BJP : भाजपा नेत्यांनो अलर्ट व्हा!

    घरातूनच सूचक इशारा; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

    106
    BJP : भाजपा नेत्यांनो अलर्ट व्हा!
    BJP : भाजपा नेत्यांनो अलर्ट व्हा!
    सुहास शेलार

    लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना, महायुतीला (भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी) चिंतेत टाकणारी बातमी पुढे येत आहे. २०१९ च्या तुलनेत राज्यात महायुतीला ५० टक्क्यांहून अधिक जागा गमवाव्या लागतील, असा अंदाज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपाने वेळीच सावध होऊन विद्यमान खासदारांची कामगिरी सुधारण्यासह काही जागांवर नवे चेहरे दिले नाहीत, तर मिशन ४५ अशक्य आहे, असा निष्कर्षही त्यात काढण्यात आला आहे. (BJP)
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले. त्यातून भाजपाला चिंतेत टाकणारी माहिती समोर आली. २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीने राज्यात ४१ जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत येत्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष ५० टक्के जागा गमावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक आज झाली तर राज्यात महायुतीला २१ जागा मिळतील, असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईचा विचार करता उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभवाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या येथे अनुक्रमे पूनम महाजन, राहुल शेवाळे खासदार आहेत. तर, दक्षिण मुंबईत मविआच्या अरविंद सावंत यांना जनतेचा कौल मिळण्याची शक्यता आहे. (BJP)

    कलम ३७०, राममंदिर, समान नागरी कायदा, हिंदुत्व आदी मुद्दे निवडणूक जिंकण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत. महागाई, बेरोजगारी, वाढत्या कर्जदरांमुळे मध्यमवर्गीयांचे बिघडलेले मासिक बजेट याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दलित व मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दुरावला होता, तो पुन्हा जोडला जात असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या सर्वेक्षणाची गंभीर दखल घेतली असून, गणेश दर्शनासाठी मुंबई भेटीवर आले असता दोहोंनी प्रदेश स्तरावरील नेत्यांची कानउघडणी केल्याचे कळते. पराभवाच्या छायेत असलेल्या काही जागांवर नवे चेहरे देण्याची सूचना त्यांनी केली. शिवाय जे आमदार लोकसभेला चांगली कामगिरी करतील, त्यांनाच विधानसभेला पुन्हा संधी द्यावी, असे सक्त निर्देशही त्यांनी दिले आहेत.
    जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी २६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुप्त बैठक घेतली. महाविकास आघाडीची एकजूट ही अजूनही राजकीय डोकेदुखी असून, ती निष्प्रभ करण्यासाठी काय करता येईल, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेला फडणवीस यांच्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र दांडी मारली. नड्डा यांनी या बैठकीत खासकरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या राजकीय ताकदीचा आढावा घेतला. (BJP)

    शिंदे-पवारांचे काय होणार?
    शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही भाजपाला त्याचा फारसा फायदा होताना दिसत नसून, शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी दोन ते तीन जागा मिळतील, असेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला २७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात २३ जागा जिंकल्या. शिवसेनेने भाजपसोबत युती करून ही निवडणूक लढवली होती आणि त्यांचे १८ खासदार विजयी झाले होते. आता उद्धव ठाकरे भाजपसोबत नाहीत. दुसरीकडे शरद पवार यांनीही भाजपविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याशिवाय मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्दयावरून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते आणि नेते अद्याप आलेले नाहीत. या परिस्थितीत निवडणुकीच्या तयारीची माहिती नड्डा यांनी घेतली. शिंदे आणि अजित पवार हे लोकसभेच्या किती जागा जिंकू शकतील, याचा आढावाही नड्डा यांनी घेतल्याचे समजते.

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.