हिंडले आणि त्यांनी भाषणे दिली आणि हा निधी जमा केला आणि ह्याच पैशांतून तात्यांनी आपले जुने घर आणि शेजारील एक मोडके घर विकत घेतले. त्याची डागडुजी केली आणि तिथे ‘अनंत कान्हेरे’ आणि ‘कर्वे-देशपांडे’ आणि आपले जेष्ठ बंधू ‘क्रांतिवीर बाबाराव सावरकर’ ह्यांच्या स्मृत्यर्थ छोटी दालने उभी केली. तिथेच त्यांनी ‘स्वातंत्र्यलक्ष्मीचे’ मंदिर उभारले आणि सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृत्यर्थ एक तुळशी वृंदावन उभारले. हा कार्यक्रम सुद्धा तात्यांनी घडवून आणला तो सुद्धा भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या ९६व्या वाढदिवशी म्हणजे १० मे १९५३ ह्या दिवशी! ह्याच दिवशी तात्यांनी आणि त्यांच्या अभिनव भारताने सुरु केलेल्या ब्रिटिशविरोधी सशस्त्र लढ्याचा ४६ वा वाढदिवस होता.
सावरकरांचे सहकारी क्रांतिकारक कसे होते हे सांगणारी एक दुर्दैवी पण नितांतसत्य घटना तेव्हाच घडली. नाशिक कटातील एक सदस्य कृष्णाजी महाबळ ह्यांचा तरुण आणि विवाहित मुलगा अवघ्या पाच दिवस आधी मरण पावला होता. पण त्या दुःखावर मात करून कृष्णाजी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेल्या ‘कर्मयोगाचे’ दुसरे उदाहरण हवे काय? हाच कर्मयोग तर सावरकर आणि सर्व क्रांतिकारक जगले होते. थोडक्यात, सांगायचे झाले तर काँग्रेस सरकार कोणतीही मदत करत नसताना किंबहुना क्रांतिकारकांचे नाव घेण्याला सुद्धा विरोध करत असतानाही ७०व्या वर्षी एका वृद्ध तपस्वी सेनापती योद्ध्याने आपल्या सरदार अजितसिंग, रासबिहारी घोष, महर्षी अरविंद, भूपेंद्रनाथ दत्त, लाला हरदयाळ, श्यामजी कृष्ण वर्मा, पी सी पिल्ले अशा सर्वच ज्ञात अज्ञात, मृत-जीवित क्रांतीकारकांना वाहिलेली आणि आपल्या कष्टातून उभारलेली ही श्रद्धांजली होती. वर सांगितलेल्या ‘कर्मयोगाचे’ ते नितांतसुंदर मंदिर होते. महाराष्ट्राने ते मंदिर जपून ठेवायला हवेच होते.
तिथे ह्याच स्मारकाची पुनर्रचना होणार आहे असे कळते. स्वागत आहे. बुद्धांचे ‘अनित्य’ तेचेच सूत्र तात्या सुद्धा आपल्या १९०२ मध्ये लिहिलेल्या ‘विश्वात आजवरी शाश्वत काय जाहले’ ह्या कवितेत सांगत असले तरी ही चूक महाराष्ट्राने टाळायलाच हवी होती कारण ‘आई ही आई असते, सोन्याचाच काय पण प्लॅटिनमचा आईचा पुतळा सुद्धा आईची जागा घेऊ शकत नाही. अंदमानातील सेल्युलर जेलचे सौंदर्यीकरण होताना त्यातले ऐतिहासिक मूल्य, ऐतिहासिक संदर्भ जसे उडून गेले आहेत तशी घोडचूक ह्या स्मारकाचा पुनर्विकास करताना होऊ नये याची काळजी संबंधितांनी आणि शासनाने घ्यावी ही अपेक्षा आहे. तिथे तरी महाराष्ट्र चुकणार नाही अशी आशा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community