मुंबईत रुग्णांना रुग्णालयात प्रवेश मिळत नाही. रुग्णखाटांची प्रतीक्षा एवढी भली मोठी झालीय की त्यांचा नंबर येईपर्यंत प्रत्येक जण माना टाकायला लागलाय. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच कुणी जीव सोडतंय, तर कुणी रुग्णालयात दाखल करतानाच मध्येच अंग टाकतंय. तर कुणी रुग्णालयाच्या दरवाजात जावून श्वास सोडतोय. जे चित्र सध्या या बृहन्मुंबईत पाहायला मिळतंय, ते खरोखरंच ह्दयद्रावक आहे. काळीज पिळवटून टाकणारं आहे. रुग्णालयात जागा नाही. डॉक्टरही कमी पडू लागलेत. त्यामुळे एकामागून एक असा मृत्यूचा आकडा वाढत जातोय. प्रत्येक विभागातील दोन-चार इमारतीत रुग्ण मरताना आपण पाहतोय. अश्रु आणि हुंदक्यांनी मुंबई डबडबलीय. कुणी जवळचा माणूस पुढे येईना. कुणी जवळ घेईना. सांत्वन करणारा मायेचा हात गेलेल्या माणसाच्या नातेवाईकांच्या फिरताना दिसत नाही. जे करायचे ते त्यांनाच. दु:खाचा डोंगर कोसळूनही कुणीही मदतीला पुढे येत नाही, अशीच काहीशी परिस्थिती मुंबईसह इतर शहरांमध्ये आहे. त्यामुळे हुंदके देत अश्रुला वाट मोकळी करू देताना कोरोनामुळे संपलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे या अश्रुला अधिक वाट करून दिली जातेय. आपला नवरा, वडील, भाऊ, आई, आजी, ताई, मामा आपल्याला सोडून गेल्याचं दु:ख आहेतच. पण त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही जवळचा नातेवाईक पुढे येत नाही. लांब उभा राहूनही तो धीर देवू शकत नाही. जणू काही आम्ही मोठा गुन्हा केलाय आणि त्यांची शिक्षा आम्हाला देवानं अशाप्रकारे दिली, अशीच अपराधीपणाची भावना आता मृतांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण झालीय.
रुग्णांच्या हट्टापायीच मृत्यूचा आकडा वाढतोय!
आज कोरोनाने भले जरी रंग दाखवला असेल. पण त्याला जबाबदार आपणच आहोत. पण आपली चूक मान्य करायची नाही. मागील एक वर्षांपासून कोरोनाच्या आजारापासून वाचण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आणि कशाप्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे याची माहिती सरकार आणि महापालिकेच्यावतीनं दिली जाते. पण कोरोना आहेच कुठे? कोरोना हा केवळ फार्स आहे, असं म्हणत थट्टेवर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोरोनाने जेव्हा घेरलं, तेव्हा त्या आजाराची गंभीरता रुग्णाला किंबहुना त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना जाणू लागली. आपल्याला कोरोनाची चाचणी करावी लागणार याच विचाराने रुग्ण अर्धा मेला झालेला आहे. त्यातच चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर अजुनच गर्भगळीत होवू पडतो. आज कोरोनामुळे मृत्यू पावलेले अर्ध्याहून अधिक रुग्ण हे घाबरुनच गेले आहेत. जे बाधित रुग्ण आढळून येत आहेत ते लक्षणे नसलेले. त्यामुळे ते घरीच राहून उपचार करत आहेत. परंतु आपल्याला घरीच राहायला सांगितले. पण उपचार काय करायचे हे सांगितलं गेलं नाही. ज्या कुटुंबाचे डॉक्टर आहेत, त्यांनी त्याचा वैद्यकीय सल्ला घेतला. पण बाकींच्याचे काय? ज्या काही प्राथमिक उपाययोजना, जसे की गरम पाणी पिणे, गरम