मागील मार्च महिन्यापासून आपण नालेसफाईची चर्चा ऐकत आलो आहोत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक वर्षाऐवजी कॅलेंडर वर्षातच ही सफाई करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अमुक एवढी सफाई झालीय. तमुक एवढी झालीय. एवढंच नव्हेतर प्रथमच गाळ पुशर मशिनचा वापर करत ही सफाई करण्यात आली. त्यामुळे नालेसफाईची एवढी चर्चा सुरु असतानाच प्रथेप्रमाणे सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाईचे काम समाधानकारक झाल्याचे दाखले दिले. विरोधी पक्षांनी न झालेली सफाई आणि गाळातले नाले दाखवून त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. यातील खरं कोण आणि खोटं कोण असा प्रश्न जनतेच्या मनात असतानाच वरुण राजाने न्यायनिवाडा केला. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबापुरीला जलमय केले आणि सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन जे काही टक्क्केवारीचे दावे करत होते, ते फोल ठरले. महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल पावसाने केली. महापालिकेने नालेसफाईची कामे झाल्याचे कितीही दावे केले, तरी मुंबईकरांचा त्यावर विश्वास नाही. आणि तो पुढे असेल असेही नाही. प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष हे गांधारीच्या भूमिकेत असल्याने त्यांना गाळाने भरलेले नालेही स्वच्छ आणि सुंदर भासत असतात. हा त्यांचा चक्षुदोष आहे. पण पहिल्या पावसात मुंबईतील नेहमीचे हिंदमाता, माटुंगा, गांधी मार्केट, शीव स्थानक परिसर आदी काही भागांमध्ये पाणी भरले असले तरी असेही काही भाग पाण्याखाली गेले होते, जिथे आजवर कधीही पाणी भरले नव्हते. त्यामुळे जर नालेसफाई चांगल्याप्रकारे आणि सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार समाधानकारक होती, तर मग मुंबई तुंबली कशी, हा सर्वसामान्यांच्या मनातील पहिला प्रश्न आहे.
हिंदमाताचा पूल का बांधला? याचा विसर पडला का?
प्रथेप्रमाणे मग महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे हिंदमाताच्या ठिकाणी पोहोचले आणि पाण्यात उभे राहून प्रसारमाध्यमांसमोर स्वत:ची पाठ थोपटवून घेतली. या तुंबलेल्या पाण्यामुळे का होईना कोरोनाला घाबरुन जे आयुक्त कार्यालयाच्या बाहेर पडत नव्हते, ते बाहेर पडले. त्यांना पडावं लागलं. आयुक्त रस्त्यावर आले म्हणजे कोरोनाची भीती आता राहिलेली नाही, असा समज करून घ्यायला हरकत नाही. यामुळे लोकांना किमान महापालिकेचे आयुक्त पाहता आले (अर्थात ते रेनकोटमध्ये होते, त्यामुळे काळ्या रेनकोटमधील ते आयुक्तच काय, असे नागरीक लांबून बोट दाखवून एकमेकांना विचारत असतील) १५ वर्षांत प्रथमच हिंदमाताची वाहतूक पाणी तुंबल्यानंतर बंद करावी लागली नाही,ंअसा दावा छाती ठोकून केली. हिंदमाताचा पूल आपण का बांधला, कदाचित याचा विसर चहल यांना पडलेला असेल. तर दुसरीकडे महापौरबाईंनी कळस केला. म्हणाल्या, तीन ते चार तासांमध्ये तेथील पाण्याचा निचरा झाला. खरं तर महापौरांसह महापालिकेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना या पाण्याचा निचरा होईपर्यंत त्या पाण्यात उभे करून ठेवायला पाहिजे होते. म्हणजे पाण्याचा निचरा नक्की किती वेळात झाले आणि ज्यांच्या घरादारांमध्ये पाणी शिरले, त्यांच्या काय वेदना आहेत त्या तरी समजल्या असत्या. नालेसफाईची वरवरची पाहणी करून कंत्रादाराला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रक देणाऱ्या नेत्यांना खरं तर चौकात उभं करून जनतेने जाब विचारायला हवा.
(हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या प्रशासकीय कौशल्यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादी हतबल!)
केवळ १० ते १५ टक्क्केच नालेसफाई होते!
दरवर्षी आपण कोट्यवधी रुपये खर्च करतो. कंत्राटदारांची नियुक्ती करतो. पण सफाईच्या नावाने बोंबाबोंब असते. विरोधी पक्षांचे नेते नालेसफाईची पाहणी करून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही त्याची सफाई होत नाही. विरोधकांनी आरोप केला तर त्यांच्यावर टक्केवारीचा आरोप होता. मग सत्ताधारी पक्ष काय टक्केवारी मिळाली म्हणून गोडवे गात असतो काय? महापालिकेच्या पर्जन्यजलवाहिनी विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार नालेसफाईचे काम शंभर टक्के करायचे झाल्यास महापालिकेचा अर्थसंकल्पातील एकूण रक्कमही कमी पडेल. आणि शंभर टक्के नालेसफाई कधीच होवू शकत नाही. मग आपण सफाई करतोय ती केवळ १० ते १५ टक्क्केच. केवळ कंत्राटदारांच्या तिजोरी भरण्यासाठी नालेसफाई करण्यात येत आहेत.
व्हिडीओ काँन्फरन्सीद्वारे आढावा घेतला म्हणजे नालेसफाईचे होत नाही!
मागील दोन वर्षांपासून नालेसफाईच्या कामाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्यावर आहे. वेलरासू यांनी प्रत्यक्षात एक अधिकारी म्हणून अचानक भेटी देवून नालेसफाईची पाहणी केली, असा काही दाखला आहे का? प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांकडून व्हिडीओ काँन्फरन्सीद्वारे आढावा घेतला म्हणजे सफाईचे काम शंभर टक्के योग्यप्रकारे झाले असे होत नाही. जर सफाईचे काम योग्यप्रकारे झाले होते, तर मग नाल्याच्या काठावर गाळ कसा पडून होता? नाले गाळ आणि कचऱ्याने का भरले नाही? विरोधी पक्षांनी जेव्हा हे आरोप केले, तेव्हा जर कारवाईचा आसूड उगारला असता तर किमान वेगळा फरक पडला असता. एवढंच कशाला महापौरांनी जी गटनेत्यांसह बैठक घेतली, त्या बैठकीने काय साध्य झाले, ते तरी सांगावं.
नालेसफाईचे काम हे ‘टक्केवारी’वरच अवलंबून
पावसाने तर महापालिकेच्या कामाचा पोलखोल केला आहेच. पण कांदिवलीतील शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी भोईर यांचे पती व माजी नगरसेवक योगेश भोईर हे नाल्यात उतरून गाळ साफ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून तरी सत्ताधारी पक्षाने सफाई झाली नाही हे मान्य करायलाच हवं. जर सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकाला नाल्यात उतरुन अडकलेला गाळ साफ करावा लागतो, तर कंत्राटदारांनी काय साफसफाई केली होती, याचेही उत्तर शिवसेनेने द्यायला हवं. नालेसफाईचे काम हे टक्केवारीवरच अवलंबून आहे. आता या टक्केवारीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
(हेही वाचा : मुंबईत नाले, गटारांत कचरा टाकणा-यांवर आता कडक कारवाई)
पेटीका नाल्यांची न झालेली सफाई मुंबईला तुंबवते!
