सर्वसामान्य जनता, भेसळ आणि आरोग्य!  

कृषीक्रांती झाली, असे म्हणतात, पण आरोग्याचे काय? भारतीय खाणारी तोंडे जास्त आहेत, म्हणून केमिकल धोरणाचा स्वीकार करायचा का?  

127

“मी सध्या चर्चेत आहे, पण फक्त मीच का? काल परवापासून प्रत्येक जण मला दोष देतोय, पण मी असा एकटाच आहे का?” काल-परवापासून कोकाकोला हा प्रश्न विचारत आहे. रोनाल्डोने मैदानाबाहेर कोकला मारलेली किक भलतीच जिव्हारी बसली आहे त्याच्या. काही मिलियन डॉलर बुडाले म्हणून चर्चा आहे, पण सफेद बाजारात काळेबेरे करून कोकने आजपर्यंत किती कमावले यावर चर्चा नाही!!!

सरकारचे परस्पर विरोधी धोरण!

नकारात्मक जगात आपण खाणारे सगळे काय खातात-पितात यावर खरेच विचार करण्यासारखे आहे. आपण कळत नकळत विष खातोय, हेच सत्य आहे. सगळा केमिकल लोचा आहे. सरकारला कर हवाय म्हणून दारू-सिगरेट चालते. एका बाजूला दारू-सिगरेट घेऊ नये, असे म्हणायचे आणि दुसऱ्याबाजूला त्याच्या विरोधी धोरण म्हणजे आपली तिजोरी कशी भरेल, असे धोरण राबवायचे. इथे सरकारचा दोष नाही, तर आपला आहे. कारण आपल्याला व्यसन प्रकार हवाय ना! कोल्डड्रिंक हा एक असाच फसवा प्रकार कदाचित दारूपेक्षा वाईट आहे; पण जगभर पेप्सी कोकचा दबदबा आहे. एक-दोन रुपयाचे दहा रुपये कसे करायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. कार्बन पाण्यात भरायचा आणि ढेकर आपण द्यायचा, पोट मात्र ह्या कोल्डड्रिंक कंपन्यांचे भरायचे, असा हा प्रकार आहे. कोल्डड्रिंक, दारू, सिगारेट हे माहितीचे पण गरजेच्या विषयात न मोडणारे प्रकार आहेत, पण दैनंदिन जीवनात काय चालू आहे?

smoker drinker 569fe6ad5f9b58eba4add9d9

(हेही वाचा : माझा कचरा – माझी जबाबदारी!)

भेसळीचा बाजार आणि सामान्यजन!

गोडे तेल म्हणजे जेवणातील ‘गॉड’. तो किती देवासारखा पावतो ते पाहू या. एक किलो तेल काढण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच किलो (2 to 2.5kg) शेंगदाणे लागतात, ज्याची बाजारी किमंत 200 रुपयेपर्यंत आहे. त्याच वेळेस बाजारात शुद्ध (?) शेंगदाणा तेल 100 ते 150 रुपये प्रतिकिलो दराने मिळते. मजेची बाब म्हणजे ह्या 100 ते 150 रुपयांत प्रोसेसिंग, मार्जिन, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट इत्यादी सर्व समाविष्ट असते. जाहिरात खर्च अजून वेगळा. म्हणजे शुद्ध तेल किमान 300 रुपयाचे असायला हवे, म्हणजे एकंदर काय प्रकार आहे? शेंगदाणा तेलासारखे इतर प्रकारात सुद्धा असेच काहीसे आहे. काय आहे ह्या बाजरी शुद्ध(?) तेलात? पाम, केमिकल की अजून काय? हेच तुपाच्या बाबतीत, वेगवेगळे फॅट्स  वापरून तूप घट्ट केले जाते. शुद्ध तूप घरी बनवले, तर 1500 ते 2000 किलोला पडेल, ते आपण दुकानातून मात्र पडेल त्या भावातून विकत घेतो. देशी गीर इत्यादी बाजार बघायला खूप चांगले वाटतात, पण काही लोक ते 1000 – 1500 ने विकतात. शक्य नाही असे गणित आहे हे. पुढे जाऊया. विविध मसाले, मासल्याच्या पावडर बाबत सुद्धा हेच आहे. अनेक ज्युस बाजारात आहेत, ती सगळी साखर आणि इसेन्सची कृपा आहे, हे खरे आहे का? फरसाण घ्यायचे तर बेसनाच्या पुडीत पांढऱ्या वाटण्याचे पीठ आणि बरेच काही. उगीच नाही बऱ्याच ठिकाणी फरसाण 80 रुपये किलो मिळत! मध, हळद औषधी म्हणून खायचे, पण बाजारात मिळणारे मध, हळद खरच शुद्ध आहे का? अनेक पीठे म्हणजे उपरोधिक पिठासीने झाली आहेत, धान्य दळून न घेता आपण झटपट मार्ग निवडला आहे. माझी विनंती आहे आपणच ही सर्व गणिते करून बघा. शुद्धतेचे बेशुद्ध करणारे गणित आहे हे. एका बाजूला नटून थटून नटव्यांचे जाहीर जाहिरातीचे गणित आणि दुसऱ्या बाजूला भेसळ-भेळ आणि यामध्ये आपला टांगणीला लागलेला जीव! पण इथेच गणित संपत नाही!

