राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारच्या योजना बंद करण्याचा जणू ठाकरे सरकारने धडाका लावला असून, फडणवीस सरकारची आणखी एक योजना ठाकरे सरकारने गुंडाळली. राज्यातील खास करून धाराशीव व यवतमाळ जिल्ह्यातील शेतक–यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरु केलेली बळीराजा चेतना अभियान योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेचा प्रभावी परिणाम होत नसल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याच्या महसूल व वन विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे.
काय होती योजना
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने धाराशीव व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये २४ जुलै २०१५पासून बळीराजा चेतना अभियान ही योजना तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा निर्णय घेतला होता. शेतक–यांच्या आत्महत्या रोखण्याबरोबर त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या दोन जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत होती. २०१८–१९ या एका वर्षासाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली होती. पण या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंघाने मागील पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला. तेव्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये घट दिसून आलेली नसून योजनेचा प्रभावी परिणाम होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आल्याचे महसूल व वन विभागाच्या जीआरमध्ये नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community