पाण्याची वाफ ठराविक अंतराच्या फरकाने घेणे, आपण वापरलेल्या वस्तू स्वतंत्र ठेवाव्यात, स्वतंत्र खोलीत राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतले जावे, याचाच अवलंब जर केला नाही तर घरी राहण्याचा उपयोगच काय? आणि त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सातव्या, आठव्या दिवशी लक्षणे दिसून आल्यानंतरही ते घरीच राहत आहे. मग पैसेवाले असतील त्यांना खासगी रुग्णालयच हवे. त्यातही मग चॉईस. अमुकच हवंय, तमुकच हवंय. खिडकीशेजारीच हवंय. स्वतंत्रच बेड हवाय, जसं काही हे रुग्ण फाईव्हस्टार हॉटेलचंच बुकींग करत तिथं राहायला जातायेत. गरीबाला तर काही चॉईसच नसते म्हणा. तरीही त्यातल्या त्यात जे काही मुलाच्या शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी पैसा ठेवला आहे. तो पैसा मग खासगी रुग्णालयात प्रवेश घेत खर्च करतात. पण आज आपल्याला बरं व्हायचंय आहे. मग त्यासाठी चॉईस का असावी? आणि मी तर म्हणेन रुग्णांच्या हट्टापायीच मृत्यूचा आकडा वाढतोय. कारण ज्यावेळेला एखाद्या रुग्णाची पातळी ९२ ते ९३च्या आसपास येवू लागतेय असे जेव्हा वाटतंय तेव्हाच जर धावपळ केली तर ऑक्सिजन बेडवर त्यांच्यावर उपचार होवू शकतो. पण ऑक्सिजन बेड नको तर आम्हाला आयसीयू हवा अशी फर्माईश खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून होतेय. खरं तर हे ठरवणारे आपण कोण? हे ठरवायला डॉक्टर आहेत की. त्यांना निर्णय घेवून द्या की रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज आहे की आयसीयूची. त्यामुळे आयसीयू बेड उपलब्ध नाही म्हणून रुग्ण घरी प्रतीक्षा करत बसतो. आणि शेवटच्या क्षणाला घेवून त्यांचे नातेवाईक धावपळ करतात. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे वेळीच रुग्णालयात दाखल केलं गेलं तर रुग्णांचा जीव वाचवता येईल आणि यामुळे जी काही मृत्यूची संख्या वाढतेय तीसुध्दा कमी होईल.
(हेही वाचा : …तर मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्ण संख्या ‘कमी’ होईल! काय आहे टास्क फोर्सच्या डॉ. ओक यांचे मत?)
आयसीयू बेडसाठी निर्दयी बनवले!
मुंबईतील बहुतांशी सर्वच खासगी रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये, जंबो कोविड सेंटर व इतर कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. पण सुरुवातीच्या मागील काही दिवसांपूर्वी केवळ खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक होतं. आता ते महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही होवू लागलंय. दोन्हीकडील खाटा फुल्ल झाल्या. विशेषत: ज्या आयसीयूची मागणी होत आहे, ते एवढे फुल्ल आहेत की आतला रुग्ण मरावा आणि आपल्या माणसाला प्रवेश मिळावा, अशी प्रार्थना करणारेही आहेत. म्हणजे शेवटच्या घटका मोजत असतानाही आपण तो रुग्ण वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना करायचो, तिथे आज आपला रुग्ण वाचावा, याकरता अत्यंत चिंताजनक असलेल्या रुग्णाच्या मरणाची वाट पाहत आहोत. म्हणजेच या कोरोनाने आपल्याला कुठे आणून ठेवलंय बघा.
खासगी रुग्नालयांकडून लूट!