New Project 11 4

(हेही वाचा : शून्य सांडपाणी व्यवस्थापन…आणि बरेच काही!)

संख्यात्मक शेतीमुळे दर्जाचा विसर पडला!

सकाळच आपली भेसळने सुरू होते. प्रत्येक बाब उलगडून बघा, साखर सल्फरयुक्त, चहा पावडर प्रक्रियायुक्त, दूध असे येते घरी तुम्ही काहीही करा पण ते फाटणार नाही अशी तऱ्हा. युरियाची कमाल दुधात काय असते हे सर्वत्र ज्ञात आहे. दूध हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे. दुधातील पाणी भेसळ चालेल असे म्हणायची वेळ आली आहे. चहा सोबत बिस्कीट टोस्ट वैगेरे म्हणजे मैदा, आ बैल मुझे मार. आता भाजीपाला आणि फळे शुद्ध म्हणायचे तर त्यात रसायनाचा मारा, म्हणजे इथेही मरा! जीव केविलवाणा केला आहे अगदी! सफरचंदला वॅक्सिंग तर आंबा पावडर लावून पिवळा धम्मक. केळी चेंबर मध्ये पिकवलेली इत्यादी अनेक उदाहरणे आहेत. द्राक्ष शेती करणारे कदाचित स्वतः द्राक्ष खात असतील का?  प्रत्येक फळाची हीच पण कमी जास्त तऱ्हा. त्यातल्या त्यात चिकू, नारळ किंवा काही मोजकी फळे आणि भाज्या थोडे हटके पण बेसिक गुणधर्मामुळे केमिकल लोच्यापासून लांब आहेत, हाच काय तो समाधानाचा भाग. भाजीपाला बोलायचा तर वेली शेतीवर वेळीच केमिकल नाही टाकले तर मरून जातात, असे म्हटल्यावर काय बोलणार. त्यात भर म्हणजे केमिकल खतांचा मारा. आर्सेनिक द्रव्य म्हणजे निव्वळ विष. आपण किती रोज खातो? तजेलदार सिमला मिरच्या कशा तयार होतात, पालेभाज्या गटार पाण्यावर कशा छान होतात, बटाटा कसा मोठा होतो, टेमॅटो लाल लाल छान यावर खरेच प्रकाश पडायला हवा. आधुनिक शेती किंवा quantity based शेतीमध्ये आपण quality शेती विसरून गेलो. कृषीक्रांती झाली असे म्हणतात पण आरोग्याचे काय? भारतीय खाणारी तोंडे जास्त आहेत, म्हणून केमिकल धोरणाचा स्वीकार करायचा का?  शेतकरी पण काय करणार, तो तर अगोदरच अडत्यांच्या अडकीत्यात अडकलाय. तो भले चांगले पिकवेल पण रास्त भाव त्याला मिळेल का? काही शेतकरी नैसर्गिक, सेंद्रिय इत्यादी शेती करतात, पण त्यांना मार्केटमध्ये व्यापारी केमिकल भावातच मोजतो. तो ना घर का ना घाट का! नाही म्हणायला काही शेतकरी योग्य ग्राहक मिळवून योग्य भावात सेंद्रित माल विकायचा प्रयत्न करीत असतो पण हे प्रमाण फारच नगण्य आहे. त्यांची चढाओढ असते केमिकल मालाला चांगले लेबल पॅकिंग करून सेंद्रिय म्हणून सांगणाऱ्या विक्रेत्यांचे. असे काही विक्रेते सेंद्रिय माल सुद्धा quantity मध्ये आणि केमिकल मालाच्या जवळपास किमतीत विकत असतात! काय जादू आहे ना? इथे पण गडबड, नक्की आपण सेंद्रिय खातो का खते खातो?  रेडिमेड फूड, प्रीमिक्स, वन मिनिट फूड, पिझ्झा पास्ता, फूडकलर, चिनी सौस, बनावट माव्याच्या मिठाई इत्यादी असे अनेक अनुत्तरित विषय आहेत. इथे विषय असा आहे जो कधीही संपणारच नाही. ह्यावर उपाय आहेत का? कदाचित एका रात्रीत उत्तर सापडणार नाही पण आपण सुरुवात करू शकतो. अर्थात प्रत्येक चांगल्या गोष्टीची किंमत असतेच, हे डोक्यात ठेऊन आणि प्रत्यक्ष क्रियाशील धोरण स्वीकारून!

New Project 12 2

(हेही वाचा : फाटके कोण? शेतकरी कि समाजमन??)

आपण काय करू शकतो?

