कोरोनासंबंधी आरोग्य सेवा आणि उद्घाटन नावाचा बाजार!

कोरोना सध्या उत्सव झाला आहे. उद्घाटनाच्या वेळी राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांची गर्दी दाखवायची, ती देखील सोशल डिस्टन्सिंगचा बोजवरा उडवून. सत्ताधारी म्हणा किंवा विरोधक, गर्दी करुन काय साधतात? गर्दीने कोरोना बळावतो, हे या मंडळींना कळत नाही का?

160

‘उद्घाटन’ हा तसा उत्साहाचा विषय!  मग तो वैयक्तिक असो किंवा सामाजिक! इथे लिहिताना ‘उद्घाटन’ हा शब्द समाजिक विषयाशी जोडलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत ज्या काही सामाजिक सुविधांचे उद्घाटन होत आहे, ते फक्त नावापुरते असते, प्रत्यक्षात त्यामागे राजकारणच असते. जगण्यासाठी खायचे की खाण्यासाठी जगायचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो, तसा प्रश्न राजकारण्यांना पडत नाही. कारण त्यांचे समाजकारण हे फक्त खाण्यासाठी असते, अर्थात याला काही मोजके सन्माननीय राजकारणी अपवाद आहेत. थोडक्यात सध्याच्या घडीला समाजकारण कधीच संपले आहे, उरलंय फक्त राजकारण…

पहिल्या लाटेत कुठे गायब होते राजकारणी?

विषय आहे कोरोना आणि त्यासंबंधी सेवांचे उद्घाटन सोहळे…मागच्या वर्षी कोरोनाची भीती होती म्हणून तेव्हा हा ट्रेंड नव्हता. त्यामुळे कोरोनाच्या त्या पहिल्या लाटेत केवळ सामाजिक कार्यकर्तेच विना मोबदला आणि सहृदयपणे कोरोना योद्ध्यांसोबत  काम करत होते. ही मंडळी तेव्हा कुठे रुग्णालयांना मदत करत होते, तर कुठे गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरत होते. यामध्ये क्वचितच कुठला तरी राजकारणी दिसायचा, बाकी सरसकट सगळे राजकारणी घरीच राहून निर्देश देत होते. अर्थात त्यांना या महामारीची भीती होती. म्हणूनच त्या कालखंडात कुठे उद्घाटन समारंभ झाल्याचे आठवत नाही. त्यावेळी सामान्य माणूस मरत होता. याचे या राजकारण्यांना दुःख होते की नव्हते माहीत नाही, परंतु हे सगळे राजकारणी तेव्हा घाबरून उद्घाटनासाठीची कात्री घरातच घेऊन बसले असतील. पण आज या राजकीय महोदयांना बळ आले आहे! कुठे सावज दिसले की चला…इतकी गर्दीची हौस का? कोविड सेंटरचे उद्घाटन असो, लसीकरणाचे बोर्ड लावणे असो अथवा रुग्णालयात आयसीयू सेंटरचे उद्घाटन असो, जणू काही हे राजकारणी खिशातच कात्री घेऊन फिरत आहेत.

(हेही वाचा : तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गावर काय उपाययोजना केली? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल )

…म्हणून उद्घाटनाच्या कार्यक्रमांवर बंदी आणावी!

