9 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी मुंबईकडे येणार्या पुष्पक एक्सप्रेसमधे सायंकाळी इगतपुरी ते कसारा ह्या घाटात 8 ते 10 दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रवांशांकडील रोख रक्कम आणि मोबाईल लुटले. ह्या दरोडेखोरांनी एका महिलेवर तिच्या पतीदेखतच बलात्कार केला. काही धाडसी प्रवाशांनी त्यातील दोघांना पकडले व कल्याण येथील पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकाश पारधी, अर्शद शेख अशी पकडलेल्यांची नावे आहेत.
अंमली पदार्थांचे व्यसन या घटनेमागे असावे त्यामुळे पैशांसाठी हा प्रकार झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या दोघांकडे चौकशी करुन त्यांच्या अजून दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. हे चौघेही 19 ते 21 वयोगटातील असून त्यातील तिघे इगतपुरी, घोटी भागातील व एक जण मालाड भागातील रहिवासी आहे. दरोडेखोरांकडे शस्त्रे असतानाही काही प्रवाशांनी धाडस दाखवून, दोन दरोडेखोरांना पकडले त्यामुळे आरोपींचा शोध लागू शकला.
(हेही वाचाः दहशतवादी कारस्थाने व उपाय)
का घडतात गुन्हे?
इगतपुरी, घोटी, कसारा हा डोंगर-दर्यांचा भाग असल्याने रेल्वे रुळांच्या बाजूस मनुष्यवस्ती नाही व त्याचा गैरफायदा घेऊन रेल्वे प्रवाशांना लुटण्याचे प्रकार येथे वारंवार होत असतात. सदर भाग मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर आहे. ठाणे ग्रामीण व नाशिक ग्रामीण पोलिस हे ही ह्या भागात नसल्यातच जमा आहेत. त्यामुळे नाशिक, ठाणे व जवळच्या अन्य भागातील गुन्हेगारांचे सामान्य प्रवासी वारंवार शिकार होतात.
अनेक कारवाया
ही घटना घडली त्याच्या दोन दिवस आधी न्हावा शेवा बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डिआरआय) अधिकार्यांनी इराणहून आलेल्या शेंगदाणा तेलामधे लपवून आणलेले 25 किलो `हेरॉइन’ जप्त केले. ह्याची किंमत सुमारे 125 कोटी रुपये असावी. हे हेरॉइन अफगाणिस्तानातील कंधार मधून आल्याचे समजते. ह्या पूर्वीही जुलै महिन्यात`डिआरआय’ ने मुंबई बंदरातून 293 किलो हेरॉइन जप्त केले होते.
(हेही वाचाः दहशतवादाला चालना देणा-या व्हॉईस ऑफ हिंद वर एनआयएची कारवाई! काय आहे प्रकरण)
कोरोना काळात अंमली पदार्थांचा वापर वाढला
कोरोना काळात अंमली पदार्थ बाळगण्यामधे फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसते व जवळजवळ 600 व्यक्तींवर कारवाई केल्याचे निष्पन्न झाले आहे. 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने 716 किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. 2020 मध्ये 1 हजार 23 किलो व 2021 मध्ये 3 हजार 835 किलो अंमली पदार्थ साठा जप्त केला आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील तरुणही ह्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. ह्याला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ह्यांनी दिल्याचे समजते.
(हेही वाचाः राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)
ड्रग्जच्या अंमलाखाली घडतात गुन्हे
नुकतेच मुंबई ते गोवा जाणार्या क्रूझवर NCB ने धाड टाकून कोकेन व अन्य ड्रग्ज बाळगल्याबद्दल आर्यन खान , मुनमुन धमेचा व अन्य आठ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर बॉलिवूड मधील तरुण नटनट्या ह्यांना ड्रग्ज पुरवणार्या अनेक व्यक्तींना पकडण्यात आले. मुंबई, ठाणे बाहेरील दिवा, टिटवाळा भागामध्ये अनेक नायजेरियन व इतर देशातील परदेशी व्यक्तींनी आपला मुक्काम टाकल्याचे दिसते. त्यातील अनेक जण ड्रग्जच्या व्यापारात असल्याबद्दल पकडले गेले आहेत. ठाण्यातील कल्याण, भिवंडी ह्या भागामधील इराणी वस्त्यांमधे अनेक महिला, पुरुष ड्रग्जचा व्यापार करतात. ठाण्यील चेन स्नॅचिंगच्या घटनांमधे ह्या इराणी व्यक्ती ड्रग्जच्या अंमलाखाली गुन्हे करताना आढळल्या आहेत.
(हेही वाचाः महिलांवरील वाढत्या अत्याचारावर प्रवीण दीक्षितांनी ‘ही’ केली सूचना?)
पोलिस महानिरीक्षकांची आवश्यकता
मुंबई बाहेरील मीरा-भाईंदर, वसई भागातही ड्रग्ज माफियांच्या वाढत्या कारवांयामुळे त्रस्त झालेल्या जागरुक स्थानिक नेतृत्त्वाने केलेल्या मागणीमुळे तेथे शासनाने गेल्यावर्षी नवीन पोलिस आयुक्तालय सुरू करण्यास परवानगी दिली व त्यामुळे बेकायदेशीर कारवायांवर थोडा आळा बसला. तसेच दिवा, टिटवाळा, कसारा ह्या भागातील लोकांनी व रेल्वे प्रवाशांनीही ह्या भागात प्रभावी पोलिस गस्तीची मागणी केली आहे. ह्याचा एकत्रित विचार करुन सदरच्या भागांमध्ये रेल्वे व आजूबाजूचा भाग ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस महानिरीक्षक पदाच्या अधिकार्याची आवश्यकता आहे.
बैठकीत निर्णयाची शक्यता
पारंपारिक ठाणे परिक्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक हे सिंधुदुर्ग पासून पालघरपर्यंतच्या भागाचे समन्वयक म्हणून काम करतात. परंतु त्यांच्याकडून इगतपुरी, घोटी, कसारा, दिवा वगैरे भागामधे वाढणार्या गुन्हेगारीला आळा घालणे अवघड आहे. नवी मुंबई येथील राज्य राखीव पोलीस गट (SRP ) यातील जवान ह्या प्रस्तावित पोलिस महानिरीक्षकांच्या मदतीला देऊन पोलिस गस्त वाढवणे आवश्यक आहे. तरच स्थानिक लोकांमध्ये व रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकेल. 12 ऑक्टोबर 2021 रोजी गृहमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची बैठक बोलावल्याचे समजते. त्यावेळी ह्या प्रश्नावर तातडीने चर्चा अपेक्षित आहे.
(हेही वाचाः सीबीआय प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबई पोलिसांकडून समन्स)
– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य.
(वरील लेखाचे लेखक हे भारतीय पोलिस दलातील अनुभवी अधिकारी होते. ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचेही प्रमुख होते.)