  • केमिकल द्रव्ये पिणे बंद करून शक्यतोवर घरी ज्यूस वैगरे बनवा
  • फायबर, प्रोटीन, व्हिटामिन नैसर्गिक खाद्यात शोधा, दुकानातल्या डब्यातले किंवा औषधी गोळ्यात नको
  • मिरची, हळद, काळीमिरी, धणे, जिरा इत्यादी पावडर प्रकार घरीच करा. पीठ धान्य दळून वापर करा
  • दूध हा कळीचा विषय आहे, तो काळजीपूर्वक हाताळा. आपल्या कडे येणारे दूध जर कधी तरी नासत किंवा खराब होत असेल तर ते चांगले दूध आहे. मीठ टाकून बघा आपले दूध खराब होते का? केमिकल वाले दूध खराब होत नाही!
  • साखर संहारक आहे, जमले तर खाऊच नका नाहीतच तर खायचीच असेल तर सल्फर युक्त नसावी. ऑर्गनिक गुळाचा वापर चांगला असू शकतो.
  • सोर्स महत्वाचा असतो, प्रत्येक बाबतीत शक्य नाही पण एखादी गोष्ट घेताना फक्त ब्रँड बघू नका, तर सोर्स बघा. सेंद्रिय बाबतीत तर सोर्स खुपच महत्वाचा आहे.
  • ग्राहकाने शेतकऱ्यांशी जमेल तसे स्वतःला जोडून घ्या, जेणे करून दोघांना पैसेवारीत जमेची बाजू असेल.
  • फळे, भाजीपाला खाताना चांगला सोर्स बघा, अस्सल काय आणि केमिकलवाले आणि कॉस्मेटिक लुकवाले प्रकार ओळखायला शिका.
  • शेतकरी आठवडी बाजार, बचतगट, घरगुती पदार्थ बनवणाऱ्या गृहिणीव्यवस्था यांच्यावर भर ठेवा
  • मॉलमध्ये मोल न विचारणारे आणि डिस्काउंटला बळी पडणारे आपण शेतकऱ्याला योग्य तो आर्थिक मान सुद्धा द्या. शेतकऱ्याला दया नको सन्मान द्या.
  • रासायनिक घटक युक्त रेडिमिक्स प्रकार टाळावेत
  • बाजारी मध घेण्यापेक्षा जंगलातून मध जमा करणारे किंवा मध शेती करणारे यांच्याशी संपर्क साधा. किंमत जास्त असते पण quality शाश्वत असते
  • एक उदाहरण… सगळे आंबे देवागडचे किंवा स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची नसते पण आपला मोह इतर ठिकाणाचा प्रकार वाईट ठरवतो. असे नसावे. देवगडचा हापूस मुंबईच्या बाजारात बऱ्याचदा देवगड स्थानिक भावापेक्षा कमी भावात मिळतो. तो कर्नाटक किंवा इतर ठिकाणाचा असू शकतो। तो तिथला म्हणून खायची आपली मानसिकता नक्की नाही, म्हणून विकणारा देवगड लेबल लावतो. देवगडचा हापूस त्याच्या ठिकाणी सर्वोच्च आहे, त्याला त्याची किंमत मिळायला हवी, हा दुसरा भाग
  • तुम्ही तुमचे डोके लावा, इतरांना सजग करा…बऱ्याच बाबी आहेत

(हेही वाचा : कोरोना काळातील ‘अनावश्यक चिंतना’चा मानसिक आजार आणि उपाय!)

सरकारी अपेक्षा…

  • Quality टेस्टिंग method खूप चांगली असावी
  • भेसळ कायदा व्यवस्था अजून कडक करायला हवी अगदी मृत्यूदंडापर्यंत शिक्षा असावी
  • शासनामार्फत शेतमाल विक्रीत ट्रेसेबीलिटी मॉडेल अंमलात आणायला हवे
  • शेतकरी हा व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असावा, व्यापारी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या नसाव्यात
  • शेतमाल विक्री यंत्रणा इ-नाम सारख्खा पारदर्शी आधारावर असाव्यात
  • शेती आधारित लघुउद्योगाला कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात पुढे करावे
  • आठवडी बाजार संकल्पना शहरात मोठ्या प्रमाणात राबवावी
  • भेसळ आणि नकारात्मक फूड सवयी बाबत लोकांना प्रबोधन करावे
  • नकारात्मक खाद्यवस्तूच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिराती वर बंदी असावीआमच्या एक मित्राचे वाक्य आठवते ‘तू बोलता है दारू, सिगरेट, कोल्ड्रिंक छोड दे। ओर ये सब बिना मिलावटवाला खाऊ, साथ मे ये बिना केमिकलवाला सबजी फल… यार इतना शुद्ध खाऊंगा तो मर जाऊंगा. आदत नही है यार!!!’ खरे आहे कदाचित! जीवन सुलभ असावे सुलभ शौचालयकडे जाणारे नसावे, म्हणून लिखित प्रपंच. एका रात्रीत बदल आपल्या जिभेला आणि पोटाला सुद्धा मानवणारे नाही. पण एकेक सकारात्मक बदल करायला काय हरकत आहे. एकाच दिवशी सगळे शुद्ध नको पण एकेक पायरी रोज चढायला हवी. आपण नाही, तरी पुढची पीढी सुदृढ असावी एवढेच…चांगले जेवण म्हणजे एक चांगले औषध आहे.

(हेही वाचा : केरळचा ‘1 टक्का डोसिंग पॅटर्न’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.