Ganeshotsav 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गणेशोत्सवाविषयीचे विचार !

    ॐ काराच्या उत्पत्तीचे आणि श्री गजाननाच्या मूर्तीचे रहस्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले आहे

    388
    Ganeshotsav 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गणेशोत्सवाविषयीचे विचार !
    Ganeshotsav 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गणेशोत्सवाविषयीचे विचार !

    नमिता वारणकर

    • सार्वजनिक गणेशोत्सव! लोकजागृतीचे व्यापक आणि प्रभावी साधन!! हिंदू धर्मात अतिशय प्रिय असलेले गणपती हे दैवत, बुद्धीदाता आणि विघ्नहर्ता. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांनी समाज कृतीशील व्हावा, जातीद्वेष दूर व्हावा, समाज संघटित व्हावा, नवीन कार्यकर्ते घडावेत… अशा समाजहिताच्या अनेक उद्देशांनी मंगलमूर्तीच्या या उत्सवाला सार्वजनिक, व्यापक स्वरुप दिले. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्फूर्तीदाते. त्यामुळे वीर सावरकर यांच्या काळातील गणेशोत्सवातील स्वरुप, त्यांचे या उत्सवाविषयीचे विचार, त्यांनी विघ्नहर्त्या गजाननावर रचलेली पदे, समाजाला दिलेला संदेश, उत्सवादरम्यान होणारी त्यांची भाषणे, भाषणांतील विचार, काही वैशिष्ट्यपूर्ण आठवणी… जनमानसापर्यंत पोहोचाव्यात… यासाठी केलेला हा लेखप्रपंच !

    ॐ काराच्या उत्पत्तीचे आणि श्री गजाननाच्या मूर्तीचे रहस्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले आहे की, ॐ ची मूर्ती म्हणजेच गणपती गजानन! देवीकरणाच्या आणि मूर्तीकरणाच्या प्रवृत्तीने ॐ कारासारख्या अगदी वैदिककालीच इतके पावित्र्य नि महत्त्व पावलेल्या देवतेस साकारण्यासाठी पुढे यावे हे क्रमप्राप्तच होते. ओंकाराची मूर्ती म्हणजे गजानन, गजवदन अर्थातच ओंकारास वर सांगितलेली जी महनीय विशेषणे नि महात्म्य प्राप्त झाले होते ते सारे गजाननाच्या ठायी संक्रमित झाले. वाड्ःमयाचे दैवत कविताकला, नृत्यगीताची जी देवी सरस्वती तिचा तो स्वामी; मंत्रापूर्वी ॐ कार जसा ब्रह्मस्वरूप म्हणून स्मरणीय, तसाच सकल वैदिकादी धर्मकर्माचे आधी गजानन पूज्य, म्हणूनच विघ्ननाशक सा-या विद्येचा, लेखनाचा, वाणीचा तो उगम म्हणूनच धूळपाटीला नमस्कार केला पाहिजे. आधी श्रीगणेशाय नमः! मग अ, आ, इ, ई ची गोष्ट.

    सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कवने रचली, पदे, संवाद लिहिले, भाषणे केली. त्या काळी उत्सवादरम्यान चळवळी, मेळे होत असत. याकरिता त्यांनी काही आर्या रचल्या आणि गीतेही लिहिली आहेत. नाशिक येथील गणेशोत्सवादरम्यान लिहिलेले हे पद. यामध्ये श्रीगणपतीला देशाची सद्यस्थिती सांगून संकटातून तारण्यासाठी प्रार्थना केली आहे.

