Diwali 2023 : आता बिनधास्त खा दिवाळी फराळ!

आहारात मैद्याचा जितका कमी वापर करता येईल तितका करावा.

303
Diwali 2023 : आता बिनधास्त खा दिवाळी फराळ!
Diwali 2023 : आता बिनधास्त खा दिवाळी फराळ!

शब्दांकन : श्रुतिका कासार

हिंदू धर्मात आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंददायी घटना घडल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला (Diwali 2023) लावून दीपावली हा उत्सव साजरा करतात. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही दिवाळी या सणाची विशेष ओळख आहे. या सणामध्ये माणसांमध्ये गोडवा वाढवणारा पदार्थ म्हणजे फराळ, याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या सणानिमित्त अनेकांच्या भेटी-गाठी होतात. गोडा धोडाचे खाणे होते. मग त्या मंडळींच्या आग्रहाखातर आपण फराळातील तळलेले, गोड, रुचकर पदार्थ व मिठाईचा आस्वाद घेतो. या दिवसांमध्ये सकाळ, संध्याकाळ नाश्त्यामध्ये आपल्याकडून फराळाचेच पदार्थ खाल्ले जातात. पण, हे तळलेले आणि गोडाच्या पदार्थांचे अतिरेकी सेवन केल्याने शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. मात्र अगदी काही सोप्या पद्धतींच्या आधारे आपण हे शरीरावरील वाईट परिणाम टाळू शकतो आणि बिनधास्त दिवाळीचा फराळ खाऊ शकतो. आरोग्याची योग्य काळजी घेऊन दिवाळी फराळाचा आस्वाद कसा घ्यावा या विषयी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना आहारतज्ज्ञ आकांक्षा डिंगरे यांनी सविस्तर माहिती दिली.

(हेही वाचा – Muhurat Diwali Pooja : यंदा लक्ष्मीपूजन केव्हा करावे ?)

प्रमाणात आहार
कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती वाईट नसते. त्याचप्रमाणे दिवाळीचा फराळदेखील प्रमाणात खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. प्रत्येकाने प्रमाणात म्हणजेच केवळ पोट भरेल इतकेच ६० ते ७० टक्केच जेवण करावे. तर फराळामध्येही दिवसभरात एक वाटी चिवडा, एक करंजी, एक चकली याचा आस्वाद घ्यावा.

साखरेऐवजी खजूर
दिवाळी आणि गोड पदार्थ हे समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही. मात्र जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढू शकते, तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना गोड खाता येत नाही, अशा व्यक्तींसाठी गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ किंवा खजूर या पदार्थांचा वापर करावा. जितकी नॅचरल शुगर आहारात वापरता येईल तितकी वापरावी. केवळ दिवाळीच्या दिवसांमध्येच नाही तर रोजच्या आहारात देखील साखर ऐवजी गुळाची पावडर किंवा खजूर पावडरचा वापर करावा.

घाण्याचे तेल किंवा तूप वापरावे
दिवाळी फराळामध्ये बहुतांश पदार्थ हे तेलकट असतात. खूप तेलकट खाल्ल्याने आम्लपित्त, पचनाशी संबंधित अनेक आजार होतात. हे आजार होऊ नयेत यासाठी बाजारातील तेलाचा वापर करण्याऐवजी घाण्याचे तेल किंवा तूपाचा वापर करावा. असे केल्यास पदार्थांचा मनमुराद आस्वाद देखील घेता येईल आणि वजन देखील वाढणार नाही.

खूप पाणी प्यावे
जागरण आणि सतत तेलकट, तिखट खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. धने – जिरे यांचे पाणी, वेलचीचे पाणी, सब्जाचे पाणी किंवा साधे पाणी देखील भरपूर प्रमाणात प्यावे.

मैदाऐवजी तांदूळ
केवळ दिवाळीतच नाही तर नेहमीच आपल्या आहारात मैदाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. मैद्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे यापुढे आहारात मैद्याचा जितका कमी वापर करता येईल तितका करावा. तसेच मैदा ऐवजी गव्हाच्या कोंड्याचे पीठ आणि तांदळाच्या पिठाचा वापर करावा.

फळे आणि भाज्या
काकडी, टरबूज आणि पालेभाज्या यासारख्या उच्च पाण्याचे प्रमाण आणि फायबर असलेल्या विविध फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये फराळ आणि इतर मिठाईमुळे रोजच्या जेवणावर परिणाम होतो. मात्र असे न करता फराळ सोडून पोळी, भाजी, आमटी, भात या पदार्थांचा आहारात वापर करावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.