आपण नेहमीच मोठ्या नाल्यांच्या व छोट्या नाल्यांच्या सफाईकडे पाहत असतो. परंतु रस्त्यालगतचे पेटीका नाले, ब्रिटीशकालिन बंदिस्त नाले. यांच्या सफाईबाबत तेवढे गंभीर आहोत का? आपण मॅनहोल्समधून जेवढा कचरा निघतो तेवढा काढतो. पण दोन मॅनहोल्समधील जे अंतर आहे त्यातील गाळ आणि माती तशीच आतमध्ये अडकून राहते. त्यामुळे या पेटीका नाल्यांमधील गाळ, माती काढली तरी पूर्णक्षमतेने काढली जात नसल्याने पहिल्या पावसाळ्यात याच पेटीका नाल्यांची न झालेली सफाई ही मुंबईला तुंबवत असते. महापालिकेचे आयुक्तपदी अजोय मेहता असताना ते नालेसफाईच्या कामाचा पावसाळ्यापूर्वी आढावा घेताना गटारांची तुटलेली झाकणे, मॅनहोल्सची उघडी झाकणे आदींचा आढावा घेवून ती त्वरीत बसवण्याचे निर्देश देत असत. सेनापती बापट मार्गावर डॉ. दिपक अमरापूरकर यांचा मॅनहोल्समध्ये पडून झालेल्या दुघर्टनेनंतर प्रशासनाने घेतलेला हा बोध होता. त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांबाबत मॅनहोल्सची तुटलेली झाकणे बदलणे हेही प्रमुख निर्देश असायचे. परंतु विद्यमान आयुक्त हे मागील वर्षभरात कार्यालयाच्या बाहेरच न पडल्याने त्यांना मॅनहोल्सवरील तुटलेल्या झाकणांचा विषय ज्ञात नसेल. त्याचा परिणाम दिसून आलाच. भांडुप गावातील मॅनहोल्सवरील झाकण नसल्याने साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन महिला त्यात पडल्या. सुदैवाने त्यांना काही झाले नाही. परंतु अशाप्रकारे प्रशासनाचा निष्काळजीपणा हा लोकांच्या जीवावर बेतत असेल, तर लोकांनी काय करावं. त्यामुळे प्रशासनाला आता पाणी तुंबणार नाही याची तरी काळजी घ्यावी लागेल किंवा रस्ते आणि पदपथावरील मॅनहोल्सवरील झाकणे तरी व्यवस्थित बसवावी लागतील.
गाळाची सफाई करता करता तिजोरीची सफाई होते!
असो नालेसफाई झाली किंवा नाही झाली याचा शोध घ्यायचा झाला तर आधी नाल्यातील गाळ कुठे टाकला याचा शोध घ्यायला हवा. कंत्राटदारांकडून गाळ टाकायची ठिकाणे तर सांगितली जातात. पण गाळ तिथे टाकला हे का दाखवत नाही. प्रशासनातील अधिकारीही कधी विरोधकांच्या तोंडावर याचे पुरावे फेकून मारत नाही. त्यामुळे जो गाळ नेला जातो तो कुठला आणि लॉगशिटवर जे वजन दाखवतात ते कोणते असा प्रश्न निर्माण होतात. नालेसफाईच्या कामाच्या भ्रष्टाचारानंतर ही कामे अत्यंत पारदर्शकपणे होतील असे वाटत असले तरी प्रत्यक्षात कुठे काय? नालेसफाईच्या घोटाळ्यानंतर ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्याची भीती अशी काही कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना राहिलेली नाही. त्यामुळेच दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवण्याचा एककलमी कार्यक्रम आखला जातो. नालेसफाई ही केवळ हातसफाईच आहे. गाळाची सफाई करता करता महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली जात आहे. आपण जनता केवळ मुर्ख ठरत असून महापालिकेने एक पावसाळा ही सफाईच करू नये आणि मग पाहावे. जो त्रास सफाई करून जनता भोगते, तोच त्रास सफाई न करता जनता भोगणार आहे. नालेसफाई म्हणजे काय हे आधी प्रशासनाने स्पष्ट करायला हवे. नाल्यात पोकलेन आणि जेसीबी फिरवली म्हणजे सफाई होत नाही. त्यातील गाळ काढून पाण्याचा प्रवाह मोकळ ठेवणे याला सफाई म्हणतात. पण मुंबईत अशी सफाई कुठेच पाहायला मिळत नाही. पहिल्या पावसात मग अशी तुंबई होते.
(हेही वाचा : आता जंबो कोविड सेंटरमध्येही ७१ ऑक्सिजन निर्मिती प्लांट!)
Join Our WhatsApp Community