    हे सदया गणया तार। तुझ्यावरि भार
    तूं मायबाप आधार। तुझ्यावरि भार
    किति देश-शत्रु भूतलीं
    हृच्छत्रु सहाही परी
    शापें वा सुशरें जाळी
    तो ब्राह्मण आतां खाओ परक्या लाथांचा बा मार ।।१।।
    देशावरि हल्ला आला
    पुरूष तो लढोनी मेला
    स्त्री गिळी अग्निकाष्ठाला
    रजपूत परी त्या परवशतेचें भूत पछाडी, तार ।।२।।
    अटकेला झेंडा नेला
    रिपु-कटका फटका दिधला
    दिल्लीचा स्वामी झाला
    तो शूर मराठा पाहिं तयाचे खाईन कुतरें हाल ।।३।।
    – नाशिक, १९०२

    गणशक्तीची मूर्ती गणपती!
    रामाच्या देवळात आमचे काही हिंदूबंधू ती मूर्तीच देव म्हणून भजतील, कोणी देवाच्या अवताराची ती मूर्ती म्हणून पुजतील; कोणी ती मोक्ष देते म्हणून पुजतील. बुद्धिवादी त्यापैकी कोणत्याही श्रद्धेने जरी बांधलेला नसला तरीही राष्ट्राच्या एका अत्यंत पराक्रमी राष्ट्राधिपतीचे स्मारक म्हणून त्या मूर्तीकडे पाहील. तो राष्ट्रीय भावनेने तिला पुजील, इतकाच फरक! या दृष्टीने पहाता आज आपल्या हिंदूराष्ट्राच्या संघटनेचे एक प्रबळ हत्त्यार असलेल्या गणपती उत्सवाच्या राष्ट्रीय महोत्सवात हिंदूसंघटक अशा पोथीजात जातिभेद उच्छेदक बुद्धीवादी सुधारकांनी अवश्य भाग घेतला पाहिजे. याविषयी सांगताना वीर सावरकर यांनी म्हटले आहे –
    ‘अखिल हिंदू गणेश उत्सव काढा!!
    प्रकट सहभोजनाची झोड उठवून द्या!!’

    समाजजागृतीसाठी मित्रमेळा …
    गुप्त क्रांती कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समुहा’ची स्थापना केली आणि उघड कार्याकरिता ‘मित्रमेळा’नावाचा एक मेळा काढण्यात आला. या मेळ्यासाठी स्वातंत्र्यकवी गोविंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संवाद, पद्ये आणि पोवाडे रचले आहेत. या मेळ्यांसाठीच ‘सिंहगड’ आणि ‘ बाजी देशपांडे’ हे दोन पोवाडे सावरकरांनी रचले आहेत. मेळ्यांसाठी रचलेल्या पदातील या काही ओळी –
    “स्वामी आम्ही एकदा होतो या महीचे ।
    अनुभवतो परि दास्य हे सांप्रत परक्यांचे।।
    आमुचे दिव्यज्ञान जे सकल जगा पुरले।।
    त्यातून आता काहीहि आम्हा नच उरले।।”

    दुस-या एका सुंदर संस्कृतानुवादित पदातील चरणे…
    “मूर्त जगन्मंगला कुठे
    तुज स्नानालागी बघू जला।।
    आश्रय देउनि कुठे
    ठेवु तुज आधारचि तू जगताला।।”

    नाशिक येथील १८९७च्या गणेशोत्सवाप्रसंगी रचलेल्या आर्या –
    वंदुनि प्रथम भवानी वर्णी गेल्या गणेशअुत्साहा ।
    कीं हिंदु बांधवासी आधारचि कामधेनु वत्सा हा ॥ १॥
    जरि पुण्यपत्ततमासम गजबजला ना तरी असामान्य ।
    झाला तोची बहु कीं लघुसौभद्रहि जनीं जसा मान्य ॥ २ ॥
    प्रथम चतुर्थी येतां अुत्कट आनंदभरित जन झाले ।
    भावें सकलजनांनी शिवकुमरा गणवरासि आठवले ॥३ ॥
    होते मेळ तयारचि जरि चारचि तरि बहूत सुंदर ते ।
    गणराजकीर्तिधीला शोभे सुंदर कराचि बंद रते ॥ ४ ॥
    त्या निशि पुराण गर्दी गणराया गावयास गवयांची ।
    लटपट जन खटपटती मुकले जे त्या कशास चव याची ॥५ ॥