आज महापालिकेच्या रुग्णालय आणि कोविड सेंटरपेक्षा खासगी रुग्णालयातील मृत्यूचा आकडा हाही तेवढाच आहे. फरक एवढाच आहे की अगदी शेवटच्या क्षणाला आलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालय हातच लावत नाही. आपल्या दरवाज्यातूनच आयसीयू नाही म्हणून परत पाठवतात. पण तिथे आयसीयूचे कारण नसतं, तर तो रुग्ण वाचू शकत नाही. उगाच आपल्या रुग्णालयात मृत्यूचा आकडा का वाढवावा, याच करता ते दाखल करून घेत नाही. त्यामुळे मग अशा रुग्णांना महापालिकेच्या केंद्रांमध्ये सामावून घेतलं जातं. आणि दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच तो मृत्यू पावतो. म्हणजे काहीही उपचार न करता महापालिकेच्या रुग्णालयांच्या नावावर एका मृत्यूची नोंद होते. खरं तर खासगी रुग्णालयांचे बाजारीकरण झालं आहे. जो रुग्ण बरा होवू शकतो, जो रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, पैसा खर्च करू शकतो, त्यांनाच ते दाखल करून घेतात, अशी काही उदाहरणे ऐकायला मिळतात. त्यामुळे मग खासगी रुग्णालयांमध्ये पैसे खर्च करून झाले आणि रुग्णाची पुढील ऐपत नाही म्हटल्यावर त्यांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये घेवुन जाण्यास सांगितलं जातं. आज ज्या रेमडेसिवीर इंजेक्शनकरता खासगी रुग्णलयांमध्ये पैसे मोजले जातात, तिथे महापालिकेच्या रुग्णालयात ते मोफत दिलं जातं. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ना ऑक्सिजन करता पैसे आकारात ना लॅब टेस्टला, ना डॉक्टरांच्या भेटीला. पण सर्व काही मोफतमध्ये देवूनही मुंबई महापालिकेची रुग्णालये व कोविड सेंटर ही बदनामच ठरतात. शेवटी म्हटलं जातं ना की फुकटातल्या वस्तूला मोल नसतं. तसंच या महापालिकेचं आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नाममात्र तरी शुल्क आकारलं गेलंच पाहिजे. आज खासगी असो वा महापालिकेची रुग्णालये असो. सर्व ठिकाणी कोविडवरील उपचाराचा प्रोटोकॉल सारखाच आहे. खासगीमध्ये काही वेगळा उपचार आणि महापालिकेत काही वेगळा असं कुठेही. फरक आहे तो पैशाचा, श्रीमंतीचा.
आयुक्तांचा बिनधास्तपणा गेला कुठे?
मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये काही प्रमाणात त्रुटी असेल. काही प्रमाणात अस्वच्छता असेल. डॉक्टर पाहत नाही. रुग्णांना दाखल करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते या ज्या काही तक्रारी आहेत. त्या तक्रारींकडे जर आयुक्तांनी स्वत: मुख्यालयातील पिंजऱ्यातून बाहेर पडून रुग्णालय आणि कोविड सेंटरला भेटी देत किमान सी.सी. टिव्ही कॅमेराद्वारे जरी पाहणी केली तरीही मोठा फरक पडू शकतो. डॉक्टरांची कमरता असेल तर तेही भरु शकतात. मागील वर्षी कोरोनाची भीती काही डॉक्टरांमध्ये तसेच नर्सिंग स्टाफमध्येही होती. पण आता ती भीती राहिलेली नाही. त्यामुळे कंत्राटी पध्दतीवर डॉक्टर तसेच नर्सेस प्राप्त होवू शकतात. पण मुळात आपली मानसिकताच नाही ना? आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर चहल यांनी इक्बाली थाटात धारावी आणि मालाडला भेटी दिली. पीपीई किट घालून नायर रुग्णालयाला भेट देवून रुग्णांची विचारपूस केली. पण ते चहल आता राहिलेले नाहीत. डॅशिंग म्हणवणाऱ्या चहल यांनी काही दिवसांत आक्रमक आणि बिनधास्तपणे कपडे उतरवून प्रविण परदेशींचे कपडे पुन्हा अंगावर चढवत बंदिस्त कार्यालयात कोंडून घेत व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे चहल यांच्याकडे ज्या अपेक्षा आहेत, त्या फोल ठरताना दिसत आहे.
