कोरोना आणखी किती जणांचा बळी घेणार?

प्रविणसोबत बोलणं झालं आणि व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी जसं शक्य होईल तसे प्रयत्न सुरु झाले. पण, समोरुन एकच उत्तर..बेड अव्हेलेबल नाही. एकीकडे घड्याळाचा काटा वर-वर सरकत होता आणि तुझ्या हृदयाचे ठोके तसतसे कमी होत होते. अखेर घड्याळ्यात 1.30 चा ठोका पडला अन् डॉक्टरांचा सांगावा आला, तुमचा पेशंट या जगात नाही.

शैलेश..तू चुकलास, खरंच चुकलास…कारण रचलेला डाव तू एका क्षणात मोडून निघून गेलास. डाव फक्त संसाराचा असतो असं कोणी म्हटलंय? आपल्या मैत्रीचाही एक डाव होताच की, होती की छान आपली दोस्ती, आपल्या दोस्तीची चौकट. पण, तू काय केलंस..? कोणालाही न कळवता अचानक निरोप घेतलास. आज तुझ्यावर खूप रागवावसं वाटंत, चिडावसं वाटतंय..असं वाटतंय थेट तुला भेटावं आणि या सगळ्या प्रकाराचा जाब विचारावा. पण आता तेही शक्य नाहीये. मी खूप हतबल झालोय, गलबलून गेलोय सगळ्या प्रकारामुळे. आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा डोळ्यादेखत तडफडत असते ना तेव्हा आपण खूप असह्य झालो असतो. आमचही तेच झालं होतं. तुझ्या जाण्यामुळे अनेक गोष्टींची आज जाणीव झाली. नियती, नशीब या शब्दांचे खरे अर्थ आज कळतायेत. पैसे आहेत, जवळ आपली हक्काची माणसं आहेत, उपचार करायला डॉक्टरही आहेत..पण तरी आपण हतबल आहोत. यात ना तुझी चूक ना परमेश्वराची. कारण, नियती तिचा खेळ खेळून गेलीये. पण, जातांना मात्र, आपला डाव मोडून गेली.

…आणि तिथेच काळाने घाला घातला!

काल-परवाचीच गोष्ट असल्यासारखं सगळं कसं लख्ख आठवतंय रे.  कोरोनामुळे देशात लागलेला लॉकडाउन आणि त्याच काळात आपली जुळलेली मैत्री. खरं तर तू मितभाषी. परंतु, कमी शब्दांत आपले विचार कसे व्यक्त करावेत याचं उत्तम उदाहरणही तूच. आपल्या कॉम्प्लेक्समध्ये मी नवाच होतो. पण तुम्हा दोस्तांमुळे मला कधीच नवीन असल्याची जाणीव झाली नाही. सण, समारंभ प्रत्येकात पुढाकार घेऊन हिरहिरीने काम करायचास. ऑफिस, घर या सगळ्यातून वेळ काढत तू मित्रांनाही वेळ द्यायचाच. वेळेवरुन आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये. वेळ ही कोणाची नसते. तिचा काळ आला की ती येते आणि आपलं होत्याचं नव्हतं करुन जाते. तुझंही तेच झालंय. दुसरा लॉकडाऊन लागला.  घराबाहेर संकट असतांना सुद्धा कुटुंबासाठी तू घरातून बाहेर पडलास आणि तिथेच काळाने घाला घातला. आजपर्यंत लोकांना कोरोना झाल्याचं ऐकलं होतं, लोकांचे जीव गेल्याचं ऐकून सुन्न व्हायला व्हायचंय. पण, या कोरोनाने तर तुलाच नेलं.. हा प्रसंग केवळ सुन्न करणाराचा नव्हता तर त्या क्षणी आमची विचारक्षमताही  मंदावली होती.

प्रवीण मला म्हणाला, अरे शैलेश गेला..!

दोन दिवसापूर्वी प्रविणचा फोन आला होता. “शैलेशची तब्येत खालावली आहे. ऑक्सिजनची पातळी ८० % वर आलीये. व्हेंटिलेटर मिळत नाहीये. आम्ही व्हेंटिलेटरसाठी प्रयत्न करतोय. तूदेखील तुझ्या ओळखीने काही होतंय का पहा”, बास्स..एवढंच प्रविणसोबत बोलणं झालं आणि व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी जसं शक्य होईल तसे प्रयत्न सुरु झाले. शहरातील, शहराबाहेरल अनेक कोविड सेंटर, मदत करणाऱ्या संस्था, काही राजकीय व्यक्तीमत्त्व सगळ्यांना फोन करुन झाले. पण, समोरुन एकच उत्तर..बेड अव्हेलेबल नाही. एकीकडे घड्याळाचा काटा वर-वर सरकत होता आणि तुझ्या हृदयाचे ठोके तसतसे कमी होत होते. अखेर घड्याळ्यात 1.30 चा ठोका पडला अन् डॉक्टरांचा सांगावा आला, तुमचा पेशंट या जगात नाही. पायाखालची वाळू सरकावी तसं काहीसं हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्रत्येकाची झाली होती.  सकाळी प्रवीणचा फोन आला.. जे व्हायला नको होते तेच घडलं.. प्रवीण मला म्हणाला अरे शैलेश गेलाय.. डोळ्यासमोर सर्कन सर्व आठवणी जाग्या झाल्यात. तू आमच्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही. आत जरी आम्ही सर्व भेटलो तरी तुझी उणीव मित्रा कायमच राहील. पण तुझं हे जाणं मनाला पटलं नाही रे.. नेहमीच कुठे काही प्लॅन केला की शैलेश कुठे आहे बघ रे.. किती वाजेपर्यंत येणार असा सर्वांचा पहिला प्रश्न असायचा…पण आता वाट बघायला तू आमच्यात नाहीस…. मित्रा लिहिताना शब्दही सुचेनासे झालेत रे.. निशब्द झालोय..

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here