    राष्ट्र आणि गणपती…
    राष्ट्र आणि गणपती यांच्या असलेल्या संबंधांविषयी ते म्हणतात, ‘गणपती म्हणजे गणांना पती, गण म्हणजे राष्ट्र. त्या शक्तीचे, संघटनेचे जे दैवत ते गणपती! वैदिक काळापासून आपल्या भारतीय राष्ट्राची ती गणदेवता आहे. लोकमान्य टिळकांच्या परिश्रमाने आणि पुण्याईने या उत्सवाला राष्ट्रव्यापी रूप दिले. अखिल हिंदू गणेशोत्सव स्वतंत्रपणे साजरे करावे. यात पोथीजात, जातीभेदाचा कोणताही मनी उच्चनीचतेचा भेदभाव न मानता, हिंदुमात्रास समानतेने समान नियमान्वये सर्व कार्यक्रमांतून भाग घेता आला पाहिजे. मूर्तीपूजेसारख्या कार्यक्रमात आम्ही भाग कसा घ्यावा? तरीही इतके सांगणे पुरे पडेल की मूर्तीपूजेत तितका धर्मभोळेपणा नसतो. धार्मिक वा भाविक दृष्टी सोडली तरीही केवळ राष्ट्रीय दृष्टीने अगदी ह्या लोकांच्या लाभाचाच विचार पुढे ठेवला, तरीही मूर्तीपूजा ही मिथ्थ्याचार ठरत नाही. कारण जशी एक धार्मिक मूर्तीपूजा असते तशीच एक बौद्धिक (Rationalist) मूर्तीपूजा ही आहेच आहे. दगडाच्या वा मातीच्या मूर्तीलाच वस्तुतः सजीव दैवत मानून ती मूर्तीच धूपाचा वास घेते, फुले स्वतः हुंगते, मोदक सूक्ष्मरूपाने खाते, मोदक नाही दिले तर ती मूर्तीच रागावते, अशा दगडालाच देव मानणा-या मूर्तीपूजेला बुद्धीवादी हा निःसंशय भाबडीच समजणार. बुद्धीवादी गणपतीच्या मूर्तीकडे त्या दृष्टीने पाहाणार नाही; परंतु आमच्या हिंदूराष्ट्राच्या संघटनेचे प्रतीक, राष्ट्रशक्तीची, गणशक्तीची मूर्ती ह्या दृष्टीने तिचा उत्सव, पूजा, सत्कार करण्यास बुद्धीवाद्यांसही काही एक हरकत नाही. मूर्ती – मनुष्यमूर्तीसुद्धा काढणे हे पाप होय असे मानणा-या कट्टर मुस्लीमाचा मूर्तीद्वेष हे जसे धर्मवेड होय तसेच संघटनेचे प्रतीक म्हणून, गणशक्तीची मूर्ती म्हणून देखील मूर्तीपूजा वावडी मानून, गणेश उत्सवात भाग न घेणे हे बुद्धीवेड होय!’