उपहासाचा विषय थोडा बाजूला ठेवूया. परंतु या राजकारण्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही का? उद्घाटन करण्यासाठी रस्ते, बागा, पूल इत्यादी अनेक योजना रखडलेल्या पाहिल्यात, पण कोविड सेंटर रखडणे शक्यच नाही. कारण सध्या आणीबाणीची परिस्थिती जीआरप्रमाणे आहे, म्हणजे टेंडरशिवाय आरोग्य सेवा विनाविलंब उभ्या राहत आहेत. कोरोनासंबंधी सेवा उभ्या करताना विषयाचे गांभीर्य आणि आणीबाणी परिस्थितीवर स्थानिक म्हणा किंवा राज्य / केंद्र शासनातील बाबू हे ‘अर्जंट’ म्हणून नोट लिहितात आणि तात्काळ सदरात त्यास मान्यता मिळून सेवा उभ्या राहतात. पुढे बाबूंच्या त्या ‘नोट’ चा अर्थ शब्दाच्या पलीकडे जाऊन बदललेला असतो, पण त्यासाठी मात्र पडद्यामागे सर्वपक्षीय युती असते. मग पुढे सुरु होते श्रेयाची लढाई! प्रत्येक जण मी…मी…म्हणत पुढे पुढे सरसावतो. त्यांना उद्घाटनाची घाई असते. म्हणून कोरोना सध्या उत्सव झाला आहे. उद्घाटनाच्या वेळी राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांची गर्दी दाखवायची, ती देखील सोशल डिस्टन्सिंगचा बोजवरा उडवून. सत्ताधारी म्हणा किंवा विरोधक, गर्दी करून काय साधतात? गर्दीने कोरोना बळावतो, हे या मंडळींना कळत नाही का? त्यात कमी म्हणून की काय, पत्रकार मंडळी समोर दिसली की, राजकारणी मंडळींचा मास्क लगेच हनुवटीवर सरकतो. कारण त्यांना चमकायची हौस असते ना! हे राजकारणी ज्या सेवांचे उद्घाटन करतात, त्या काय त्यांनी स्वतःच्या पैशातून उभ्या केलेल्या नसतात. उद्घाटन, गर्दी इत्यादी साफ चुकीचे आहे. गर्दीच्या अशा कार्यक्रमांवर कायमची बंदी आणावी. तसेच उद्घाटनापायी श्रेयाच्या लढाईत जर एखाद्या आरोग्य सेवेचे लोकार्पण रखडले, तर याला जबाबदार घटकांना फटके द्यायला हवेत. मृत्यूचा बाजार करणारे असे निर्दयी लोक अप्रत्यक्षपणे याला जबाबदार आहेत, हे सर्वसामान्यांना समजले पाहिजे.

मग अपयशाचीही जबाबदारी घ्या!

उद्घाटक मंडळींना जर कोरोनासंबंधी उभारण्यात येणाऱ्या सेवांचे श्रेय घ्यायचे असेल, तर त्यांनी आधी या महामारीतील अपुऱ्या व्यवस्थेची, अपयशाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांनी ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्याची, न मिळणाऱ्या बेडची, उपलब्ध न होणाऱ्या व्हेंटिलेटरची, नकळत लागणाऱ्या आगीची, औषध आणि लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याची, त्यामुळे होणाऱ्या गोंधळाचीही जबाबदारी घ्यावी. ही यादी न संपणारी आहे. संधीसाधूपणा असावा पण किती? अगदी आणीबाणीची परिस्थिती तयार करायची आणि त्याचेही खापर फोडण्यासाठी श्रेयाची लढाई करायची. त्यानंतर ‘मी आहे ना’, असेही म्हणायचे!

कोरोना एक आपत्ती आहे, हे लक्षात घ्या!  

निर्लज्जपणे आणीबाणीच्या परिस्थितीत उद्घाटन काय करता…कीव येते तुमची साहेब. मागे टीव्हीवर आगीबद्दल ज्वलंत प्रतिक्रिया देण्याच्या गडबडीत कोणी विरोधी नेत्याला लक्षातच आले नाही की, त्याठिकाणी स्थानिक प्रशासन त्यांच्याच पक्षाचे आहे. नंतर जेव्हा हे त्यांच्या लक्षात येते, तेव्हा सुटलेले धोतर परत गुंडाळतांना त्यांची उडालेली तारांबळ, गंमत लोकांनी पाहिली. राजकीय मंडळींनी आमचा-तुमचा, राज्य-केंद्र असा भेदभाव संपवावा. कोरोना एक आपत्ती आहे. बळी घेताना तो तुमचा- आमचा बघत नाही. त्यामुळे उद्घाटन आणि गर्दीचे कार्यक्रम थांबवा. प्रशासकीय सेवेवर पडणारा ताण लक्षात घ्या आणि कृपया तुमची नाटके थांबवा. जनता जाणती आहे. पण नाईलाज आहे! अर्थात सगळे कावळे काळे…पुढच्याला कोण किती काळा तोच एक पर्याय आहे!!! तुम्ही कमी काळे व्हा इतकीच अपेक्षा…

(नि:स्वार्थीपणे काम करणारे राजकारणी किंवा प्रत्येक नि:स्वार्थी घटक यांनी हे लिखाण मनाला लावून घेऊ नये. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. अर्थात अशी मंडळी मोजकीच असावीत!!!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.