देवेंद्र भाऊंची दिल्लीत चलती

मोदींच्या गुडबूकमध्ये असलेल्या देवेंद्र भाऊंवर सध्या तरी दिल्ली खूश असून, त्यांचीच चलती असल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

134

देवेंद्र फडणवीस… राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र भाऊंचा आक्रमकपणा सध्या महाराष्ट्र आणि विशेषत: ठाकरे सरकार अनुभवत आहे. देवेंद्र फडणवीस यांचा दबदबा महाराष्ट्रात आहे तसेच त्यांच्या शब्दाला केंद्रात देखील वजन आहेच. म्हणूनच शहा असतील किंवा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही देवेंद्र फडणवीस यांनाच विचारात घेऊन महाराष्ट्राबाबत निर्णय घेतात. त्यामुळे जसा देशात भाजपला मोदींशिवाय पर्याय नाही, तसाच राज्यात भाजपला देंवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. देवेंद्र भाऊंची दिल्लीतली चलती नेमकी कशी आहे, याचा आढावा घेणारा हा विशेष लेख…

(हेही वाचाः मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा हा आहे ‘मूलमंत्र’! महाराष्ट्रात कसा होणार भाजपला फायदा?)

फडणवीसांच्या मर्जीतल्या नेत्यांची वर्णी

मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… हे खरंतर विधानसभा निवडणुकीत गाजलेलं देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या या वाक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यांच्या मी पुन्हा येईनची आजही चर्चा होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने साथ सोडल्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण विरोधी पक्षनेते म्हणून. फडणवीस यांच्या स्वप्नांचा असा काय चुराडा झाला, की त्यांना मनात नसतानाही विरोधी बाकावर बसावे लागले. सत्तेत येण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले पण त्यांच्या त्या प्रयत्नांना तेव्हाही यश आले नाही आणि अजूनही येताना दिसत नाही. मग तो पहाटेचा शपथविधी असो किंवा सरकार पाडायचे अप्रत्यक्ष झालेले प्रयत्न असोत, देवेंद्र भाऊंना यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रासारखे राज्य हातचे जाणे हे भाजपला परवडणारे नाही. त्याचमुळे महाराष्ट्रात सत्ता न आणू शकल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. राज्यातील सत्ता गेल्याने मोदी-शहा फडणवीसांवर नाराज असल्याचे बोलले जात होते. पण नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील ज्या नेत्यांचा समावेश करण्यात आला त्यावर नजर टाकली, तर केंद्राने देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नावांची वर्णी मंत्रिमंडळात लावली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही?

(हेही वाचाः निष्ठेचे फुटलेले उमाळे, पण…)

राणेंना दिले मानाचे स्थान

नारायण राणे… राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नाव. याच राणेंना भाजपमध्ये घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची नाराजी पत्करली. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या राणेंना भाजपमध्ये घेतले, ते राज्यसभेचे खासदारही झाले आणि आता केंद्रीय मंत्री देखील. खुद्द राणेंनी मंत्री झाल्यानंतर पत्रकार परिषदेत मोदी, अमित शहा यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. राणेंची आक्रमकता सर्वांनाच माहिती आहे. आता विरोधी बाकावर असताना सत्ताधारी शिवसेनेला अंगावर घेण्याची क्षमता नारायण राणे यांच्याकडे असल्याने राणे मंत्री होणे भाजपच्या किती फायद्याचे आहे, हे दिल्ली भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी मोदी, अमित शहांना पटवून दिले. त्याचमुळे राणेंसारख्या आक्रमक नेत्याला भाजपने थेट मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले.

(हेही वाचाः नारायण राणेंना मंत्रिपद का दिले? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?)

मुंडे भगिनींना दिला धक्का?

एवढेच नाही तर कपिल पाटील यांच्यासारख्या आग्री नेत्याचे राज्याच्या दृष्टीने किती महत्व आहे, हे देखील देवेंद्र फडणवीस यांनी पटवून देत आपल्या आणखी एका मर्जीतील नेत्याची वर्णी केंद्रात लावली. तसेच नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पेशाने डॉक्टर असलेल्या भारती पवार यांचे देखील नाव देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला सुचवले. एवढेच नाही तर राज्यात वंजारा समजातील भागवत कराड यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाने त्यांनी मुंडे बहिणींना देखील धक्का दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

(हेही वाचाः ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तावर मोदींचे शिक्कामोर्तब! राणे बनले केंद्रीय मंत्री!)

फडणवीसांवर दिल्ली मेहरबान 

शिवसेना-भाजप सत्तेत येईल आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही, हे मोदींना अचूक माहीत आहे. त्याचमुळे मोदींच्या गुडबूकमध्ये असलेल्या देवेंद्र भाऊंवर सध्या तरी दिल्ली खूश असून, त्यांचीच चलती असल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.