(हेही वाचा : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच ऑक्सिजन प्लांट! ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीचा परिणाम)
महापालिकेचा चांगला निर्णय पण उशीर झाला!
वाढत्या मृत्यू संख्येला आळा घालण्यासाठी तसेच रुग्णाला आवश्यक असेल आणि गरजेप्रमाणेच रुग्ण खाटा उपलब्ध व्हावी याकरता आयुक्तांनी निर्णय घेतला. हा निर्णय घ्यायला फार उशिर झालेला आहे. महापालिकेच्या वॉररुमला रुग्णाने रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केल्यानंतर त्या रुग्णाची घरी जावून तपासणी केली जाणार आहे. यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागात टिम बनवल्या आहे. या टिमकडून जो अभिप्राय येईल त्यानुसारच आता वॉर्ड वॉररुममधून रुग्णाला खाटा उपलब्ध होणार आहेत. हा खरं तर महत्वपूर्ण निर्णय आहे. पण जर यापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर जे रुग्ण खाटा अडवून बसलेत. ऑक्सिजनची गरज आहे आणि आयसीयूच्या प्रतीक्षेत घरी राहिले अशा रुग्णांना वेळीच चांगल्याप्रकारे उपचार करता येतील.
महापालिकेची ऑक्सिजन प्लांटविषयावर दिरंगाई!
पण हे सर्व केलं तरी आधी रुग्णांना खाटा मिळत नाही. मिळाली तरी ऑक्सिजन संपल्यानंतर अन्य ठिकाणी हलवाहलवी, तर कधी रेमडेसिवीर नाही म्हणून धावपळ सुरु होते. या सर्वांवर मात करायची तर आगीसारख्या घटना घडून ज्यांत रुग्ण मरण पावतात. या सर्व घटना पाहिल्या की मन विषण्ण होतं. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना उच्च न्यायालयानं फटकारलं. एक वर्षात ऑक्सिजनबाबत का निर्णय घेतला नाही म्हणून. पण एका बाजुला आरोग्य विभागाच्या सचिवांना जबाबदार धरले जात असेल तर मुंबईत १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यास आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे काम हाती घेतले नाही. यासाठी कुणाला जबाबदार धरायचे? ज्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना हलवावे लागले, त्याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित होते. मग ही चूक कुणाची. आज रुग्णांच्या मृत्यूनंतर मातम होतं. महापालिका असो वा सरकारी यंत्रणांच्या नियोजनाच्या अभावामुळे सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडू लागली आहे. ज्या काही आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या वाढत्या रुग्णसंख्येपुढे कमी पडू लागल्या आहे. तेव्हा नागरीकांनो, अतिशहाणपणा न दाखवता जिथे मिळेल तिथे रुग्णाला दाखल करा आणि उपचार घ्या. रुग्ण बरा होणे हेच पहिलं ध्येय आहे. मग तो कुठल्या रुग्णालयात जावून बरा झाला याचे विश्लेषण आणि पोचपावती नंतर देता येईल. त्यामुळे लेखाच्या शेवटी एकच सांगेन. आज ज्यांच्या घरचा माणूस गेलाय, त्यांची परिस्थिती डोळयासमोर आणा. दु:खाचे अश्रु आज हुंदके देत पिण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. त्यामुळे आपल्यावर ही वेळ येवू नये असे वाटत असेल तर घरी थांबा. केवळ आठ ते दहा दिवसांचा हा काळ आपण घरी बसून महापालिकेला आणि पर्यायाने सरकारला सहकार्य करू या. तेव्हा आजपासून निर्धार करा की, मी घरातच राहणार आणि घराबाहेर पडताना मास्क लावतानाच प्रत्येक क्षणाला काळजी घेईन!!!
Join Our WhatsApp Community