    गणेशोत्सवानिमित्त केलेल्या भाषणांतील विचार आणि काही आठवणी…

    • टिळक आळीतील एक उत्सव टिळक पंचांगाप्रमाणे झाला. या उत्सवात वीर सावरकर यांची दोन भाषणे झाली. ‘वाफ’ आणि ‘कंस वध’ असे या भाषणांचे दोन विषय होते. ही दोन्ही भाषणे फारच चांगली झाली. ती आपण जन्मभर विसरणार नाही, असे ऐकणारे सांगत. ‘वाफ’ या विषयावरील भाषणात वीर सावरकर सांगतात, ‘वाफेचे क्रियाशक्तीत रुपांतर झाले नाही, तर वाफनिर्मितीचे श्रम व्यर्थ जातात तसेच उत्सवात उत्पन्न होणाऱ्या चेतनेचे क्रियेत रुपांतर न करता नुसते उत्सवच करीत राहणाऱ्या लोकांचे श्रम विफल होत, असे उत्सव देवाचे असले तरी ते एक व्यसनच होय’.
    • रत्नागिरीतील गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वीर सावरकरांचे ‘व्रते नि वैकल्ये’ या विषयावर भाषण झाले. या भाषणात त्यांनी सांगितले की, हिंदू समाजातील नव्हे, तर अन्य समाजातीलही निरर्थक व्रतामुळे विज्ञानाचा प्रचार होत नाही.वडाची पूजा केल्याने जर देव पावतो, तर गाई, बैलांची पूजा केल्याने किंवा सापाला दूध पाजल्याने जर देव पावतो तर तोच देव वाटेवर टाकून दिलेल्या अनाथ अर्भकांचे पालनपोषण केल्याने का पावणार नाही? सध्याच्या व्रतवैकल्यांचे आत्मशुद्धी, इच्छित फलप्राप्ती आणि पारलौकिक पुण्य प्रभूती हेच हेतू आहेत. तेच हेतू मानव सेवेच्या परोपकाराच्या व्रताने मिळणार असल्याने आपण व्रताची निवड करताना आज दीनदुबळ्या मानवांच्या उद्धारासाठी, भल्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होईल,असे व्रत निवडावे.
    • गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पतितपावन मंदिरात एक शुुद्धीसमारंभ करण्यात आला. हिंदूंनी टाकलेल्या बहिष्कारामुळे यशवंत सखाराम हळदणकर नावाचा एक भंडारी तरुण चार-पाच वर्षांपूर्वी मुसलमान बनला होता. त्याला पुन्हा शुद्ध करून घेण्यात आले. एवढेच नव्हे, तर मालगुंड येथील भंडारी जमातीने त्याला पंक्तिपावनही करून घेतले.
    • पतितपावन मंदिरातील गणपतीला लोकांनी जाऊ नये. यासाठी ‘श्रीसेवक’ या नावाने बलवंत मुद्रणालयात छापलेली एक खबर रत्नागिरीत वाटण्यात आली! या पत्रकात लिहिले होते की, ‘रत्नागिरीत अस्पृश्यता माजल्याने येथे बिहारसारखी अवस्था होईल. अंदमान रत्नागिरीत आले. त्यामुळे रत्नागिरीचे अंदमान होईल, तरी पतितपावनात जाऊ नका!’ अर्थात असल्या पत्रकांचा काही भाबडे लोक सोडून इतरांवर काहीच परिणाम झाला नाही. पतितपावन मंदिरातील उत्सव यशस्वीपणे पार पडला.
    • रत्नागिरीच्या टिळक आळीतील गणेशोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवात पहिल्या रात्री दि. २१ ऑगस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषण झाले. अध्यक्ष होते श्री. चिपळूणकर विधिज्ञ. विषय होता- ‘शिखांचा इतिहास’. या भाषणात वीर सावरकर म्हणाले की, शीख धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे. शीख हे काही हिंदूंचे शत्रू नाहीत. ते हिंदूपासून वेगळेही नाहीत. शिखांचे गुरु गोविंद सिंग यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मुसलमानांविरुद्ध युद्ध केले. त्यांनी आपल्या अनुयायांना स्फूर्तिदायक संदेश देऊन धर्मरक्षणासाठी लढण्यास प्रवृत्त केले. बलिदानाविना उद्धार नाही, हे तत्त्व त्यांनी आपल्या अनुयायी वर्गाच्या मनात बिंबवून क्षात्रप्रवृत्तीची जोपासना केली. वीर सावरकरांचे हे भाषण वीर वाणीने भरलेले नि ह्रदय हेलावून सोडणारे होते. असे वर्णन २६ ऑगस्टला ‘बलवंत’ने केले आहे.
    • १९२९ साली वीर सावरकरांनी रत्नागिरी येथे अखिल भारतीय हिंदू गणेशोत्सव करण्याची प्रथा चालू केली. रत्नागिरीतील तो उत्सव दिवसेंदिवस वाढत होता. १९३५च्या सप्टेंबरमध्ये ‘किर्लोस्कर’ मासिकात वीर सावरकरांचा ‘अखिल हिंदू गणपती स्थापा’, हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखातील वीर सावरकरांचे विचार असे, ‘गणेशोत्सव हा प्रथमपासून प्रवृत्तीपर आहे. त्याचे स्वरुप सार्वजनिक आहे. त्याची अधिष्ठात्री देवता मूळची राष्ट्रीय आहे. गणांचा जो पति तोच गणपति. ती मूर्ती वैयक्तिक मूर्ती नसून ती गणशक्तींची राष्ट्रीय जीवनाची हिंदू संघटनेची मूर्ती आहे. त्यातही आजच्या परिस्थितीत तो महोत्सव अधिकात अधिक उपयुक्त व्हावयास आवश्यक असे वळण लोकमान्यांच्या कर्तबगारीने देऊन त्या महोत्सवास आधीच अद्ययावतही करून सोडले आहे.’ या लेखात पुढे मूर्तीपूजेविषयी विवेचन करून वीर सावरकर यांनी लिहिले आहे – ‘आम्हास काही लोक विचारतात, तुम्ही गणेशोत्सवात कसे भाग घेता? दगडाला देव समजून कसे पूजता? त्याचे उत्तर असे- जशी थोर पुरुषाची पूजा तशी एक धार्मिक मूर्तिपूजाही आहे. मूर्ती फोडा, हे जसे मुसलमानांचे धर्मवेड तसेच मूर्तीलाच मूर्खपणा नि चित्रालाच विचित्र म्हणणारा अज्ञानी बुद्धीवाद हेही बुद्धीवेडच नव्हे का? शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून आपण त्यांना नमस्कार करतो, फुले वाहतो. ही ह्रदयाची एक मंगल आणि उदार प्रवृत्ती आहे. ती सर्वस्वी अनिंद्यच नव्हे तर उत्तेजनार्ह आहे.’ त्यानंतर पुढे वीर सावरकरांनी म्हटले आहे की, अखिल हिंदू गणेशोत्सवाच्या कार्यकारी मंडळात सर्व जातीचे लोक असावेत, पालखी सर्व जातीच्या लोकांनी उचलावी, मूर्तीची पूजा वेदोक्त पद्धतीने अस्पृश्य जातीतील बंधूंकडून व्हावी, देवे सर्वांनी एकत्र म्हणावे, गणेशोत्सवात पंगतीस एक तरी पूर्वास्पृश्य बोलवावा, सहभोजन करावे, जुन्या समाजघातक तेवढ्या रुढी मोडण्याचे कार्य अशा गणेशोत्सवात व्हावे.
    • रत्नागिरीतील गणेशोत्सवात वीर सावरकरांची भाषणे झाली. विषय होते, ‘कुंडलिनी आणि हिंदुध्वज’ आणि ‘औट घटकेचे नव्हे औट युगाचे साम्राज्य’. वीर सावरकरांनी हिंदुध्वजावर कुंडलिनी अंकित करावी, असे सांगताना भाषणात म्हटले आहे की, कुंडलिनी ही प्रत्येक माणसाच्या शरीरात पाठीच्या कण्यात असते. कमरेच्या बाजूला असलेल्या तिच्या खालच्या टोकाला मुलाधार म्हणतात. त्यातील सुप्त शक्ती जागृत करून ती मस्तकावरील सहस्त्र धारांपर्यंत पोहोचली की, मानवाला ब्रह्मानंद होतो. मोक्षाचे सुख मिळते, असे योगशास्त्रात सांगितले आहे आणि आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. भाषणात योगासारखा हा गहन विषय वीर सावरकरांनी समोर कुंडलिनीचे चित्र ठेवून शिकवला. एखाद्या कादंबरीप्रमाणे अबालवृद्धांनाही तो रुचकर वाटला.

    Join Our WhatsApp Community

    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.